प्रसंग: रस्त्यावरच्या कुत्र्यांचा जीव घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय?

अनेकदा अनेक लोक रस्त्यावरच्या कुत्र्यांच्या अंगावर गाडी घालून त्याचा जीव घेतात. तुम्हालाही असं कधी वाटलं का? जर काही वाटलं असेल तर वाचा समीर गायकवाड यांचा लेख

Update: 2021-07-03 02:59 GMT

घराकडे जायच्या रस्त्याला जुना पुणे नाक्याच्या वळणाच्या पुढे काही भणंग भटके नेहमी नजरेस पडतात. गर्दीत त्यांचे अस्तित्व नगण्य असते. तरी रोज एकदा तरी त्यांच्याशी दृष्टादृष्ट होतेच. त्यांचा ठिय्याच आहे तो. असो. आजचीच एक घटना आहे.

चार वाजण्याआधी घाईने दुपारी घराकडे जाताना समोरून एक टू व्हिलरवाला पोरगा अगदी वेगाने जवळून निघून गेला. रस्ता अगदी मोकळा होता तरीही त्याचं बेदरकार बाईक राइडिंग जाणवलं.

मी माझ्या तंद्रीत पुढे सरकलो. काही क्षणांनी एक क्षीण आवाज जाणवला, फट्ट ! काही तरी फुटलं असावं असं त्यातून जाणवलं. आरशातून मागे पाहिलं तर बाईकस्वार पुढे निघून गेला होता मात्र, रस्त्यावर कुत्री गोळा झाली होती, ती भुंकत नव्हती. एका विशिष्ट स्वरात कुळकुळत होती. कुत्र्याचं एक गोजिरवाणं फुल त्याच्या गाडीखाली आलं होतं.

पार लोळागोळा होऊन गेलेलं, भेसूर होतं ते. या रस्त्याने जाताना नेहमी इथे फुटपाथच्या कडेला त्याला त्याच्या भावंडांसोबत बागडताना मी खूप वेळा पाहिलं होतं. आता सगळी पिलं आणि त्यांची पांढऱ्या करड्या रंगाची आई तिथे गोळा झाली होती. तरीही आजूबाजूने वाहने वेगात जात येत होतीच.

एक कुत्र्याचं पिलू तर मेलेलं आहे, त्याच्या कुस्करलेल्या छिन्नविछिन्न देहावरून गाडी गेली तरी कुणाला काहीच फरक पडणार नव्हता. एरव्ही असे प्रसंग मी खूप वेळा पाहिलेले, पण आता डोळ्यादेखता तो इवलासा जीव अचेतन होताना पाहिलेला. आतडं पिळवटून गेलं. हातातल्या पिशव्या घरी ठेऊन पुन्हा इथे येऊन याच्या देहाची विटंबना वाचवावी. या विचाराने मी वेगाने घरी निघालो.

खरे तर तो माझा भिडस्त स्वार्थ आणि जगभीतीचा अर्धा खरा अर्धा खोटा बहाणा होता. रक्तात माखलेल्या कुत्र्याच्या मृत पिलाला हा माणूस उचलून ठेवतोय म्हणजे आता पुरता कामातून गेलेला असणार, 'आधीच गॉन केस' आहे. त्यात ही 'भर' पडणार असं लोक म्हणणार हा विचार एका क्षणापुरता तरी मनी येऊन गेला.

खरे तर त्यावेळी मनात द्वंद्व सुरु होते. एक मन म्हणत होते. गाडी बाजूला थांबवून रुमालावर त्याचा देह उचलून घ्यावा आणि फुटपाथच्या कडेला झुडुपात ठेवावा. दुसरं मन म्हणत होतं. आधी आपलं काम काही मिनिटात निपटून येऊन मग हे काम केलं पाहिजे.

पण त्या क्षणी तरी मी ते करू शकलो नाही. वेगाने घरी आलो सगळं सामान सुमान ठेवलं. पाच मिनिटात जाऊन आलो असं सांगून त्या पिलाकडे निघालो. मागच्या काही मिनिटासाठी मी केवळ त्याचाच विचार करत होतो. रस्त्यावर रहदारी काहीच नव्हती.

कसे काय ते पिलू त्याच्या बाईकखाली असेल ?

बाईकस्वाराला किमान मागे वळून देखील बघावेसे वाटले नसावे का ?

रस्त्यावरच्या कुत्र्यांपायी अपघात होतात. माणसं जखमी होतात, प्रसंगी मरतात देखील. तसे तर आता काही घडले नव्हते. एखादा जीव आपल्या हातून मारला जाण्याचे शल्य काहीच नसते का ?

आता त्या पिलाच्या भावंडांना काय वाटत असावे ? त्याची आई आता कशी रिऍक्ट होईल ?

अनेक प्रश्नांचे मोहोळ उठले होते. काही क्षणात ते वळण डोळ्यापुढे आले.

गाडी स्लो केली. डोळ्यात पाणी दाटलं होतं.

अतिसंवेदनशील असणं अनेकदा त्रासदायी ठरतं, लोक जी गोष्ट सहजासहजी करतात ती आपल्याला मुळीच जमत नाही. मन व्यथित होत राहतं.

टर्न घेऊन मी आता जवळ पोहोचलो आणि तिथलं दृश्य पाहून पुरता चकित झालो.

खजिलही झालो, वरमलो.

रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या एका मळकट कळकट भिकाऱ्याने ते पिलू पेपरच्या रद्दीत उचलून घेऊन फुटपाथच्या कडेला झुडुपात नेऊन ठेवले होते. तो त्याच्यापाशी विमनस्क शून्य चेहऱ्यानं बसून होता.

कसलेही भाव त्याच्या चेहऱ्यावर नव्हते. त्याने भीक मागून गोळा केलेली बिस्किटे, चपात्यांचे तुकडे तो त्या पिलांना, कुत्रीला देऊ करत होता पण कुणीच खात नव्हतं.

कपड्यांची लक्तरे झालेल्या त्या फाटक्या माणसाला मी अनेकदा कुत्र्यांना खाऊ घालताना पाहिलं होतं. रात्री फुटपाथवर तो निजून असला की, त्याच्या मागेपुढे सगळी बेवारस कुत्री अंग चोरून तर काही मोकळ्या अंगाने पहुडलेली दिसत.

आताही तो खाऊ घालत होता.

त्या क्षणाला तो भटका, भणंग इसम मला खूप खूप श्रीमंत आणि संतांसारखा उदार उदात्त वाटला.

त्याने मला नवा आरसा दाखवला होता. जवळ जाऊन मी त्याचे आभार मानले.

तरीही त्याचा चेहरा निर्विकार होता. कसलेही भाव नव्हते ना उपकाराचे ना मदतीचे.

काही फिदीफिदी हसल्याचे जाणवलं. दोन वेडे जे त्यांनी पाहिले होते !

- समीर गायकवाड

Similar News