वाटलं होतं की कोविडनंतर लोक बदलतील!

सरकारी आकडेवारीनुसार केविड मुळे पाच लाख लोकांचा मृत्यू झाला. जगण्याची आणि मृत्यू ची लढाई लढताना त्या संकटात डॉक्टर महत्वाचा होता. आज कोविडच्या संकटाने थोडी उसंत घेतली असताना दुसऱ्यांदा जगण्याची संधी मिळालेल्या माणसाला काय म्हणावे असा प्रश्न उपस्थित केला आहे, वैद्यकीय व्यवसायी आणि लेखक डॉ. प्रकाश कोयाडे यांनी.. .

Update: 2022-04-26 04:36 GMT

जगण्याची एक संधी मिळावी म्हणून या काकांनी माझा हात घट्ट पकडून ठेवलेला अजूनही आठवतोय... त्यांना ती संधी मिळालीच नाही!

कोविडमुळे पाच लाखांहून अधिक लोक या देशात आपल्या डोळ्यासमोर गेले, प्रत्येकाच्या घरातील, नात्यातील किमान एकजण एका न दिसणाऱ्या विषाणूने मारुन टाकला. त्यावेळी आपल्या मनात काय विचार होते हे प्रत्येकाने स्वतःला एकदा विचारून पाहावे. सगळं पहिल्यापासून सुरुवात करू, पुन्हा उभं राहू... फक्त या आजाराच्या संकटातून बाहेर पडावं, आपल्याला एक संधी मिळावी हाच विचार प्रत्येकाच्या मनात होता ना?

आपल्याला ती संधी मिळालीही... आणि आपण काय करतोय?

जागतिक पातळीवरील रशिया-युक्रेन युद्ध असो की भारतातील दंगली असो... की महाराष्ट्रातील सध्याचं किळसवाणं राजकारण असो... माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे!

तीनशे पासष्ट दिवसांपूर्वी आपल्या नातेवाईकांसाठी बेड उपलब्ध होत नव्हते, बेड मिळाला ऑक्सिजन पुरत नव्हता, ऑक्सिजन मिळायचा तर औषधं नव्हते... आणि कुठेतरी हे सगळं मिळायचं तर व्हेंटिलेटर नसायचं. स्वतःच्या गळ्याभोवती बोटं गच्च पकडून, घोगऱ्या आवाजात... "डॉक्टर वाचवा... जीव घाबरलाय" म्हणत तरणीताठी पोरं जीव सोडताना बघितली आहेत...

खरंतर त्यांचं कर्तव्य होतं, व्यवहारिक भाषेत त्यांना त्याचे पैसे मिळायचे पण तरीही त्यापलीकडे जाऊन सफाई कर्मचाऱ्यांनी आपलं योगदान दिलं, रुग्णांचं हागणं मुतणं साफ केलं, सिस्टर लोकांनी घरी लेकरं बाळं सोडून त्या नरकयातना देणाऱ्या किट घालून अठरा-वीस तास काम केलं, आपल्या जीवाचा विचार न करता असंख्य डॉक्टरांनी उपचार केले. ते सर्व काही आजचा दिवस पाहण्यासाठी नक्कीच नव्हतं...माणूस जगला पाहिजे हीच सर्वांची एकमेव इच्छा होती!

शंभर वर्षांपूर्वी युरोपमध्ये आलेल्या साथीच्या रोगांनी त्यांच्या जगण्याच्या पद्धती बदलल्या. साफसफाई आली, बंद नाल्या आल्या, खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल आला, वरून 'सॉरी' बोलणं आलं... आपण एवढ्या मोठ्या आजाराच्या लाटेनंतर काय शिकलो? धर्म, जाती, दंगली,झेंडे आणि अजेंडे? शतकातून एखादी अशी आपत्ती येते जी माणसामध्ये परिवर्तन घडवून आणते... इथे आपण रानटी माणसासारखं एकाच वर्षात काही शतकं मागे गेलोय! आपत्तीच्या काळात जात, भाषा, धर्म, अस्मिता, अजेंडा असलं काहीच नव्हतं... एक माणूस दुसऱ्या माणसाला वाचविण्यासाठी शक्य होईल ते सर्व काही करत होता एवढं सरळ सोपं होतं... एकाच वर्षात सगळं संपलंय!

आपली प्राथमिकता काय आहे हे अजूनही कळू नये यापेक्षा दुर्दैव ते काय? सत्ताधारी असो की विरोधक... यांची पोटं भरलेली आहेत, यांच्या पुढच्या सात पिढ्या बसून खाणार आहेत. भरल्यापोटी त्यांचे खेळ सुरू आहेत! नोकऱ्या, महागाई या गोष्टी तर फार दूरच्या राहिल्या पण उद्या जर ही किंवा अशी आपत्ती पुन्हा आली तर आपली तयारी काय आहे हा प्रश्न आज विचारणं गरजेचं असताना आपणच जर अर्थहीन अस्मितेमध्ये आनंदी होत असू तर मग आज ना उद्या आपली लायकी साथीच्या रोगात मरण्याचीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही.

कसल्या राजकारण आणि धर्मकारणाच्या टिमक्या वाजवता... श्वास पुरत नव्हता म्हणून पायाच्या टाचा घासून गोळामोळा झालेल्या पाचशेहून अधिक बेडशीट अजून नजरेसमोर आहेत...! आपण त्यांच्यापैकी एक नव्हतो, आपल्याला दुसरी संधी मिळाली आहे ही गोष्ट पुढचं आयुष्य समाधानाने जगण्यासाठी पुरेशी आहे.

डॉ. प्रकाश कोयाडे

Tags:    

Similar News