रा. रा. भालचंद्र नेमाडे, जय भीम जय सेवालाल !

राष्ट्रीय बंजारा टायगर्स या संघटनेने ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात जामनेर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा असून लभान गोरबंजारा समाजातील महिलांबाबत हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीत अपमानजनक लिखान केल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. भालचंद्र नेमाडे यांना दिलेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घेण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. समाजातील जागरुकांनी यासंदर्भात नेमांडेंना पत्र लिहून हिंदुत्वाच्या अडगळीला पडलेल्या लोकांचे हे कृत्य असल्याचे सांगत भुमिका जाहीर केली आहे.

Update: 2021-01-31 14:28 GMT

वि.वि. पत्रास कारण की, आपल्या 'हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीत गोर बंजारा समाजातील स्त्रियांचे आक्षेपार्ह चित्रण असल्याचा आरोप करत समाजातील काही कट्टरतावाद्यांनी आपल्याला आणि आपल्या पत्नी सौ. प्रतिभाताई नेमाडे यांस शिवीगाळ करत धमकावले असल्याच्या पार्श्वभूमीवर या समाजाचे घटक म्हणून आम्हाला आमची भूमिका जाहीर करणे अगत्याचे वाटले. करिता हा पत्र प्रपंच.

बुद्ध-चार्वाक-चक्रधर-नामदेव-बसवेश्वर-तुकाराम या मुक्तीवादी परंपरेतील पुढची कडी म्हणजे संत सेवाभाया आहे असे आम्ही मानतो. फुले-शाहू-आंबेडकर हे आमच्या लेखनाचे आणि जगण्याचेही उर्जास्त्रोत आहेत. तेंव्हा माणसामाणसांत भेद निर्माण करणाऱ्या कुठल्याही जात-धर्म-वर्ग-वर्ण-लिंग-प्रदेशाच्या संकुचित अडगळीचे आम्ही भागीदार नसणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आमचा या देशाच्या संविधानावर आणि लोकशाही व्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे या लोकशाही समाजव्यवस्थेचे मुलभूत अंग आहे असे मानतो. या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अवकाश बोलण्या-लिहिण्यापासून तर व्यक्त होण्याच्या सर्व माध्यमांपर्यंत विस्तारलेला आहे. कला-साहित्य-भाषा-संस्कृती-धर्म-राजकारणासोबतच सामाजिक आणि वयैक्तिक जीवन अशा मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या सर्व क्षेत्रातील अभिव्यक्ती त्यात अपेक्षित आहे. मात्र या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर होऊ नये म्हणून त्यालाही काही मर्यादा घालून देण्यात आलेल्या आहेत. उदा. मानहानी, अनैतिकता, न्यायालयीन अवमान, देशाची सुरक्षितता आणि अखंडता यांना बाधा पोहोचवणे, अपराधाला प्रोत्साहन देणे, विदेशी राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे, सामाजिक स्वास्थ्य बिघडवणे इ. गोष्टी अपराध ठरतात. मात्र या अपराधांची व्याप्ती वाढवत वाढवत थेट लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच संकोच झाल्याची अनेक उदाहरणे यापूर्वी घडलेली आहेत. हा अभिव्यक्तीचा संकोच मुख्यत्वे जातीय आणि धार्मिक मूलतत्त्ववादी प्रवृत्तींनीच घडवून आणल्याचे लक्षात येते. तुम्ही देशीवादाच्या नावाखाली ज्या जातीव्यवस्थेचे समर्थन केलेले आहे त्याचेच फळ म्हणून एक अजातीय सांस्कृतिक समूह आज जातीय अस्मितेसाठी तुमच्या विरोधात एकत्र येत आहे, हा काळाने तुमच्यावर उगवलेला सूड आहे असे आम्हाला वाटते.

