विश्लेषण : धर्मांधता आणि समाजमाध्यमे...

अतिरेकी धार्मिक पोस्ट फिरवणारे लोक प्रत्यक्षात तितके कडवे असतात का, तर नाही. ते सर्वसामान्य लोकच असतात, पण आता विशिष्ट धर्मियांचा द्वेष करणे त्यांना वर्षानुवर्षे शिकविले गेल्यामुळे आता बहुतांश लोक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीत, धर्मांधता आणि समाज माध्यमांविषयी सांगताहेत लेखक सुनील सांगळे...

Update: 2022-07-10 03:07 GMT

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावरून जो गदारोळ झाला, त्यातून अमरावती येथील उमेश कोल्हे या केमिस्ट दुकानदाराचा खून झाला. ज्याने खून केला तो कोल्हे यांचा मित्र म्हणता येईल एवढ्या जवळच्या ओळखीचा युसूफ नावाचा इसम आहे. तो पशूंचा डॉक्टर आहे व कोल्हे यांचा नियमित ग्राहक आहे. इतकेच नाही तर त्याच्या ओळखीने इतर पशू-डॉक्टरही कोल्हेंचे ग्राहक झाले होते. ही त्यांची व्यावसायिक ओळख चांगली १६ वर्षे जुनी होती. थोडक्यात ही सगळी मंडळी मध्यमवर्गीय व सुशिक्षित आहेत. या मित्रांचा एक "ब्लॅक फ्रिडम" या नावाचा व्हाट्सअप ग्रुप होता.

मग हे का घडले? कारण आज सर्वच मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्यात राजकारणापायी (विशेषतः धार्मिक प्रश्नांवरून) सरळ दोन तट पडले आहेत. पूर्वी लोक पंचवार्षिक निवडणुका आल्या की तेवढ्यापुरते राजकारणावर बोलत आणि मग सगळे विसरून कामाला लागत. २०१४ पासून 24X7 राजकारण हा मंत्र झालाय. त्यातच टीव्ही चॅनेल्सचा अतिरेकी भडीमार आणि समाजमाध्यमांचा अतिवापर याची भर पडली आहे. रिकामटेकडी तरुणाई आणि तितकेच रिकामटेकडे वृद्ध हा समाजात आज मोठा वर्ग आहे. शेकडो ग्रुप्स, त्यावरील हजारो मेसेजेस हा जणू प्रत्येकाच्या टाईमपासचा अविभाज्य भाग आहे. या परिस्थितीचा फायदा राजकीय पक्षांनी घेऊन आपापले आयटी सेल स्थापन केले आहेत. त्यात सहज माथी भडकविता येणारे विषय म्हणजे धार्मिक किंवा जातीय विद्वेष पसरवणे! त्यामुळे टीव्ही चॅनेल्सवर तेच लोकप्रिय कार्यक्रम! या प्रकारचा आता त्याचा अतिरेक झाला आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती प्रकरण पाहिले पाहिजे.

नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ कोल्हे यांनी एक पोस्ट ग्रुपवर टाकली. त्याचा राग येऊन त्यांचा थेट खून करण्यात आला. अर्थात कोल्हे यांची ही अशी पहिली पोस्ट असेल का? शक्यता नाही. रोज ठराविक लोक अशा पोस्ट टाकतांना आपण पाहतो. त्यावरून वादही होतात. ज्या ग्रुप्सवर इतर धर्मीय लोक आहेत त्यांना काय वाटेल याचाही विचार न करता त्यांच्या धर्माबद्दल अवमानकारक पोस्ट केल्या जातात. हे इतर धर्मीय शाळा-कॉलेजातील जवळचे मित्र किंवा ऑफिसमधील आजी/माजी सहकारी असले त्याचीही पर्वा न करण्याइतपत लोक आता निर्ढावलेले आहेत. माझा अनुभव असा आहे की वारंवार समज देऊनही अनेक लोक ते उद्योग सुरूच ठेवतात आणि शेवटी त्यांना ग्रुपमधून (उदा. ऑफिसचे, मित्रांचे ग्रुप) काढून टाकावे लागते. हे अतिरेकी धार्मिक पोस्ट फिरवणारे लोक प्रत्यक्षात तितके कडवे असतात का? तर नाही. ते सर्वसामान्य लोकच असतात, पण आता विशिष्ट धर्मियांचा द्वेष करणे त्यांना वर्षानुवर्षे शिकविले गेल्यामुळे आता बहुतांश लोक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीत. खोट्यानाट्या बातम्या/व्हिडीओ/मिम्स इत्यादी पाहून एक मोठा वर्ग ब्रेनवॉश झाला आहे. हजारो वर्षांचे बदले घेण्याची व इतिहासाचे पुनर्लेखन करण्याची भाषा आता केली जाते.

आता सध्याच्या नुपूर शर्मा प्रकरणाची सुरवात कुठून झालीय? ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणात एक शिवलिंग सापडले असे एक बाजू म्हणते. ते शिवलिंग नाही असे विरोधी बाजू म्हणते. त्यावरून भडकाऊ स्टेटमेंट्स झाली व मग एका चर्चेत नुपूर शर्मांनी ते वादग्रस्त विधान केले. अशा भडकाऊ चर्चा आयोजित करणे हा चॅनेल्सचा टीआरपी वाढवण्याचा आता सोपा मार्ग आहे. त्यातून मग वाद वाढून कोणीतरी असे बोलून जातो. त्यावरून मग समाजमाध्यमात युद्धच सुरु होते. परिणाम काय होतो? या प्रकरणात एक व्यक्ती १६ वर्षे संबंध असलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या खुनाचा कट रचते. जो मारला गेला त्याला पत्नी, मुलगा व सून आहे आणि इतर कुटुंबीय धरून ते कुटुंब ४०/५० लोकांचे आहे. जो आता पकडला गेला त्याला चार बहिणी व जुळी मुले आहेत. थोडक्यात दोन परिवार यात उध्वस्त झाले.

याची जबाबदारी कोणाची? नुपूर शर्मांची? टीआरपी साठी असल्या चर्चा आयोजित करणाऱ्या चॅनेल्सची?

ज्ञानवापी वाद पेटवणाऱ्यांची? की असल्या अनेक वादांची मोठी लिस्ट तयार असणाऱ्या मेंदूंची? कारण ज्ञानवापी वाद संपला तर मथुरा आहेच. तो संपला तर ताजमहाल सुरु करता येईल. लाल किल्ला, कुतुबमिनार, औरंगझेबाची कबर असे काहीही तयार करता येतील. यात आता असेही सांगितले जात आहे की ही हत्या एका मोठ्या कटाचा भाग आहे. पण असल्या कटांची बियाणे रुजायला सुपीक भूमी कशी निर्माण होते? बाबरी आंदोलन-बाबरी पतन-मुंबई दंगली-मुंबई बॉम्बस्फोट अशा घटनांची मालिका पाहिली तर अशा विध्वंसक गोष्टींची सुरवात कशी होते ते लक्षात येईल. हे असले वाद वाढतच राहिले तर अशा घटना पुन्हा पुन्हा होतील हे समजायला आणि त्यात अशाच सामान्य माणसांचे बळी जातील हे कळायला आपण आईन्स्टाईन असायची गरज नाही.

Similar News