आरे कारशेडविरोधात प्रकाश आंबेडकर यांनी थोपटले दंड; दिली आंदोलनाची हाक

मुंबईतील मेट्रो-३ कारशेड हे आरे येथेच होणार असल्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. त्यातच या निर्णयाला जोरदार विरोध होत असताना सर्वोच्च न्यायालयानेही सरकारला दणका दिला आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही आरे कारशेडविरोधात दंड थोपटले आहेत.

Update: 2022-08-05 14:47 GMT

शिंदे-फडणवीस सरकारने पहिल्याच कॅबिनेट बैठकीत ठाकरे सरकारने रद्द केलेल्या आरे कारशेडला मंजूरी दिली. मात्र या निर्णयाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात विरोध होत असतानाच सर्वोच्च न्यायालयानेही आरे कारशेड प्रकरणी शिंदे-फडणवीस सरकारला दणका देत आरे येथील वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे. दरम्यान आरे कारशेड विरोधात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही आंदोलनाची हाक दिली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत या आंदोलनाची घोषणा केली. यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने गोरेगाव येथेच मेट्रो कारशेड बांधण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे या शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रविवारी (७ ऑगस्ट) रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. कारण आरे येथील जंगल मुंबईच्या ऑक्सिजनचा मोठा स्रोत आहे. त्यामुळे हे जंगल वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आंदोलनास्र उगारणार आहे.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आरे येथील जंगल हे मुंबईसाठी ऑक्सजनचा मोठा स्रोत आहे. हा ऑक्सिजनचा स्रोतच संपला तर मुंबईत राहणे कठीण होईल. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

दरम्यान आरे येथील दुग्धवसाहतीतील झाडं तोडण्याविरोधात पर्यावरण प्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर शुक्रवारी सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका देत पुढील सुनावणी होऊस्तोवर आरे येथील वृक्षतोड स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.

मेट्रो-३ अंतर्गत येणाऱ्या वांद्रे-कुलाबा-सीप्झ या मार्गिकेदरम्यान आरेतील कारशेडच्या कामासाठी एकही झाड तोडण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तर या प्रकरणावर पुढील सुनावणी बुधवारी 10 ऑगस्ट रोजी होणार आहे.

Tags:    

Similar News