Republic Day 2026 : खरंच, प्रजासत्ताक साजरा करण्याइतपत आपला समाज प्रगल्भ बनलेला आहे का?
सध्याची परिस्थिती पाहता खरंच, प्रजासत्ताक साजरा करण्याइतपत आपला समाज प्रगल्भ बनलेला आहे का? प्रजासत्ताक दिनानिमित्त डॉ. प्रदीप पाटील यांचा लेख
लोकशाहीला शिव्या घालणारी फौजच्या फौज तयार झालेली आहे या देशात!
संविधानाला न मानणारे जथ्थ्ये जिकडे तिकडे वाढत चाललेले आहेत. अशा पार्श्वभूमीवर २६ जानेवारी साजरी करण्याचे संकट या लोकांवर येते!!
दांभिकपणा, ढोंगीपणा घेतलेला हा वर्ग हिंदुत्वाचा जोरदार प्रचार आणि प्रसार करतो. त्यांना लोकशाही मूल्ये ही देशाला खड्ड्यात घेऊन जाणारी मूल्ये वाटतात. त्यांची मूल्ये ही धर्मावर आधारलेली आहेत. ज्यामध्ये, 'जशास तसे उत्तर देणे' हे मूल्य, 'इतिहासात अत्याचार झाला म्हणून त्याचा आता सूड घेणे आवश्यक आहे' हे मूल्य, 'आमचीच संस्कृती जगात श्रेष्ठ आहे' हे मूल्य, 'देशाला वाचवायचं असेल तर कल्याणकारी हुकूमशाही असावी' हे मूल्य, 'खोटेपणा, फेकूगिरी, इतिहासाची मोडतोड, आणि दुसऱ्यांच्या प्रतिमा जाणून बुजून डागाळणं' हे मूल्य, अशा कुमूल्यांच्या कचाट्यात सापडलेला आजचा भारतीय समाज झेंडावंदन करायला निघालेला आहे. हे अशा विचारांचे झेंडावंदन करणारे गुंडावंदन करणारे असतात!
हुकूमशाही आणि लोकशाही ही दोन विरुद्ध टोके आहेत. धर्म, वंश, जात, ही हुकूमशाहीची हत्यारं आहेत. ही हत्यारं परजत जेव्हा गल्लोगल्ली धर्माचे झेंडे उभे केले जातात तेव्हा लोकशाहीची कत्तल होत असते. स्वातंत्र्य, समता, बंधुता, यांना गाडले जात असते. मग झेंडावंदन करण्याचं नाटक कशासाठी? आपल्या धर्माच्या झेंड्याचे वंदन करण्याकडे जाण्यासाठी, ते इप्सित साध्य करण्यासाठी, लोकशाहीचा कपटकारस्थान करून वापर करणे ही गोष्ट सामान्यांवर लादली जातेय. ते बळी पडतातयत. तेही हातात झेंडे घेतात. आणि मग दुभंगलेल्या व्यक्तिमत्वांचे तांडे धुमाकूळ घालत आहेत!
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन एकीकडे साजरा करायचं ढोंग आणि दुसरीकडे धर्माचा झेंडा आणि धर्मराष्ट्र याचा पुरस्कार अशा दुतोंडी मानसिकतेला प्रेम, आदर, साहचर्य, एकमेकांना मदत करणे, जुळवून घेणे, संविधानाच्या चौकटीत राहून विषमतेला विरोध करणे आणि स्वतःचे व राष्ट्राचे संरक्षण करणे, हे ढोंग वाटते! खरे तर अशा प्रकारची ही जी फौज आहे ही एक सडलेली मानसिकता आहे. ती सडतच चाललीय. म्हणून जागोजागी गुंडगिरीची, बंडाची, तिरस्कारची आणि अत्याचाराची डबकी तयार होत आहेत. संवेदनाहीन आणि मूल्यहीन समाजरचना नव्याने घडवण्याचे हे षडयंत्र २६ जानेवारीला संविधानाला नामशेष केल्याशिवाय राहणार नाही. आणि हे घडवणारे प्रबळ सत्ताधारी देशप्रेमी म्हणून मिरवत राहतात तेव्हा "भारत माझा देश..." आहे हे कुठेतरी संपून गेलेले असतं. ते संपतं का?, तर समूहाला. समाजाला.. भीती दाखवून वश केलं जातं. कुजबुज करत तर कधी उघडपणे खोट्या बातम्या पसरवणे याच्या जोडीने द्वेष ही दोन हत्यारं वापरून भीती सतत जागी ठेवली जाते. आणि या भीतीच्या छायेखाली आलेला समाज कोणीतरी मसीहा शोधत असतो. सध्याचा सत्ताधारी मसीहा बनला आहे. आणि सत्तेचा वापर करून तुमचा तारणहार हा मीच आहे असे खोटे आश्वासन भरभरून पसरवले आहे. दुसऱ्या धर्मांबद्दलची, दुसऱ्या जातींबद्दलची, दुसऱ्या वंशांबद्दलची, दुसऱ्या देशांबद्दलची, खोटी भीती निर्माण करून आपणच रक्षणकर्ते आहोत असे भ्रम निर्माण करून सोडले आहेत. अशा भ्रमिष्ठांचे सत्तास्थानी राहण्याचा उद्योग हा प्रजासत्ताक देशाला जाळून टाकतो. सामाजिक भीती किंवा समूहाची भीती जेव्हा सत्ताधाऱ्यांचं बळ घेऊन खोटा आवेश घेऊन वावरू लागते तेव्हा ती हिंसक होते. विकृत होते. प्रजासत्ताकाला फाट्यावर मारण्याचं काम ती बेमालूमपणे करते.
तिरंगा जाऊन, संविधान जाऊन आमचे स्वतंत्र धर्मराष्ट्र यावं अशी स्वप्नं पाहिली जातात अशावेळी प्रजासत्ताक दिन साजरा करणे हे ढोंग बनतं.
खरंच, प्रजासत्ताक साजरा करण्याइतपत आपला समाज प्रगल्भ बनलेला आहे का?
Republic Day, Indian Constitution, Democracy, Hindutva, Constitutional Values, Democratic Governance, Religious Politics, Casteism, Communalism, Indian Society