Indian Education System : मेकॉलेने नेमके काय म्हटले होते?
ब्रिटिशकालीन शिक्षणपद्धतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका... समाजमाध्यमांवर होणारी चर्चा... भारतात शिक्षणाची सुरुवात करण्याचा पहिला प्रयत्न कुणी केला? लॉर्ड मेकॉले वसाहतवादी मानसिकतेचा होता काय? मेकॉले यांच्या शिक्षणपद्धतीवर लेखक संजय सोनावणी यांचा लेख
लॉर्ड मेकॉले हा भारतीय शिक्षण पद्धतीचा पाया घालणारा आद्य पुरुष. मेकॉले भारतात आला तो खरे तर इंडियन पिनल कोड Indian Penal Code लिहिण्यासाठी. (आजही ब-यापैकी प्रचलित असलेल्या इंडियन पिनल कोडचा तो शिल्पकार आहे.) तो भारतात आला जून १८३४ मध्ये. त्याने २ फ़ेब्रुवारी १८३५ रोजी तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्ल्यम बेंटिक यांना एक टिपण (Minutes) सादर केले. हे टिपण म्हणजे भारताच्या शैक्षणिक पद्धतीचा पाया होय.
खरे तर ईस्ट इंडिया कंपनीने डिसेंबर १८२३ पासूनच भारतात युरोपियन भाषा-शास्त्र आणि साहित्याचा प्रचार-प्रसार करणारी यंत्रणा बनवली होती तसेच संस्कृत, पर्शियन व अरेबिक महाविद्यालयांना अर्थिक मदत व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या द्यायला सुरुवात केलेली होती. जवळपास वार्षिक एक लक्ष रुपये कंपनी सरकार या भाषांवर खर्चत असे.
आता मेकाले आपल्या टिपणात काय म्हणतो ते आपण थोडक्यात समजावून घेवूयात. मेकाले म्हणतो, संस्कृत, अरेबिक आणि पर्शियन भाषा या उपयुक्त ज्ञानाअभावी व्यर्थ आहेत. कंपनी सरकार दरवर्षी या भाषांतील पुस्तके छापण्यासाठी वीस हजार रुपये खर्च करते परंतु एक हजार रुपयांचीही पुस्तके विकली जात नाहीत, याचा अर्थ एतद्देशियांनाच त्या भाषांबद्दल आस्था अथवा ममत्व नाही. त्यामुळे या भाषांवर खर्च करणे हा न भरुण निघणारा तोटा (Dead Loss) आहे. संस्कृत, पर्शियन आणि अरेबिकमधील सारे ग्रंथ एकीकडे ठेवले आणि इंग्लंडमधील एका सामान्य ग्रंथालयातील पुस्तकांची जरी तुलना केली तर त्या ग्रंथालयाचेच पारडे वरचढ ठरेल. मिल्टनसारखा कवि, जॉन लॉकचे अधिभौतिकशास्त्र तर न्युटनचे भौतिकीशास्त्र याचा परिचय येथील लोकांना होणे आवश्यक आहे. मृत भाषांवर कंपनी सरकारने खर्च करू नये. येथील बोलीभाषा या साहित्यिक आणि वैज्ञानिक गुणांनी अत्यंत अपरिपक्व आहेत.
पुढे मेकाले म्हणतो, लोकांना ज्या भाषेतून शिकावे वाटते त्या भाषांत शिकवण्यासाठी आपण का खर्च करायचा? आणि त्याची आपल्याला उपयुक्तता काय? एतद्देशियांना इंग्रजीतच शिक्षण दिले गेले पाहिजे. तुलनेने कितीतरी पट बौद्धिक असलेल्या राज्यकर्त्यांनी आपल्या अडाणी प्रजेला आपल्याच भाषेत शिक्षण द्यायला हवे. संस्कृत, पर्शियन अथवा अरेबिकमध्ये कसलेही आधुनिक ज्ञान नसून इंग्रजी हीच येथील ज्ञानभाषा व म्हणुनच संपर्कभाषा बनवली पाहिजे. संस्कृत महविद्यालयांतून शिक्षण घेणा-यांना आज रोजगार उपलब्ध होत नाही हे वास्तवही लक्षात घेतले पाहिजे. थोडक्यात जरी येथील माणसे रक्त व वर्णाने भारतीय असले तरी त्यांच्या अभिरुची इंग्रजी बनल्या पाहिजेत.
