"पंजाबच्या अस्वस्थेची किंमत इंदिरा गांधींच्या हत्येच्या रुपाने मोजली" शरद पवार यांचा इशारा कुणाला?

Update: 2021-10-16 13:23 GMT

दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता १ वर्ष पूर्ण होणार आहे. पण अजूनही केंद्र सरकारने यावर तोडगा काढलेला नाही. शेतकरी आंदोलनाबाबत सरकारने घेतलेल्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंजाबमधील शेतकऱ्यांना अस्वस्थ होऊ देऊ नका, देशाने एकदा अस्वस्थ पंजाबची किंमत इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या रुपाने मोजली आहे, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांनी देशाच्या अन्न उत्पादनात मोठे योगदान दिले आहे. ते देश संरक्षणातही अग्रेसर असतात, असेही पवारांनी म्हटले आहे.

शेतकरी आंदोलनाबाबत केंद्राने घेतलेली भूमिका समंजसपणाची नाही. कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानातील काही भागातील जास्त शेतकरी सहभागी आहेत. त्यातही पंजाबच्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे केंद्राने पंजाबमधील शेतकऱ्यांना अस्वस्थ होऊ देऊ नका असे आवाहन त्यांनी नरेंद्र मोदी यांना केले आहे.

पंजाब हे देशाच्या सीमेवरील राज्य आहे. याच सीमेवरच्या शेतकऱ्यांना अस्वस्थ केल्यावर त्याचे वाईट परिणाम होतात. या देशाने अस्वस्थ पंजाबची किंमत एकदा मोजली आहे. इंदिरा गांधी यांच्या हत्येपर्यंत ही किंमत दिली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

Tags:    

Similar News