अमेरिकेत (America) काल झालेल्या निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे अनेक उमेदवार निर्णायक मताधिक्याने विजयी झाले. पण इतर सर्व उमेदवारांच्या तुलनेत जगभर चर्चा कोणाची होत असेल तर न्यूयॉर्कच्या महापौरपदी निवडून आलेल्या जोहरान ममदानी (zohran Mamdani) यांची. त्याला कारण आहे त्यांनी संपूर्ण प्रचारात निःसंदिग्धपणे पर्यायी समाजवादी मांडणी. जी जगातील भारतसकट अनेक देशांच्या अर्थव्यवस्थाना लागू पडते.
ज्यातून गेली जवळपास ४० वर्षे ब्रेनवॉश केल्या गेलेल्या कॉर्पोरेट वित्त भांडवल धार्जिण्या आर्थिक तत्त्वज्ञानाला भविष्यात आव्हान मिळू शकते. म्हणून ममदानी जगभर दखलपात्र झाले आहेत.
ममदानी यांच्या आर्थिक कार्यक्रमाला तरुण, कामगार, गरीब निम्न मध्यमवर्गीयांच्या तयार झालेल्या पाठिंब्याची पायाभरणी भांडवलशाहीनेच केलेली आहे. कशी ते बघूया…
१. कुटुंबाच्या किमान राहणीमानासाठी अनेक अनेक वस्तूमाल / सेवा लागतात. त्यात अत्यावश्यक आणि ऑप्शनल असा फरक असतो. घरे, वीज, पाणी, सार्वजनिक वाहतूक, आरोग्य, शिक्षण अशा पायाभूत सामाजिक सुविधा अत्यावश्यक सदरात मोडतात. पण अमर्याद नफा कमावण्याच्या आणि प्रसरण पावण्याच्या आपल्या गुणधर्मामुळे, भांडवलशाही सर्वच वस्तुमाल/ सेवांचे कमोडिफिकेशन करू पाहते. अत्यावश्यक व ऑप्शनल यात फरक करत नाही.
भारतासारख्या देशात तर अनेक कारणामुळे शेती क्षेत्राला निराळी वागणूक देणे गरजेचे आहे. पण त्यात देखील कॉर्पोरेट भांडवल घुसू पाहत आहे. त्याच्या प्रतिक्रिया येणारच होत्या.
२. नफेखोर भांडवलशाही असा फरक करायला नकार देऊन थांबत नाही तर अत्यावश्यक वस्तुमाल / सेवांचे दर / किंमती बाजारधिष्टीत असतील असा आग्रह धरते. अशा वस्तूमाल / सेवा बाजारभावाने विकत घेण्यासाठी नागरिकांकडे पुरेशी क्रयशक्ती असावी लागते. जी क्रयशक्ती पुरेसे रोजगार व पुरेशा वेतनातूनच येऊ शकते.
पण भांडवलशाही अशी क्रयशक्ती तयार करण्याची जबाबदारी आपली नाही अशी भूमिका घेते. तंत्रज्ञान विकास एक स्वयंभू शक्ती बनते त्याचा रोजगारावर विपरीत परिणाम होतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तर क्लासिक उदाहरण आहे. आणि जास्तीत जास्त नफ्यासाठी वेतन पातळी दाबली जाते. ट्रेड युनियनची मुस्कटदाबी केली जाते. परिणामी अर्थव्यवस्थेत क्रयशक्ती तयारच होत नाही. त्यातून ममदानी यांची Affordability घोषणा तयार झाली आणि जनतेला अपील झाली.
३. गेल्या ४० वर्षाच्या नवउदारमतवादी आर्थिक धोरणांचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे विविध प्रकारच्या मत्ताची मार्केट्स (ॲसेट मार्केट्स) तयार झाली. रोखे, शेअर्स, कमोडिटी, क्रिप्टो, रियल इस्टेट इत्यादी. सबंधित रेग्युलेटरी फ्रेम खिळखिळी करून, जनतेच्या पैशावरील बँकिंग, भांडवल बाजारातून भांडवल उभारणी करून, या मार्केटमधील सट्टेबाज सदृश्य व्यवहारातून प्रत्येक देशातील प्रस्थापित वर्गाने तूफान माया जमा केली.
प्रत्येक देशात आधीच असलेली आर्थिक विषमता अधिक धारदार झाली.
जाहिराती, टीव्ही (tv), मीडिया (Media) यामुळे श्रीमंत लोक नक्की किती आणि कशाचा उपभोग घेतात हे कोट्यावधी सामान्य नागरिकांच्या, विशेषतः त्यांच्या कुटुंबातील तरुण पिढीच्या लक्षात येऊ लागले. मनात तुलना होऊ लागली. असंतोष फक्त दारिद्र्य आणि वंचितावस्थेमुळे तयार होत नसतो. टोकाच्या आर्थिक विषमतेतून होणाऱ्या मनातील तुलनेमुळे तयार होणारा असंतोष शेकडो पटींनी ज्वलनशील असतो. तो आता सर्वत्र उफाळून येत आहे.
जागतिक कॉर्पोरेट भांडवलशाहीचे हे तीनच अंतर्विरोध नाही आहेत. इतरही बरेच आहेत. “आपली कबर स्वतः खोदते” हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत.
(New York) न्यूयॉर्क मध्ये सुरू झालेले हे लोण थांबणारे नाही. वेळ लागेल. पण दिशा अपरिवर्तनीय असेल.
कारण ममदानी यांच्या कॉन्स्टिट्यून्सीची मशागत खुद्द भांडवलशाही करत राहणार आहे. ती प्रणाली बुद्धीने बुद्धू नाही. पण तिच्यामध्ये सुसाईडल टेंडेन्सिज आहेत ! याचा अर्थ पर्यायी जनकेंद्री आर्थिक व्यवस्था आपोआप उभ्या राहतील असे देखील नाही. हे दोन भिन्न विषय आहेत. पर्यायी समाजवादी मॉडेल्ससाठी अनुकूल परिस्थिती भांडवलशाही तयार करते एवढाच त्याचा अर्थ. खरेतर आपोआप काहीच घडत नसते. Ball is in our court.
संजीव चांदोरकर
(लेखक, अर्थतज्ज्ञ)
(साभार - सदर पोस्ट संजीव चांदोरकर यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)