Jawaharlal Nehru स्वातंत्र्यानंतर आधुनिक भारत घडविणारा देशाचा भाग्यविधाता

आज भारताचे महान स्वातंत्र्य-सेनानी, पहिले पंतप्रधान आणि आधुनिक भारताचे निर्माते पंडित नेहरू यांची जयंती आहे. त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील आणि आधुनिक भारत निर्मितीतील योगदान सर्वज्ञात आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील काही प्रसिद्ध नसलेल्या पैलूंची माहिती सांगताहेत लेखक सुनील सांगळे...

Update: 2025-11-14 06:16 GMT

आज भारताचे महान स्वातंत्र्य-सेनानी, पहिले पंतप्रधान आणि आधुनिक भारताचे निर्माते पंडित नेहरू यांची जयंती आहे. त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील आणि आधुनिक भारत निर्मितीतील योगदान सर्वज्ञात आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील काही प्रसिद्ध नसलेल्या पैलूंची ही माहिती.

वडिलांच्या प्रचंड चालणाऱ्या वकिलीमुळे आणि एकुलता एक पुत्र असल्याने Jawaharlal Nehru जवाहरलाल नेहरू यांचे बालपण एखाद्या राजपुत्रासारखे गेले. मोतीलाल नेहरूं कायम सुटाबुटात असत आणि त्यांच्या वॉर्डरोबमध्ये लंडनमधील उच्चभ्रू लोक ज्या ठिकाणी सूट शिवत, त्या Savile Row या दुकानात शिवलेले सूट असत. त्या काळात दुर्मिळ असलेल्या काही सुविधा म्हणजे वीज आणि नळाचे पाणी त्यांच्या घरी होत्या. याशिवाय त्यांच्या या बंगल्यात तरण-तलाव आणि टेनिस कोर्ट हे ही होते. १९०४ साली अलाहाबादमध्ये मोटारगाडी असलेले ते पहिले गृहस्थ होते. जवाहरलाल हा मोतीलाल नेहरूंना नवसाने झालेला एकुलता एक मुलगा असल्याने जवाहरलाल यांचे सगळे लाड पुरवले जात यात काहीच आश्चर्य नव्हते. त्यांच्यासाठी इंग्लंडमधून आधुनिक खेळणी आणली जात आणि त्या काळात नुकताच शोध लागलेल्या तीन-चाकी व दुचाकी सायकली त्यांच्यासाठी आणल्या गेल्या होत्या.

या मुलाला सर्वोत्तम शिक्षण मिळावे म्हणून वडिलांनी घरीच शिकविण्यासाठी ब्रिटिश गव्हर्नेसची नियुक्ती केली होती. या गव्हर्नेसमुळेच जवाहरलालला विज्ञान आणि धार्मिक तत्वज्ञान यात लहानपणीच रुची निर्माण झझाली ती इतकी की ऍनी बेसंट यांनी त्यांना अवघ्या १३ व्या वर्षी थिऑसॉफिकल सोसायटीत सदस्य करून घेतले. जवाहरलाल यांना जगातील सर्वोत्तम शिक्षण मिळावे म्हणून महाविद्यालयीन शिक्षणासाठी ट्रिनिटी कॉलेज, केम्ब्रिज इथे पाठविण्यात आले.

हे कॉलेज १५४६ साली स्थापन झाले होते आणि त्याकाळी ते जगातील सर्वोत्तम कॉलेजपैकी एक होते. या कॉलेजच्या ३४ विद्यार्थ्यांना पुढे विविध क्षेत्रात नोबेल पारितोषिके मिळाली आहेत, आणि इथे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यातूनच पुढे इंग्लंडचे सहा पंतप्रधान, पाच फिल्ड मार्शल, आयझॅक न्यूटन सारखे शास्त्रज्ञ, श्रीनिवास रामानुजम यांच्यासारखे गणितज्ञ, लॉर्ड बायरन आणि लॉर्ड टेनिसनसारखे कवी, लॉर्ड मेकोलेसारखे इतिहासकार, आणि बर्ट्रांड रसेलसारखे थोर तत्वज्ञ निर्माण झाले. महान विद्यार्थ्यांच्या या प्रभावळीत जवाहरलाल नेहरू यांचे नाव आज अग्रस्थानी आहे.