मेकालेच्या या टिपणातुन ठळकपणे दिसणारी बाब म्हणजे त्याला भारतियांचे पाश्चात्त्यिकरण करायचे होते. भारतीय संस्कृतीत एक इंग्रजी उप-संस्कृती त्याला निर्माण करायची होती जी इंग्रजांना येथे प्रशासन चालवायला सोपी तर जाईलच परंतू प्रशासकीय पातळीवर नोकरांचीही उपलब्धता होईल. असे लोक बंड अथवा क्रांतीची भाषा करणार नाहीत असा त्याचा होरा होता.
पण भारतीय शिक्षणाचे पाश्चात्यिकरण करावे हे मत मांडणारी पहिली व्यक्ती मेकाले नव्हे हेही येथे लक्षात घ्यायला हवे. राजा राममोहन राय यांनी मेकालेपूर्वी दहा वर्ष आधीच, म्हणजे ११ डिसेंबर १८२३ रोजी, इंग्रज सरकारला निवेदन पाठवून भारतात सर्वच संस्कृत, अरबी व पर्शियन विद्यालये बंद करून सरसकट इंग्रजी शिक्षण सुरू करावे अशी मागणी केली होती. मेकालेने त्यांच्या मागणीचा अधिक विस्तार केला एवढेच फार तर म्हणता येईल.
मेकालेला खंदा विरोधक भेटला तो जगप्रसिद्ध भाषाविद प्रिंसेपच्या रुपाने. प्रिंसेप यांनी मेकालेच्या धोरणाला कडाडुन विरोध केला. त्यांनी कोणतीही भाषा थोपणे अयोग्य व अनैतीक असल्याचे मत व्यक्त करत बोलीभाषा (मातृभाषा) याच शिक्षणाचे माध्यम बनायला हव्यात आणि त्यातुन उत्तम दर्जाचे शिक्षण दिले जावू शकते असे नमूद केले. इंग्रजी ही स्वैच्छिक भाषा असावी. बोली भाषांना महत्व मिळाले तर संस्कृत-पर्शियन इ. भाषा आपोआप मागे पडतील असेही प्रिंसेप यांनी आपल्या निवेदनात आवर्जून नमूद केले.
लॉर्ड बेंटिंक यांनी किरकोळ बदल करून मार्च १८३५ मध्ये अध्यादेश काढून नवीन शिक्षणपद्धतीचा एल्गार केला. या अध्यादेशानुसार जरी संस्कृत, पर्शियन व अरेबिक महाविद्यालये बंद करण्यात आली नसली तरी त्यांना वित्तदान व शिष्यवृत्त्या बंद केल्या. प्रिंसेपचा मतांचा आदर ठेवत बोलीभाषांना शिक्षणात स्थान देण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतांनाच इंग्रजी ही मात्र सर्वेसर्वा भाषा बनवण्यात आली. संस्कृत-पर्शियनला डच्चू मिळला यात खेद वाटुन घेण्याचे कारण नाही कारण त्यातून मिळणारे तथाकथित ज्ञान हे धार्मिकच अधिक तर जेही काही अन्य ज्ञान होते ते कधीच कालबाह्य झालेले होते. बोलीभाषांना महत्व दिले गेले हे प्रिंसेप यांचे श्रेय आहे हे आवर्जून नमूद केलेच पाहिजे. अर्थात मेकॉलेने जे म्हटलेच नव्हते तेही त्याच्या नावावर खपवून देणे ही संघाची प्रवृत्ती आजची नाहीये. खर तर संस्कृत गुरुकुलांना आर्थिक मदत देणे नंतर इंग्रज सरकारने नाकारले त्याचा हा उद्वेग आहे एवढेच!
संजय सोनवणी
लेखक