फार पूर्वी गोर बंजारा ही जात नव्हती, तर ती प्रवृत्ती होती. परंतु जातिव्यवस्थेच्या प्रभावाखाली आल्यानंतर तिचे आज जातीकरण झालेले दिसून येते. गोर बंजारा समाज कधीही युद्धखोर नव्हता. त्याचा इतिहास लढाया, राजकारण, कटकारस्थान, रक्तपात अशा अमानुष गोष्टींनी बरबटलेला नाही. हा समाज शांतताप्रिय असून प्राचीन काळापासून ना गुलाम ना उद्दाम अशा अवस्थेत जगत आला आहे. परंतु आज सगळ्याच जाती धर्माच्या अस्मिता अत्यंत टोकदार झाल्याच्या भोवतालात या समाजाने आपल्या अस्मितांचा शोध घेणे आणि त्यासाठी जात म्हणून एकत्र येणे स्वाभाविक आहे. परंतु ज्यांना ते अस्मिता समजून पुढे करत आहेत आणि त्यासाठी जे माध्यम निवडले गेले आहेत ते मात्र चुकीचे आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. तसे तर शोषित पिडीत घटकातील लोकांना एकत्र बांधण्यासाठी अस्मितादर्शी राजकारण आवश्यकच असते. परंतु त्या अस्मिता लोकशाही तत्त्वांचा संकोच करणाऱ्या नसाव्यात, त्यांची मूळं भौतिक विकासाच्या जमिनीत रुजलेली असावीत आणि आपल्या मुळांना कोणत्या परंपरेची माती चिकटलेली आहे याचे भान असावे. ते भान नसले कि केवळ स्त्रीयांभोवतीच फिरणाऱ्या नैतिक-नैतिकतेच्या पोकळ संकल्पनांचे पुरुषी खेळ सुरु होतात. मुळात गोर बंजारा हा आदिम मातृपुजक गण समाज आहे. श्लील-अश्लील, नैतिक-अनैतिक, धर्म-अधर्म अशा ब्राम्हणी पितृसत्ताक धारणांपासून कोसो मैल दूर रानावनात उन्मुक्तपणे जगत होता. लेंगी गीतातून त्याच्या प्रच्छन्न शृंगाराचा आविष्कार पहायला मिळतो. ब्राम्हणी शास्त्रात 'कामा' ला षडविकारांपैकी एक विकार मानून त्याज्य मानलेले आहे. केवळ प्रजोत्पादन हेच त्याचे प्रयोजन मानले गेले. परंतु गोर बंजारा समाजाची उत्त्पतीच अवैदिक गौरीशंकरापासून झालेली असल्याने शैव तथा शाक्त परंपरेतील उन्मुक्त कामक्रीडा त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग राहिलेली आहे. अखिल मानव जातीसाठी नैसर्गिक आनंदाचा स्त्रोत म्हणून कामशास्त्र आकाराला आणण्याचे श्रेय बंजारा स्त्रियांकडे जात असेल तर तो सन्मानच समजला गेला पाहिजे. कामाशास्त्रात निपुण असणे ही काही लाजिरवाणी गोष्ट नाही. लाज तर लैंगिकता आणि नैतिकता यांची सांगड घालणाऱ्या ब्राम्हणी विचार परंपरेची वाटली पाहिजे. आपल्या व्यवस्थात्मक दुःखांची आणि अभावांची वाटली पाहिजे. परंतु तसे न वाटता काही लोकांना गोर बंजारा स्त्रिया प्राचीनकाळापासून वेश्याव्यवसाय करत आल्याच्या तुमच्या कादंबरीतल्या उल्लेखाने दुःख होते आहे. अर्थात हे दुःख होणेही स्वाभाविक आहे. कारण प्रस्थापित नीतिमत्तेच्या चौकटींमध्ये स्त्रियांच्या शरीरावर जातसमंत पुरुषांची मालकीच फक्त पवित्र मानली जाते. त्याव्यतिरीक्त ती व्यभिचारी किंवा वेश्या ठरवली जाते आणि वेश्या कधीही पवित्र असू शकत नाही अशी इथल्या एकूणच समाजाची धारणा आहे. बंजारा समाजही त्याला अपवाद नाही. केवळ बंजाराच नाही, तर जगातल्या कुठल्याही स्त्रियांवर आपल्या मर्जी विरुद्ध शरीर विकण्याची वेळ येऊ नये असे आम्हाला वाटते. मात्र तुमच्या कादंबरीतील या उल्लेखाने दुखावलेल्या लोकांनी कुणी वेश्याव्यवसाय करू नये यासाठी आजपर्यंत नेमकं काय काम केलेलं आहे हे आम्हाला माहिती नाही. त्यासाठी कुठला कृतीकार्यक्रम आखलेला आहे का याचीही आम्हाला कल्पना नाही. मात्र आताच काही दिवसांपूर्वी चळवळीतले कार्यकर्ते एड. निहालसिंग राठोड यांनी नागपूरच्या एका मोठ्या वेश्यावस्तीतून बंजारा समाजातील दोन मुलींची सुटका केली आहे. या दोन मुली म्हणजे संपूर्ण बंजारा समाजातील स्त्रिया आहेत असे समजण्याची चूक आम्ही कधीही करणार नाहीत.


