नवाब मलिकांनी आरोप केल्यानंतर जास्मीन वानखेडे मीडियासमोर, सर्व आरोप फेटाळले

Update: 2021-10-21 09:04 GMT

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच NCBवर सातत्याने गंभीर आरोप करणारे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आता NCBचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Vankhede) यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. नवाब मलिक गेले काही दिवस म्हणून लेडी डॉन (Lady don) म्हणून ज्यांचा उल्लेख करत आहेत, तसेच त्यांच्यावर वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत, त्या जास्मीन वानखेडे (Jasmine Vankhede) यांनी सर्व आरोप फेटाळत नवाब मलिक यांच्यावर पलटवार केला आहे.

बॉलिवूडच्या (bollywood) लोकांकडून मालदीवमधून (maldive )सर्व वसुली करण्यात आली असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. कोरोना काळात संपूर्ण फिल्म इंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये (Dubai) होती, त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान समीर वानखेडे यांच्या परिवारातील सदस्याचे सोशल मीडियावरील मालदिवमधले फोटो मलिक यांनी सादर केले आहेत. समीर वानखेडे दुबई, मालदीवमध्ये होते का? त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का याचं उत्तर अपेक्षित आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

"अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची NCBमध्ये बदली करण्यात आली आणि लगेच रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. ४-४ हजार रुपयांच्या पेमेंटच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. व्हॉटस्ॲप चॅटच्या माध्यमातून अभिनेत्री व अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभे करण्यात आले व दहशत निर्माण करण्याचे काम झाले. एवढेच नाही तर कोरोना काळात संपूर्ण फिल्म इंडस्ट्री मालदिवमध्ये असताना ही सर्व वसुली मालदीव व दुबईमध्ये झाली" असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

दरम्यान जास्मिन वानखेडे ह्या मनसेच्या पदाधिकारी आहेत आणि त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे असून पक्ष त्यांच्या पाठिशी उभा राहिल, असे मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी सांगितले आहे. अमेय खोपकर यांनी जास्मीन वानखेडे यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन मलिक यांचे सर्व आरोप फेटाळले. तसेच जास्मीन वानखेडे यांनी मलिक यांच्याविरुद्ध कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल कऱणार असल्याचेही यावेळी सांगितले. तसेच जास्मिन वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांच्याकडून केले जाणारे आरोप आम्ही खपवून घेणार नाही, असं मनसे नेते अमेय खोपकर यांनी म्हटलंय. "जास्मिन वानखेडे या मनसे चित्रपट सेनेच्या पदाधिकारी राहिल्या आहेत. त्या रात्रंदिवस महिला आणि मुलांसाठी काम करतात आणि त्यांना न्याय मिळवून देतात. आमच्या पदाधिकाऱ्यावर खालच्या पातळीची टीका केल्यास आम्ही खपवून घेणार नाही. नवाब मलिकांकडे त्यांच्या विरोधात काय पूरावे आहेत, हे त्यांनी दाखवून द्यावं" असे आव्हान देखील मनसेनं नवाब मलिक यांना दिले आहे.

Tags:    

Similar News