सेप्टिक टँक पेक्षा माणसाच्या जीवाला किंमत द्या

Update: 2019-05-05 04:56 GMT

नालासोपाऱ्याला शौचालयाची टाकी साफ करताना तीन सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. हे वाचून गेल्या महिन्यातील एक प्रसंग आठवला. तो नीट वाचा आणि समजून घ्या.

काही दिवसांपूर्वी एक बाळ जुलाब उलट्यांच्या त्रासाने माझ्याकडे आले होते. जुलाबाच्या दुर्गंधीवरून ते बॅक्टेरियल आहे की वायरल हा अंदाज बांधता येतो म्हणून मी पालकांना विचारले – जुलाबाची दुर्गंधी जास्त येते का? त्यावर त्या मुलाचे वडील म्हणाले –

“ साहब हम भंगी है, टाकी मे उतरके सेप्टिक टँक साफ करते है“ त्याला काय म्हणायचे होते हे मला कळाले. मुलाच्या आई ला कसे नुसे झाले आणि मी कसे बसे माझा भावना वेग आवरत प्रिस्क्रिप्शन लिहून दिले. आणि सुन्न अवस्थेत थोडा वेळ ओपीडी थांबवली.

गेल्या महिन्यात अशाच प्रकारे तीन जणांचा शौचालयाच्या टाकीत मृत्यू झाला होता. नालासोपाऱ्यात शोचालयाच्या टाकीत काल गुदमरलेल्या त्या तीन जणांमध्ये मला माझ्याकडे आलेल्या पालकांचा चेहरा दिसला. असं वाटलं या तीन मृतांचे नातेवाईक म्हणून माझ्याकडे आलेल्या या पालकांना भेटून यावं. आणि सांगावं की हे काम थांबवा. खरं तर आपल्या देशात या विरोधात कायदा आहे. या बातमीला माध्यमात पहिल्या पानाचे स्थान मिळेल याची अपेक्षा नाही. पण गुदमरून झालेल्या तीन जीवांच्या वेदना आपण अनुभवू शकत नसू तर आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही. आज या तीन कुटुंबातील मुलं आपला बाप शौचालयाच्या टाकीत गुदमरून मेला म्हणून आयुष्यभर हे शल्य मनात घेऊन कसे जगतील? आपण सगळे या हाताने सेप्टिक टँक स्वच्छ करणा-र्यांचे नातेवाईक होऊ शकत नाही का?

किती साधी गोष्ट आहे. या टाक्या स्वच्छ करण्यासाठी आज आधुनिक उपकरण उपलब्ध आहेत. मुंबई, पुण्यात ही यंत्रे महापालिकेतर्फे मोफत उपलब्ध आहेत. त्यासाठी माणसं आत सोडण्याची गरज नाही. काही केमिकल्स आहेत . ती आत सोडली तरी स्वच्छता होते. काही ठिकाणी यातून बायोगॅस निर्मितीचे प्रकल्प राबवले जात आहेत. आपल्या सोसायटीत एखादा सांस्कृतीक कार्यक्रम कमी घ्या. पण कृपा करून सगळे रहिवासी हा ठराव घ्या की, माणसांना टाकीत उतरवून हे काम आम्ही करून घेणार नाही. बऱ्याचदा मेनटेन करणारे बिल्डर परस्पर हे करत असतात. त्यात लक्ष घाला. माणूस व्हा आणी कृपया शोचालयांच्या टाकीत स्वच्छतेसाठी माणसे सोडणार नाही ही शपथ घ्या.

#DoctorWhoCares

Similar News