लेखन ही केवळ आमच्यासाठी भाषिक कृती नाही, तर सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय कृती देखील आहे. ती सर्जनाच्या अनेक शक्यता घेऊन प्रसृत झालेली असते. तीतून अर्थाची-अनर्थाची अनेक वलयं निर्माण होतात. ज्यांना साहित्याची मुलभूत समज नसते, ते अर्थाचा अनर्थ करून आपापल्या बौद्धिक मर्यादा सिद्ध करत असतात. मानवी अस्तित्त्वाची आणि अस्तित्त्वापलीकडचीही अमर्याद पोकळी साहित्यासाठी खुली असते. समाजाला हवे ते लिहिणारा लेखक समाजमान्य पावतो. मात्र ती मान्यता तात्कालिक असते. परंतु समाजाच्या पुढे जाऊन लिहिणारा लेखक युगप्रवर्तक ठरतो अशी आमची धारणा आहे. या पार्श्वभूमीवर आपण युगप्रवर्तक लेखक आहात किंवा नाहीत? आपण देशीवादातून बहुजन हिंदुत्ववाद जोपासता आहात कि ब्राम्हणी हिंदुत्ववाद? आपले लेखन मानवमुक्तीवादी आहे कि संकुचित मुलतत्ववादी? हे येणारा काळच ठरवेल आणि त्या संबंधाने नेहमीसारख्या गरमागरम चर्चाही सातत्याने झडत राहतील. परंतु आत्ता याक्षणी आपल्या लेखन स्वातंत्र्याचा आदर राखला जाणे आम्हाला महत्त्वाचे वाटते आहे. आमचे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याला, विरोध नोंदवण्याला आणि आपल्या मागण्या मांडण्याला आक्षेप असण्याचे कारण नाही. कारण लेखकाचा मत मांडण्याचा अधिकार हा जसा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत येतो तसेच त्या मताला विरोध करण्याचे स्वातंत्र्यही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत येते. परंतु या विरोधाचा मार्ग संवैधानिक असला पाहिजे, तरच त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी जोडता येईल. अन्यथा विरोधाच्या नावाखाली सामाजिक गलबला माजवत धाक-दडपशाहीने विरोधी मताचा आवाज दाबून टाकणे हे लेखकाच्या मुलभूत अधिकारावरील आक्रमण आहे असे आम्हाला वाटते. त्यातही सौ. प्रतिभाताई नेमाडे यांस गोर बंजारा समाजातील काही अनिष्ट वृत्तीच्या लोकांनी फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली ही बाब एका शांत आणि सौहार्दपूर्ण जीवन जगणाऱ्या गोर बंजारा समाजाचा घटक म्हणून आम्हाला अपमानास्पद वाटते. आम्ही आपल्या देशीवादाचे विरोधक आहोत. देशीवाद हा इथल्या पारंपारिक जातीव्यवस्थेचं आणि त्याअंतर्गत असणाऱ्या शोषणव्यवस्थेचं समर्थन करतो अशी आमची पक्की धारणा आहे आणि आम्ही वेळोवेळी आमच्या लेखनातून त्याबद्दलचा विरोध नोंदवलेला आहे, पुढेही नोंदवत राहू. परंतु एक लेखक म्हणून तुमच्या लेखन स्वातंत्र्यावर कोणी झुंडीने आक्रमण करत असेल, तर अशावेळी आम्ही जात-धर्म-पंथ-प्रदेश बाजूला सारून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने ठामपणे उभे राहू. मग आम्हाला आमच्या जातीने बहिष्कृत केले तरी बेहत्तर! तसेही आम्ही बंजारा जातीत जन्माला आलो यात आमचं काहीही कर्तुत्व नाही. आमचे आईबाप लमाण होते म्हणून आम्ही लमाण झालो. अन्यथा आमचे आईबाप भंगी असते तर भंगी झालो असतो किंवा ब्राम्हण असते तर ब्राम्हण झालो असतो. त्यामुळे कुठल्याही जातीचा अहंगड बाळगणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे असे आमचे ठाम मत आहे. त्यामुळेच आम्हाला आमच्या जातीचा ना अभिमान आहे ना अपमान. आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो आहोत ही आमच्यासाठी एकमेव अभिमानाची गोष्ट आहे.

सामाजिक लढ्याची, चळवळीची परिभाषा अस्मितादर्शी राजकारणात परावर्तीत झाली कि, समाजाच्या भौतिक विकासाची वाटचाल अपोआप मंदावते. गोर बंजारा समाजाने यापूर्वी कधीही अशा वांझोट्या अस्मितेच्या राजकारणात आपली उर्जा खर्च केलेली नाही. त्याने कुठल्याही जाती-धर्म-पंथ-प्रदेशाचा विटाळ मानला नाही. म्हणूनच तो शीख-बौद्ध-मुस्लीम-ख्रिश्चन-हिंदू अशा सगळ्या धर्मांमध्ये आणि वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विखुरलेला आढळतो. तरीही त्याने आपली सांस्कृतिक वैशिष्ट्ये तशीच टिकवून ठेवलेली आहे. जात म्हणून नाही, तर संस्कृती म्हणून हा समाज एकमेकांशी जोडला गेलेला आहे. त्याला जातीय अस्मितेसाठी एकत्र आणणं आणि झुंडशाहीला खतपाणी घालणं हे गोर बंजारा समाजाच्या मूळतत्त्वाशी विसंगत आहे असे आम्ही मानतो. जे कुणी हे करत आहेत ते समग्र गोर बंजारा समाजाचे प्रतिनिधी असू शकत नाहीत. कारण गोर बंजारा समाज हा मूलतः स्वतंत्र प्रवृत्तीचा आणि स्वतःसहित इतरांचेही स्वातंत्र्य जपणारा आहे. त्यामुळे तुम्हाला होणाऱ्या त्रासाला फक्त हिंदुत्वाच्या अडगळीला पडलेली काही लोकंच कारणीभूत आहेत, एवढे लक्षात आणून देण्यासाठीच हा पत्र प्रपंच! बाकी आपल्या लोभाची अपेक्षा नाही. कळावे.

आपले विश्वासू,

- प्रा. श्याम मुडे, सत्यशोध शिक्षक सभा

- श्री. सुदाम नारायण राठोड

- ऍड.निहालसिंग राठोड

Tags:    

Similar News