केम्ब्रिज विद्यापीठाची पदवी मिळाल्यानंतर, नेहरूंनी लंडनमधील इनर टेम्पल इन या प्रख्यात संस्थेतून बॅरिस्टरची पदवी मिळवली तेंव्हा ते २३ वर्षांचे होते. या संस्थेतूनही क्लेमेंट ऍटली आणि जॉर्ज ग्रेनव्हिल हे इंग्लंडचे दोन पंतप्रधान बॅरिस्टर झाले होते. आपण जेंव्हा नेहरूंचे आधुनिक विचार व वर्तणूक, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता, बंधुता इत्यादी मूल्यांबद्दलची त्यांची भूमिका यांचा विचार करतो, तेंव्हा त्यांची ही जी जडणघडण झाली आहे त्याचे भान ठेवणे आवश्यक आहे.

नेहरू नंतरच्या काळात ब्रिटिश पंतप्रधान, खासदार, क्रिप्स आदी आयोगांचे अध्यक्ष, आयसीएस अधिकारी यांच्याशी ज्या अधिकारवाणीने बोलायचे व वागायचे त्याचे कारण ब्रिटनमधीलच जगातील सर्वोत्तम विद्यापीठात, व ज्या ठिकाणी ब्रिटनच्या राजघराण्यातील व्यक्ती व इतर सर्व अभिजनांचे शिक्षण व्हायचे, त्याच ठिकाणी त्यांचे सर्व शिक्षण झाले होते हे होते. याबद्दल रिचर्ड हाफ हे ब्रिटिश इतिहासकार लिहितात की “ब्रिटिशांशी वाटाघाटी करतांना नेहरूंना त्यांच्या या पार्श्वभूमीचा फार फायदा व्हायचा, कारण अनेक बाबतीत हे "इंग्रजांपेक्षाही जास्त इंग्रज" होते.

अशा ऐश्वर्यात राहिलेल्या जवाहरलाल आणि त्यांच्या वडिलांनी पुढे महात्मा गांधींच्या चळवळीत सामील झाल्यावर आपली जीवनशैली आमूलाग्र बदलली आणि स्वेच्छेने सामान्य माणसाचे जीवन पत्करले. मोतीलाल आणि जवाहरलाल या दोघांनीही सरकारी न्यायालयात वकिली सोडून दिल्याने त्यांच्याकडे उत्पन्नाचे साधनच राहिले नव्हते. १९३० च्या दशकात पंडित नेहरूंची आर्थिक परिस्थिती वाईट झाली होती. मोतीलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर तर खर्चाची उत्पन्नाबरोबर तोंडमिळवणूक होणेही कठीण झाले होते. आनंद भवन या राजेशाही घराची देखभाल आणि त्यासाठी ठेवलेल्या मोठ्या नोकरवर्गाचे पगार देणे त्यांच्यासाठी अवघड झाले होते. आनंद भवन मधील महागड्या वस्तू आणि फर्निचर हे एकतर त्यांनी विकून टाकले किंवा सरकारने त्या गोष्टी जप्त करून टाकल्या होत्या.

पंडितजींचे स्वतःचे लग्न जेंव्हा १९१६ साली झाले होते तेंव्हा ते प्रचंड डामडौलात झाले होते. वऱ्हाडी तर खास रेल्वेगाडी बुक करून आणले गेले होते व दिल्लीत एक खास "विवाह छावणी" उभारण्यात आली होती या अनेक दिवस रोज मेजवान्या सुरु होत्या. परंतु ही परिस्थिती १९३३ मध्ये संपूर्ण बदलली होती. त्यांच्या लहान बहिणीचे लग्न झाले तेंव्हा तिच्यासाठी लग्नसमारंभाला साजेल असे कपडे आणि इतर वधूला लागणाऱ्या गोष्टी घेण्याची ऐपतही राजपुत्राचे बालपण जगलेल्या या भावात राहिली नव्हती.

