उद्धवजी, नवरत्नांची परिषद तुम्हीच आयोजित करू शकता!

Update: 2020-04-22 03:30 GMT

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 'कोरोना'च्या अनुषंगाने आणखी एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रातील संदर्भ खरे असतील, तर देवेंद्रांची भूमिका गंभीरपणे समजून घेणे आवश्यक आहे.

देवेंद्रांना मुख्यमंत्री म्हणून आणि त्यापूर्वी विरोधी पक्षाचे नेते म्हणून ज्यांनी पाहिले आहे, त्यापैकी प्रत्येकाला देवेंद्रांच्या क्षमतांची माहिती आहे. त्यांच्या मर्यादा काय आहेत, हे आता सांगण्याची आवश्यकताही नाही. पण, देवेंद्रांना प्रश्नांची समज होती. ते अभ्यास करत आणि आकडेवारी अगदी त्यांच्या ओठांवर असे. त्यांच्या विरोधात असणारे पत्रकार आणि ब्युरोक्रॅट्सही त्यासाठी त्यांचे कौतुक करत.

कोरोनाच्या निमित्ताने केंद्र आणि देवेंद्र कितीही 'राजकारण' करत असले तरी उद्धव ठाकरे यांची भूमिका स्वच्छ आहे. पक्षीय राजकारणाच्या पलिकडे मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धती आहे. अत्यंत खंबीरपणे ते या संकटावर मात करत आहेत. अवघा महाराष्ट्र उद्धव यांच्यासोबत आहे.

मला असे वाटते की उद्धव यांनी सर्व माजी मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करून कोरोनाविषयी चर्चा करावी. सूचना घ्याव्यात. सल्ले मागावेत.

काळ मोठा कठोर असतो. कालचे नायकही आज कसे काळाच्या पडद्याआड अथवा उपेक्षेच्या गर्तेत जातात, हे आपण अनेकदा पाहात असतो.

ज्या नारायण राणेंची आज यथेच्छ थट्टा केली जाते, ते राणे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते म्हणून कार्यक्षमतेने काम करत होते, हे नाकारून चालणार नाही. अभ्यासू नेता ही त्यांची ख्याती होती. प्रशासनावर त्यांची पकड होती.

माणूस कोणत्याही पक्षाचा असो, तो महाराष्ट्रासारख्या राज्याचा मुख्यमंत्री होतो, त्याअर्थी त्याच्यामध्ये काही मोठ्या पात्रता असतातच. आज आपण ज्या इटली वगैरे देशांचा उल्लेख करतो आहोत, ते सर्व देश आपल्या राज्यापेक्षाही छोटे आहेत. लोकसंख्येचा विचार करता, महाराष्ट्र हा जगातला दहाव्या क्रमांकाचा 'देश' आहे. अशा बलाढ्य 'देशा'चा मुख्यमंत्री असणारा कोणीही माणूस सामान्य नक्कीच नसतो.

आज जे माजी मुख्यमंत्री आपल्यासोबत आहेत, त्यापैकी बहुतेकांच्या प्रतिमेवर चिखलफेक झाली आहे. काहींना पदावरून काढून टाकले गेले आहे. पण, काही असो, ते या विशाल राज्याचे मुख्यमंत्री होते. आणि, काहीतरी विचार त्यांनी या राज्याच्या संदर्भाने निश्चितपणे केला असणार. अशा काही आव्हानांचा मुकाबलाही केला असणार! यापैकी डॉ. निलंगेकर वगळता सर्व मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती मी स्वतः घेतल्या आहेत. आणि, त्यापैकी कोणालाही किरकोळीत काढावे, असे मला मनापासून वाटत नाही.

नेदरलॅन्डचे उदाहरण आपल्यापैकी प्रत्येकाला माहीत आहे. मार्क रूट्टे हे त्या देशाचे पंतप्रधान. ब्रुइस ब्रुनो आरोग्यमंत्री होते. कोरोनाच्या संकटाविषयी बोलण्यासाठी ब्रुनो संसदेत उभे राहिले आणि बोलता बोलता त्यांना भोवळ आली. त्यांच्या सहका-यांनी त्यांना सावरलं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी दुस-या दिवशी राजीनामा दिला. मग पंतप्रधान मार्क रूट्टे यांनी विरोधी पक्षातील नेते मार्टिन व्हॅन रिजन यांना आरोग्यमंत्री पदावर नियुक्त केले.

मार्टिन यांना आरोग्याच्या संदर्भात काम करण्याचा मोठा अनुभव आहे आणि ते चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळतील, या विश्वासासह पंतप्रधानांनी चक्क एका विरोधी पक्षातील नेत्याला तात्पुरते मंत्रीपद दिले. 'उद्या माणसंच नसतील, तर पक्षांच्या झेंड्यांचं काय करू?', असं ते म्हणाले!

आपल्या देशाची लोकशाही परंपरा याहून उदात्त आहे. पण, आजच्या आपल्या पंतप्रधानांकडून अशी अपेक्षा करणे अवघड आहे. मुख्यमंत्र्यांकडून मात्र नक्कीच अपेक्षा आहेत.

त्यामुळे, उद्धव यांनी राज्याच्या सर्व माजी मुख्यमंत्र्यांची एक व्हिडिओ कॉन्फरन्स घ्यावी आणि दोनेक तास सविस्तर चर्चा करावी. ही चर्चा माध्यमांसाठी खुली नसावी. कारण, मीडिया दाखवणार म्हटले की सगळ्यांचाच टोन बदलतो!

माजी मुख्यमंत्र्यांसोबत आणखी अन्य नेत्यांसोबतही अशी चर्चा होऊ शकते. पण, सुरूवात या नवरत्न परिषदेने करावी.

देवेंद्र फडणवीस, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, मनोहर जोशी, डॉ. शिवाजीराव पाटील- निलंगेकर आणि अर्थातच शरद पवार यांची व्हिडिओ कॉन्फरन्स उद्धव यांच्यासोबत झाली, तर या नवरत्नांच्या चर्चेचा राज्याला फायदा होईलच.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या विखारी वातावरणात एक चांगला 'मेसेज' जाईल.

कदाचित ही बातमी नेदरलॅंडमध्येही चर्चेची ठरेल!

इतिहास या घटनेची नोंद करेल.

आणि, कोण जाणे, केंद्रालाही असा प्रयोग करण्याची इच्छा होईल! यू नेव्हर नो!!

Similar News