वंचित बहुजन आघाडीचा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर रास्तारोको ; मंत्री शंकरराव गडाखांवर गंभीर आरोप

Update: 2021-11-01 11:23 GMT

अहमदनगर :  वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे 2019 चे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार संजय सुखदान यांच्यावर राजकीय द्वेषातून खोटे गुन्हे दाखल करणे, घरासमोर येऊन शक्तिप्रदर्शन करणे,कार्यकर्त्यांकरवी धमकावणे असे गंभीर आरोप मंत्री गडाख यांच्यावर करण्यात आले आहे. याबाबत वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडे तक्रार करून देखील पोलीस प्रशासन दखल घेत नसल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनास भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी भेट देत पाठिंबा दिला.

दरम्यान यावेळी बोलताना माजी आमदार मुरकुटे यांनी म्हटले की, काही दिवसांपूर्वी गडाख कुटुंबातीलच गौरी गडाख यांची आत्महत्या, दोन दिवसांपूर्वी प्रशांत गडाख यांचे स्वीयसहाय्यक प्रतीक काळे याची आत्महत्या आणि राजकीय द्वेषातून दडपशाही केल्याने संजय सुखदान यांनी देखील संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता, त्यामुळे पदाचा गैरवापर करणाऱ्या शंकरराव गडाख यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकारी नाही असं मुरकुटे यांनी म्हटले आहे.

दरम्यान यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांनी देखील मंत्री गडाख यांच्यावर घणाघात केला, मंत्री पदाचा गैरवापर करत गोरगरीब जनतेला वेठीस धरण्याचे काम करत असल्याचा आरोप केला आहे.

Tags:    

Similar News