"भारताच्या $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्राचा पुढाकार महत्त्वाचा !"

राजकारण हे समाजात परिवर्तन घडवून आणण्याचे माध्यम आहे. त्यामुळे सत्ताधारी असोत किंवा विरोधी पक्ष असोत, सर्वांनी समाज परिवर्तनासाठी सकारात्मक योगदान देण्याची भूमिका घेतली पाहिजे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मॅक्स महाराष्ट्रच्या चिंतन या विशेषांकात लिहिलेला लेख पुन:प्रकाशित करत आहोत.

Update: 2025-12-09 20:06 GMT

Maharashtra महाराष्ट्राची लोकसंख्या १३ कोटींच्या आसपास म्हणजे India भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ९ ते १० टक्के आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नातील (GDP) महाराष्ट्राचा वाटा १३ टक्क्यांच्या आसपास आहे. इतर राज्यांच्या तुलनेत जीडीपी आणि दरडोई उत्पन्न समाधानकारक वाटत असले तरी ते १३ कोटींच्या लोकसंख्येसाठी आणि त्यातही ग्रामीण भागातील समृद्धीच्या अनुषंगाने ते आणखी वाढायला हवे आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या विकासाचे समग्र व्हिजन Vision असणे आवश्यक आहे. 

एक मॉडेल राज्य बनण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी महाराष्ट्रात आहेत. चांगले रस्ते, महामार्ग, समृद्धी महामार्गासारखा मोठा प्रकल्प, वीज निर्मिती, उद्योगांची मोठी संख्या, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळ, Mumbai मुंबईसारखे देशाची आर्थिक राजधानी असलेले शहर, Nagpur नागपूरसारखे भारताच्या ह्रदयस्थानी असलेले शहर, देशाची शैक्षणिक राजधानी मानले जाणारे पुण्यासारखे शहर, वन्यजीव, वने, खनिजे अशा अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या विकासासाठी आतापर्यंत उपयुक्त ठरत आल्या आहेत, त्या भविष्यातही उपयोगी ठरतील. 

गेल्या दशकभरात आमच्या केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून देशभरात रस्ते व महामार्गाचे उत्तम जाळे निर्माण झालेले आहे. मी व्यक्तिगत पातळीवर माझ्या गृह राज्यातील विकास कामांची काळजी घेतली. त्यामुळे आता महाराष्ट्रातील रस्ते-महामार्गाचे जाळे हा आपल्या भविष्यातील सामाजिक, आर्थिक, औद्योगिक विकासासाठी उपयुक्त ठरणारा घटक आहे. मुंबई - नागपूर- समृद्धी महामार्ग हा आणखी एक महत्वाचा प्रकल्प असून, राष्ट्रीय महामार्गाच्या सोबतच हा प्रकल्पही महाराष्ट्राच्या प्रगतीला चालना देणारा ठरणार आहे. 

महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेले नागपूर शहर हे देशाच्या केंद्रस्थानी असलेले शहर म्हणून विकसित होत आहे. नागपूर आणि विदर्भात नव्या औद्योगिक क्रांतीचा आरंभ होत आहे. अशाच प्रकारे मराठवाडा, खानदेश, कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रातील अविकसित भागांकडे लक्ष दिले पाहिजे. कृषी क्षेत्राला, उद्योगांना बळ देण्याचे धोरण आखले पाहिजे. ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न अधिक गंभीरपणे घेण्याची आणि त्यावर उपाय शोधण्याची आवश्यकता आहे. हे सारे मुद्दे आव्हान म्हणून नव्हे तर संधी म्हणून पाहिले गेले पाहिजेत. महाराष्ट्राच्या समृद्ध राजकीय, सामाजिक, औद्योगिक, आर्थिक व सांस्कृतिक परंपरेच्या बळावर एक मोठे परिवर्तन या राज्यात येऊ शकते. शेतकरी व शेती, दुग्ध विकास व अन्य शेतीपूरक उद्योग-व्यवसाय, शिक्षणाच्या सोयी, औद्योगिक विकास, युवक कल्याण, कौशल्य - प्रशिक्षण, रोजगार निर्मिती, महिला, ग्रामीण भागातील मूलभूत सोयी, शहरांमध्ये उत्तम वातावरण निर्माण करणे अशा अनेक गोष्टींकडे विशेष लक्ष देतानाच सामाजिक सद्भावनेचे आणि पर्यावरण संवर्धनासाठी सजगतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी खास प्रयत्न होने गरजेचे आहे. राजकारणाचे लोकशाहीत स्थान आहे, परंतु ते समाजकारणाहून मोठे नाही. राजकारण हे समाजात परिवर्तन घडवून आणण्याचे माध्यम आहे, असे मानणाऱ्यांपैकी मी आहे. त्यामुळे सत्ताधारी असोत किंवा विरोधी पक्ष असोत, त्या सर्वांनी समाज परिवर्तनासाठी सकारात्मक योगदान देण्याची भूमिका घेतली आहे. 