लग्नाच्या विधीसाठी जेंव्हा जवाहरलाल या लहान बहिणीला घ्यायला गेले, तेंव्हा ते खेदाने म्हणाले की "तू तर वधू दिसतच नाहीस!". पण त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी आपल्या कोटाचे लाल गुलाबाचे फुल तिच्या केसात माळून विषय संपवून टाकला. याच कालावधीत कमला नेहरू या गंभीर आजारी होत्या. तरीही जे लोक नेहरूंना आर्थिक मदत देऊ करत ती स्वाभिमानी जवाहरलाल सरळ नाकारत. स्वतः महात्मा गांधी तर अनेकदा उद्योगपती बिर्ला यांच्या घरी उतरत. याच बिर्ला यांनी नेहरूंची ही हलाखीची परिस्थिती बघून त्यांना महिन्याला काही ठराविक आर्थिक मदत देऊ करण्याचा प्रस्ताव त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था केली. त्यांचा उद्देश एवढाच होता की कुटुंब सांभाळण्याच्या सामान्य व्यापातून या बुद्धिमान नेत्याची सुटका व्हावी आणि त्यांनी संपूर्ण लक्ष देशसेवेवर केंद्रित करावे.

त्या कालावधीत काँग्रेसमधील जो गट भांडवलशाही विरोधात जहाल समाजवादी विचार मांडत होता त्याचे प्रणेते जवाहरलाल हे होते. त्यामुळे त्यांच्या या प्रस्तावाने नेहरू बिथरले आणि त्यांनी या प्रस्तावाला जणू काही बिर्ला हा "भांडवलदार" त्यांना त्यांच्या "पे रोल" वर घेऊ पाहत आहे असे मानून ठोकरून लावले.

नेहरूंच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना येण्यासाठी एक प्रसंग पुरेसा आहे. नोव्हेंबर १९२४ मध्ये कमला नेहरू यांनी एका मुलाला जन्म दिला, परंतु तो मुलगा जगला नाही. त्यातच त्यांना टीबी झाला आणि त्यांना उपचारासाठी युरोपला घेऊन जाणे गरजेचे झाले. पण सोन्याचा चमचा तोंडात धरून जन्मलेल्या आणि देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सर्वस्व दान केलेल्या जवाहरलाल यांच्याकडे या महागड्या उपचारासाठी पैसे नव्हते.

पंडित नेहरू आपल्याला फक्त आपले पंतप्रधान म्हणून माहित आहेत. पण ते एक सिद्धहस्त लेखक देखील होते. त्यांच्या या पैलूबद्दल असे सांगितले जाते की त्या काळातील जगातील सर्वोत्कृष्ट पाच इंग्रजी लेखकात त्यांचा समावेश केला जाई. आजही त्यांची पुस्तके लाखोंच्या प्रतीत विकली जातात आणि त्यांची भाषांतरे जगातील अनेक भाषेत झालेली आहेत. पाश्चात्य विद्यापीठात भारताचा अभ्यास करण्याबाबत जे अभ्यासक्रम आहेत, त्यात नेहरूंच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचा समावेश असतोच.

त्यांच्या देखणेपणाबद्दल नेहरू सुप्रसिद्धच होते. “तुम्हाला कोणाचे व्यंगचित्र काढणे अवघड गेले” या प्रश्नावर बोलतांना सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांनी एकदा सांगितले होते की पंडित नेहरूंच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात एवढा देखणेपणा होता की त्यात काहीही दोष सापडत नव्हता आणि आणि असा दोष सापडल्याशिवाय व्यंगचित्रकार त्याचे कामच करू शकत नाही. शेवटी त्यांनी एकदा नेहरूंचा टोपी न घातलेला फोटो पाहिला आणि त्यानंतर त्यांनी कायम नेहरूंचे टक्कल असलेले व्यंगचित्रच काढले.

या सगळ्या गोष्टींमुळे नेहरूंची आंतरराष्ट्रीय लोकप्रियता प्रचंड होती. इजिप्तमध्ये तर नेहरूंची लोकप्रियता एवढी होती की फिलिप टॉलबॉट या अमेरिकन राजनीतिज्ञाला ईजिप्तमधील घराघरात नेहरूंची भिंतीवर टांगलेली पोर्ट्रेट्स पाहून आश्चर्याचा धक्काच बसला, कारण एखाद्या देशाच्या पंतप्रधानांची पोर्ट्रेट्स एखाद्या वेगळ्याच देशातील घरात लावलेली असणे ही गोष्ट तशी तेंव्हा आणि आताही दुर्मिळच आहे.

