शेतीची लढाई हवामान बदलाशी

अलिकडच्या काळात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा बदलल्याचे दिसते. वातावरण बदलाचा मोठा फटका शेतीला बसत आहे, याच परीमाणांचे विश्लेषन केलं आहे कृषी पत्रकार ज्ञानेश उगले यांनी...

Update: 2022-07-02 14:13 GMT

बाजारात टोमॅटोला जी मागणी नेहमी असते तितकीच आताही आहे. अचानक कुठूनतरी मागणी वाढलीय असं झालेलं नाहीय. हंगाम उन्हाळी असो की पावसाळी. 50 टक्केही उत्पादन निघत नाही ही खरी समस्या आहे. या समस्येच्या मुळाशी आहे वातावरणातील बदल. असं ठाम मत मंगेश भास्कर यांचं आहे.

वातावरण बदलात सक्षम टिकून राहतील अशा व्हरायट्या आपल्याकडे नाहीत. त्या बरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पादन तंत्रातील चुकाही याला कारणीभूत आहेत. या शिवाय रोग किडीचे नियंत्रण करतांना गरजेपुरतेच रासायनिक उत्पादने वापरावीत. मात्र, जास्तीत जास्त सेंद्रिय पध्दतीने नियोजन करणे आवश्‍यक असल्याचेही ते सांगतात.

कृषितज्ज्ञ मंगेश भास्कर हे द्राक्ष आणि भाजीपाला उत्पादन क्षेत्रात 30 वर्षांपासून कार्यरत आहेत. मागील काही वर्षांपासून त्यांचे सेंद्रिय शेती, 10 ड्रम थिअरी या सारखे अनेक प्रयोग सुरु आहेत. शेती उत्पादनातील खर्च कमी करणे आणि शेती शाश्‍वत करणे हा ध्यासाने ते अखंड कार्यरत आहेत. शाश्‍वत टोमॅटो उत्पादन या विषयावर त्यांनी सविस्तर मांडणी केलीय.

शाश्‍वततेसाठी कोणकोणते घटक काम करतात?

1. उत्पादन : वातावरणातील बदलामुळे 2 संकटे तयार झाली आहेत. फेब्रुवारी नंतर मे पर्यंतचे तापमान 40 अंशाच्या पुढे निघून गेले आहे. त्यामुळे टोमॅटोवर तिरंगा आणि यासारख्या विषाणूजन्य रोगांचे प्रमाण वाढले. त्यामुळे टोमॅटोचे झाड हे चांगले तयारच होत नाही. या स्थितीत उत्पादकता मोठ्या प्रमाणात घटली आहे. पुढच्या टप्प्यात जुलैनंतर सुरु होणाऱ्या प्रामुख्याने ऑगस्टच्या (नागपंचमी) लागवडीही सततच्या पावसाने अडचणीत येतात. या काळात अर्ली आणि लेट ब्लाईट (काळा डाग-करपा) याचे प्रमाण प्रचंड वाढते. यामुळे पूर्ण प्लॉटचे म्हणजे अगदी 100 टक्क्यापर्यंत सुध्दा नुकसान होते.

मागील 1-2 वर्षात हे नुकसान जास्त झाले. त्यामुळे उत्पादन प्रचंड घटले. म्हणून भाव टिकून राहिले. बाहेर फार मागणी झाली म्हणून दर वाढले असं काही म्हणता येणार नाही. सर्वसाधारण मागणी नेहमीप्रमाणेच होती. बहुतांश उत्पादकांचे सरासरी उत्पादन 50 टक्के सुध्दा नव्हते ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. जिथे आपण 3 हजार ते 4 हजार क्रेटची अपेक्षा करीत होतो तिथे 1 हजार क्रेटसुध्दा उत्पादन निघाले नव्हते. रेट 700 ते 1200 या दरम्यान राहिल्यामुळे त्या 1 हजार क्रेटचे सुध्दा 8-9 लाख रुपये उत्पन्न मिळाले.

2. वाढलेले तापमान आणि पडणारा अवेळी पाऊस हे दोन घटक टोमॅटोच्या उत्पादनावर ठळक करीत आहेत.

यावर उपाय काय आहेत?

1) वातावरण बदलात या विषाणूजन्य रोगांना प्रतिरोध (रेझिस्ट) करणाऱ्या सक्षम टोमॅटो व्हरायटी असणे गरजेचे आहे. आताच्या व्हरायटी या रोगांना बळी पडत आहे याचा अर्थच त्या पुरेशा सक्षम नाहीत. 40 अंश तापमानाच्या पुढील वातावरणात त्या काम करणाऱ्या असाव्यात. सततच्या पाऊस काळात टिकणाऱ्या असाव्यात.

2) आपल्या लागवड पध्दतीत विशेषत: अंतरात बदल करण्याची गरज आहे. दोन ओळीतील व दोन झाडातील सध्याचे अंतर वाढवले तर प्लॉट 6 महिन्यांपर्यंत टिकवता येतात. सध्याची 4 ते 5 फुट अंतराच्या पध्दतीत झाडांची दाटी वाढते व तिथे मायक्रो क्लायमेट तयार होते. तिथे रोगास पूरक वातावरण तयार होते व झाडे खराब होतात. मररोगाचे प्रमाण वाढते. रसशोषणाऱ्या किडी (सकींग पेस्ट) वाढतात व तिथेच विषाणूजन्य करपा (व्हायरस) अधिक येतो. त्याला जोडून करपाही येतो. सह्याद्री फार्म्सच्या प्लॉटमध्ये अनेक प्रयोग करुन काही गोष्टी समोर आल्या आहेत. 10 ड्रम थिअरीचा वापर यात केला आहे. त्यातून ई.एम. आधारित बोटॅनिकल एक्स्ट्रॅक्ट सारख्या काही बाबी समोर आल्या आहेत. याचा वापर केला करप्यावर चांगले नियंत्रण मिळते असे आढळून आले आहे. अर्ली-लेट ब्लाईट, नागअळी,रोपांची मर होण्यापासूनही प्लॉट वाचू शकतो असे लक्षात आले आहे. हे सगळं सिध्द झालेले संशोधन आहे. याबाबतचा 'सह्याद्री'कडे 2-3 वर्षांचा डाटा आहे. अशा बोटॅनिकल एक्स्ट्रॅक्टच्या वापरावर भर दिला तर रोगांच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन किंवा तत्सम रासायनिक किडनाशकांचा वापर करण्याची फारशी गरज भासणार नाही. तो खर्च यातून वाचू शकतो.

थोडक्यात रासायनिकचा गरजेपरताच वापर करुन जास्तीत जास्त सेंद्रिय पध्दतीचा वापर केला तरच टोमॅटोचे झाड सशक्त बनेल आणि पर्यायाने आपले पिक रोग किडीच्या प्रादुर्भावापासून वाचू शकेल.

धन्यवाद.

ज्ञानेश उगले

Tags:    

Similar News