नगर पंचायत ELECTION : कॅबिनेट मंत्र्यांनाच धक्का, काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा भगवा

Update: 2022-01-19 07:33 GMT

नंदुरबार : गेल्या काही दिवसात आरोप प्रत्यारोपांनी नगरपंचायत निवडणूक चांगलीच गाजली होती. त्याचे बुधवारी निकाल लागले. त्यात नंदुरबार जिल्ह्यात थेट कॅबिनेट मंत्री असलेल्या के सी पाडवी यांना धक्का देत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेनाचा भगवा फडकला आहे.

राज्यात नगरपंचायत निवडणूक वेगवेगळ्या आरोप प्रत्यारोपांमुळे गाजली. त्यात काही ठिकाणी महाविकास आघाडी तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवर पक्षांनी वेगळी चूल मांडली. त्यापार्श्वभुमीवर नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव नगरपंचायत काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जात होती. तर धडगाव नगरपंचायतीवर मंत्री के सी पाडवी यांचे एकहाती वर्चस्व होते. मात्र बुधवारी लागलेल्या निकालात मंत्री के सी पाडवी यांना धक्का देत धडगाव नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धडगाव नगरपंचायतीत शिवसेनेने 17 पैकी 13 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर भाजपाच्या पारड्यात 1 जागा पडली आहे, हा काँग्रेसचे मंत्री असलेल्या के सी पाडवींना मोठा धत्ता मानला जात आहे.

याबरोबरच धडगांव-वडफळ्या-रोषमाळ बू नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी शिवसेना, काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, अपक्ष असे 48 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.आज झालेल्या मतमोजणीत कॉग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले आहे. तर शिवसेनेला 17 पेकी 13 जागा मिळाल्याने धडगाव नगरपंचायतीवर पहिल्यांदाच शिवसेनेचा नगराध्यक्ष विराजमान होईल, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे हा के सी पाडवींना मोठा धक्का मानला जात आहे. 

Tags:    

Similar News