नेहरूंच्या प्रचंड आंतरराष्ट्रीय लोकप्रियतेचा एक किस्सा एम.ओ.मथाई यांनी त्यांच्या पुस्तकात दिला आहे. नेहरू आणि चार्ली चॅप्लिन यांची स्वित्झर्लंडमध्ये भेट व्हायची होती, आणि तेंव्हा मथाई चॅप्लिन यांच्याशी बोलत बसलेले असतांना चॅप्लिन यांनी सांगितले की ते ग्रेट गार्बो या हॉलिवूडच्या सुप्रसिद्ध नायिकेचे एवढे मोठे चाहते आहेत की त्यांनी एकदा तिच्या परवानगीने तिच्या गुढघ्याचे चुंबन घेतले होते.

यावर मथाई यांनी त्यांनी स्वतः पाहिलेला एक प्रसंग सांगितला की नेहरू एकदा न्यूयॉर्क मधील वोल्ड्रॉफ ऍस्टोरीया हॉटेलमधून बाहेर पडणार होते. तेंव्हा त्यांना पाहायला लोकांनी जी रांग लावली होती, त्यात ग्रेट गार्बोदेखील होती. यावर चार्ली चॅप्लिन यांनी सांगितले की ग्रेट गार्बो अशी गोष्ट जगातील कोणत्याही पंतप्रधानासाठी करणे शक्य नाही, व तिने नेहरूंसाठी हे केले, कारण माझ्यासाठी, किंवा ग्रेट गार्बोसारख्या इतर खूप लोकांसाठी नेहरू हे फक्त भारताचे पंतप्रधान नाहीत, तर त्याहूनही खूप काही जास्त आहेत.

आणि ही गोष्ट खरीही होती, कारण ग्रेट गार्बो कोणी सामान्य हॉलिवूड अभिनेत्री नव्हती. सन १९९९ मध्ये अमेरिकन फिल्म इन्स्टिटयूटने सार्वकालिक महान अभिनेत्रीची जी यादी तयार केली, त्यात तिचा पाचवा क्रमांक होता.

भारतातील गोरगरीब आणि विशेषतः शेतकरी वर्गात नेहरूंची लोकप्रियता प्रचंड होती.नेहरू जेंव्हा उत्तर भारतात ग्रामीण भागात दौरे काढत काढत तेंव्हा दर काही मैलांवर २० ते २५ हजाराचा जमाव असे व दिवस अखेरच्या सभेस अनेकदा लाखाचा जमाव असे. त्या काळात बरेच ठिकाणी ध्वनिक्षेपक नसल्याने भाषणासाठी नव्हे केवळ नेहरूंना पाहण्यास येत ही वस्तुस्थिती होती. देशाच्या ग्रामीण दुर्गम भागात तर नेहरू येणार असतील तर ज्या ठिकाणी रस्ता नसेल त्या ठिकाणी लोक श्रमदानाने रातोरात रस्ते तयार करीत. आणि नेहरूदेखील जनसंपर्कासाठी दुर्गम भागात जाण्यासाठी बैलगाडी, घोडा, होडी, सायकल किंवा ते ही शक्य नसेल तर चालत जायला तयार असत.

स्वातंत्र्यपूर्व काळात देशासाठी स्वखुशीने आर्थिक दुरवस्था पत्करून एक दशक तुरुंगात घालवणारा हा महान नेता स्वातंत्र्यानंतर आधुनिक भारत घडविणारा देशाचा भाग्यविधाता कसा झाला ही तर समाजमाध्यमांवर सांगता येणारी गोष्टच नाही. नेहरूंचे केवळ एकच योगदान सांगायचे झाले तर वैयक्तिकरित्या मी ते म्हणेन की आज सत्तर वर्षे भारतात जी लोकशाही रुजली आहे तीच त्यांची या देशाला सर्वात मोठी देणगी आहे.

सुनिल सांगळे

लेखक

Similar News