#न्यूटन भेटतो तेव्हा...!

Update: 2020-09-28 03:15 GMT

'न्यूटन' असं नाव असलेला तरूण मुलगा लोणावळ्यात आला, तो सत्तरच्या दशकात. आणि, येता - येता त्याच्या वाटेवर त्याला पहिलं दर्शन झालं ते 'जम्पिंग जॅक' जितेंद्रचं. जितेंद्र आणि राजेश्वरी यांचं शूटिंग. मग तो या वातावरणाच्या प्रेमात पडला. आधीच गडी फिल्मी. त्यात लोणावळ्याचं स्वर्गीय सौंदर्य शेजारी. मग, तो इथलाच होऊन गेला.

उच्चविद्याविभूषित, इंग्रजीवर प्रभुत्व यामुळं असंख्य संधी येऊनही गडी इथंच राहिला. खरं म्हणजे, लोणावळा हे त्याच्यासाठी तसं नवखं गाव. पण, मग तो इथलाच होऊन गेला. नाव न्यूटन. पाच वर्षांपूर्वी हे नाव ऐकलं, तेव्हा मी थबकलोच. साठी उलटलेला हा न्यूटन. व्यक्तिमत्त्व एकदम रांगडं. राजस्थानी राजपूत थाटाच्या पिळदार मिश्या, अशा की वयाचा अंदाजही येऊ नये.

गडी खरं म्हणजे प्रोटेस्टंट ख्रिश्चन. न्यूटन हे नाव त्यांच्या वडिलांचं. आडनाव लायल. पण, ते लावतात न्यूटन हेच नाव.

पूर्ण नाव काय? तर, 'अनिल न्यूटन'. पणजोबा मुळातले राजस्थानी राजपूत. चितौडचे हे आजोबा पुढे ख्रिश्चन झाले. मग हे कुटुंब मध्य प्रदेशातल्या रतलामला गेले. आजी लीलाबाई ही स्टाफ नर्स. तर, आईची आई लोणावळ्याची. तिचं नाव सीताबाई. ती गुजराती ख्रिश्चन.

ऐन कॉलेजच्या वयात अनिल न्यूटन हे आजोळी म्हणजे लोणावळ्यात आले. 'फरियाज' नावाच्या पंचतारकित हॉटेलात पुढे जॉइन झाले ते १९७८ मध्ये. हे हॉटेल प्रत्यक्षात सुरू झालं १९८१ मध्ये. तेव्हा, लोणावळ्यात पर्यटकांची अशी गर्दी नव्हती. सीझनमध्ये काही लोक यायचे. त्यांना 'सीझनची माणसं' असं म्हणण्याची पद्धत होती. लोणावळ्यात अनिल आले, तेव्हा बिजिज हॉटेल फक्त होतं.

या वातावरणाच्या ते प्रेमात पडले. आणि, इथं टूरिझम वाढायला हवं, म्हणून त्याचसाठी काम करत राहिले.

'फरियाज' त्यांनीच उभं केलं. पुढं, तुंगार्ली डॅमच्या भवताली, 'राजमाची'च्या दिशेनं जाणा-या आडवळणी वाटेवर, आकाशाशी नातं सांगणा-या उंचीवर 'अपर डेक' उभं करण्यातही त्यांचा 'रोल' महत्त्वाचा.

आणि, मग लोणावळ्याच्या टूरिझम जगातलं हे एवढं महत्त्वाचं नाव झालं की, अमिताभ असो वा धर्मेंद्र; राजकुमार असो की जॅकी श्रॉफ, अनिल न्यूटन हा प्रत्येक ता-याच्या 'गुरुत्वाकर्षणा'चा बिंदू झाला. अगदी, आपल्या मोहन गोखले आणि शुभांगी संगवई-गोखले यांच्या सहजीवनाचेही ते साक्षीदार. 'अप्पर डेक'वरच्या सगळ्या तारे-तारकांना गुरुत्वाकर्षणाची आठवण करून देणारा हा न्यूटन. आज 'जागतिक टूरिझम डे' च्या निमित्ताने लोणावळ्यात हा ज्येष्ठ मित्र पुन्हा भेटला.

आणि, जग जेवढं बहुध्रुवीय, तेवढंच बहुआयामी सुंदर असल्याचा साक्षात्कारही पुन्हा एकदा झाला!

Similar News