‘मूकनायक’च्या जन्मशताब्दीनिमीत्त…

Update: 2020-04-13 21:14 GMT

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या ‘मूकनायक’ या पत्रकाला ३१ जानेवारी २०२० या दिवशी १०० वर्षे पूर्ण झाल्यामुळे हे वर्षे बाबासाहेबांच्या पत्रकारितेचे शताब्दीवर्ष ठरते. बाबासाहेबांनी जीवनाच्या प्रत्येक अंगोपंगांचे सखोल ज्ञान मिऴवून त्यावर भाष्य केलेले दिसते. भारतातील अस्प्पृत्तेचा प्रश्न असो, अर्थशास्त्रीय समस्यांची उकल असो, प्राचीन इतिहासातील अस्पष्टता असो, जमीनीचे वाटप, पाण्याचे गांभीर्य असो वा समता स्वातंत्र्याचे यशोगान असो, बाबासाहेबांनी हे सगळं लिलया पेलले.

एवढेच नव्हे भारतीय संविधानाचे शिल्प कोरुन जागृत लोकशाहीचा पुकारा करत अवघ्या विश्वाला कवेत घेण्यात ते यशस्वी ठरले. परंतु हे सगळे अधोरेखित होत असता एका कर्तृत्वाकडे कानाडोळा करीत त्यांच्या पत्रकारितेला ठोकारण्यात आले. खरे तर त्यांच्या पत्रकारितेमुळेच ते आपले लढाऊ संघटन उभे करु शकले, आपले इप्सित साध्य करु शकले. परंतु पत्रकार बाबासाहेब आंबेडकर हा प्रकार जाणीवपूर्वक नाकारला गेला.

स्वातंत्र्यपूर्व काळातील सगळेच नेते हे पत्रकार होते. बाबासाहेबही त्याच पठडीतले. परंतु टिळक–आगरकरांची पत्रकारिता मान्य करण्यात आली पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नाही. याचे कारण बाबासाहेब हे अतिशुद्र होते. त्यांच्या शरीरावर उमटविलेला अतिशूद्रेतेचा डाग शंभर वर्षातसुध्दा नष्ट झाला नाही. याचे कारण भारत देश हा वर्चस्ववादाचा अभिभोक्ता आहे.

विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापासूनच सुधारणांचे वारे वाहू लागले होते. ब्रिटीश संसदेत चर्चा झाल्यावर काही समित्या भारतामध्ये पाठविल्या जात होत्या. १८८५ साली ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या सदस्यांनुसार काँग्रेस पक्षाची निर्मीती झाली होती. तर त्याच वर्षी सर सय्यद अहमदखान यांनी हिंदू संस्कृती आणि मुस्लिम संस्कृती यातला फरक सांगत सर सय्यद अहमदखान देशभर फिरुन अल्पितावाद बिबंवत होते. परिणामी भारतीय राजकारणात काँग्रेस आणि मुस्लीम लीग हे पक्ष महत्वाची भूमिका वटवीत होते.

भारतीय अस्पृश्यांना स्वतंत्र व्यक्तिमत्व (Identity) नव्हती. कारण काँग्रेसचे हिंदू नेतेच अस्पृश्यांचे प्रतिनिधीत्व करीत होते. ज्यांना अस्पृश्यतेमुळे चटके कधी सहन करावे लागलेच नव्हते, ते स्पृश्य नेते अस्पृश्यांचे प्रतिनिधीत्व करतात याला डा भीमराव आंबेडकर यांचा विरोध होता.

याच दरम्यान मांटेग्यू चेम्सफर्ड सुधारणांच्या अंतर्गत साऊथबरो कमेटी भारतातील निरनिराळ्या जातींची सत्ताधिकार विषयक निवेदन घेत फिरत होती. या समितीसमोर साक्ष देण्यास डॉ. आंबेडकर उत्सुक होते. परंतु ते शासकीय अधिकारी असल्यामुळे त्यांना तसे करता येत नव्हते. महार जातीच्या प्रतिनिधीत्वाबद्दल ब्रिटीश शासनाला माहिती मिळावी म्हणून आंबेडकर यांनी ‘टाईम्स आफ इंडिया’मध्ये १६ जानेवरी १९१९ या दिवशी ‘ए महार’ या नावाने पत्र लिहले.