या संदर्भात आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगण्यासारखा आहे. तो म्हणजे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी शासकीय सेवांचे अधिकाधिक प्रमाणात डिजिटलायझेशन केले पाहिजे. महाराष्ट्राच्या व्हिजनचा एक भाग म्हणून , सर्व नागरिकांच्या फायद्यासाठी Digital डिजीटल महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेने काम केले पाहिजे. ई-गव्हर्नन्स काही प्रमाणात सुरू झाले आहे, ही चांगली बाब आहे. ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून सरकारी उपक्रमांची अंमलबजावणी व प्रशासकीय प्रक्रिया सुलभ होऊ शकते आणि आत्मनिर्भर व विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र भरीव योगदान देऊ शकतो. 

शतकानुशतके शेती हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तथापि, वातावरणातील प्रतिकूल बदल, पाण्याची टंचाई आणि इतर आव्हानांचा शेतकऱ्यांच्या जीवनमानावर परिणाम झाला आहे. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, सर्वसमावेशक उपाययोजना राबवाव्या लागतील. जल सुरक्षिततेसाठी जलसंवर्धनाचे प्रयोग केले पाहिजेत. त्यादृष्टीने जलयुक्त शिवार ही चांगली योजना आहे. त्याच धर्तीवर नदी-नाले-ओढे आणि छोटे-मोठे तलाव, शेत तळी या सर्वांचे सबलीकरण केले पाहिजे. यातून सिंचनासाठी, पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. गावे हिरवीगार होतील. शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढेल. 

महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी देशातून तसेच विदेशातून गुंतवणूक आकर्षित करणे महत्वाचे आहे. देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारे अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी सध्याचे सरकार काम करीत आहे. नियामक प्रक्रिया सुलभ करणे, नोकरशाहीतील अडथळे कमी करणे आणि शाश्वत विकासासाठी योगदान देणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन देणे हा भविष्यातील उद्योगविषयक धोरणांचा भाग असला पाहिजे. उत्पादन, तंत्रज्ञान आणि सेवा यासारख्या प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करून अर्थव्यवस्थेत विविधता आणता येईल. व्यवसायांच्या भरभराटीसाठी वातावरण तयार होईल. त्यातून रोजगार निर्मिती होईल. लोकांच्या खिशात पैसा आला की, अर्थव्यवस्थेचे चक्र गतिमान होते. सर्वांना त्याचा फायदा होतो. 

उपरोक्त सर्व गोष्टींच्या बरोबरीने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि ती अशी की, सर्वसमावेशक विकासाच्या वचनबद्धतेशिवाय महाराष्ट्राचे व्हिजन पूर्ण होऊ शकत नाही. प्रगतीचे फायदे राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचावेत याची खातरजमा प्रत्येक टप्प्यावर केली पाहिजे. उपेक्षित समुदायांचे उत्थान करण्यासाठी आणि अधिक न्याय्य समाजाची निर्मिती करण्यासाठी अधिकच्या प्रयत्नांवर भर दिला गेला पाहिजे. महाराष्ट्राचा एक आदर्श राज्य म्हणून विकास करण्यासाठी सामूहिक प्रयत्न व्हावे लागतील. त्यात प्रत्येक नागरिकाचा सहभाग आणि पाठिंबा आवश्यक आहे. एकत्रितपणे आपण सर्व आव्हानांवर मात करू शकतो, संधीचा फायदा घेऊ शकतो आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र घडवू शकतो.

महाराष्ट्राला निरंतर प्रगती, शाश्वत विकास आणि सर्वसमावेशक विकासाचे ज्वलंत उदाहरण बनवू शकतो. देशाच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राची प्रगती अत्यंत महत्वाची आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. मी एका कार्यक्रमात असे म्हणालो होतो की, मी केंद्रात महाराष्ट्राचा राजदूत आहे. आमची सत्ता आली तेव्हा महाराष्ट्रात ७२०० किमी राष्ट्रीय महामार्ग होते, आज हा आकडा सुमारे २२००० किमी वर गेला आहे. राज्यात वीज, पाणी, किनारपट्टी आणि चांगले रस्ते आहेत आणि या सर्व उपलब्ध साधनांच्या मदतीने आपण भविष्यात राज्याचा उत्तम विकास साध्य करू शकतो. उद्योग-व्यापार-वाणिज्य आणि कृषी हे राज्याच्या विकासाचा कणा असून, जलद विकासासाठी त्यांचा उपयोग करण्यावर भर द्यावा लागणार आहे. भारताचे ५ ट्रिलीयन अमेरिकी डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न महाराष्ट्राच्या भरीव योगदानाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्र हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचे इंजिन आहे आणि भारत ही ५ ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्याला पुढाकार घ्यावा लागेल, पुढे जावे लागेल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. 

नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री 

(हा लेख मॅक्स महाराष्ट्रच्या चिंतन या विशेषांकातून घेतला आहे.)

Similar News