या पत्रात त्यांनी लिहले होते, “स्वराज्य हा जसा ब्राह्मणांचा जन्मसिध्द हक्क आहे, तसा महारांचाही आहे. ही गोष्ट कोणीही मान्य करेल. म्हणून पुढारलेल्या वर्गांनी दलितांना शिक्षण देऊन त्यांच्या मनाची आणि सामाजिक दर्जाची उंची वाढवणे हे त्याचे आद्यकर्तव्य आहे. हे जोवर होणार नाही तोवर भारताच्या स्वराज्याचा दिन बराच दूर राहणार हे निश्चीत आहे.”

डॉ. आंबेडकर पत्र लिहून गप्प राहिले नाहीत तर त्यांनी ब्रिटीश सरकारकडे साउथबरो कमटीसमोर साक्ष देण्याची परवानगी मागितली. अस्पृश्य समाजातील एकमेव अशा उच्चविद्याविभूषीत आंबेडकरांची विनंती मान्य केली. आंबेडकरांनी रोजी साऊथबरो कमिशनसमोर साक्ष दिली. याच दिवशी ‘डिप्रेस्ड क्लास मिशन’च्या विठ्ठल रामदजी शिंदे यानीही साक्ष दिली. शिंदे यांच्या साक्षीचे वृताकंन तात्कालीन वृत्तपत्रात प्रसिध्द झाले, परंतु आंबेडकरांचे नाही. याचे कारण वृत्तपत्रेही जातीयवादी होती. त्यानांही अस्पृशांचा विटाळच होत होता.

हा विटाळ इतका उच्चदर्जाचा होता की, टिळकांच्या ‘केसरी’ने बातम्या तर प्रसिध्द केल्या नाहीतच, पंरतु ‘मूकनायक’ची जाहिरात आणि मोबदल्यापोटी पाठवलेले ३ रुपयेही परत पाठविले. या प्रवृत्तीमुळे वर्तमानपत्राची किती आवश्यकता आहे हे डाँ. आंबेडकरांना उमगले. त्यांच्या मतानुसार एखाद्या पक्षाला आकाशात संचार करायचा असेल तर त्याला पंखाची गरज असते. पंखाशिवाय पक्षी उंच भरारी घेऊ शकत नाही. तसंच मुखपत्रविरहीत समाज उन्नती करु शकत नाही.

डॉ. आंबेडकरांनी निश्चय केला आणि त्यांचे सहकारी कामाला लागले. दत्तोबा पोवार हे त्यापैकीच एक. त्यांनी डॉ. आंबेडकरांची भेट राजर्षी शाहू महाराज यांच्याशी करुन दिली. डॉ. आंबेडकरांची तळमळ पाहून शाहू महाराज एवढे प्रभावित झाले की, त्यांनी तात्काळ रु. २५०० ची आर्थिक मदत केली. एक राजा एखाद्या सामान्य माणसाच्या घरी जातो आणि त्याच्या समाजोध्दारक कार्याबद्दल मदत करतो ही जागतिक इतिहासातील अनोखी बाब आहे.

डॉ. आंबेडकरांनी या मदतीच्या आधारे दि. ३१ जानेवारी १९२० रोजी ‘मूकनायक’ हे मुखपत्र सुरू केले. अशिक्षीत, असंघटीत अशा अस्पृश्य समाजाची मोट बांधून त्यांना संघर्षासाठी तयार केले. डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या लढ्यातील सगळ्यात तेजस्वी शस्त्र होते ते बाळासाहेबांचे ‘मूकनायक’ हे पत्र. या पत्राला १०० वर्षे पूर्ण झाल्यामुळे देशभर मूकनायकाची जन्मशताब्दी साजरी करुन ‘पत्रकार आंबेडकर’ या पैलूचा मागोवा घेतला जात आहे.

- ज. वि. पवार

Similar News