महाराष्ट्र हादरला; H3N2 चे राज्यात दोन बळी

जगभरात कोरोना विषाणूचा धोका कमी झाला असला तरी इतर अनेक विषाणू वाढत आहेत. महाराष्ट्रात कोरोना सारखी लक्षणे असलेल्या H3N2 इन्फ्लूएंझाची प्रकरणे वाढत असून राज्यात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

Update: 2023-03-15 06:23 GMT

पहिला मृत्यू अहमदनगरमध्ये एमबीबीएस शिकणाऱ्या 23 वर्षीय वैद्यकीय विद्यार्थ्याचा आणि दुसरा नागपूरमध्ये झाला. देशात H3N2 इन्फ्लूएंझा वाढत आहे. राज्यातही या आजाराची साथ पसरली असून अनेकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होत आहे. या विषाणूची लक्षणे कोरोना सारखीच असल्याने अधिक चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, एमबीबीएसची विद्यार्थी फिरायला बाहेर पडला. तेथून आल्यानंतर त्यांला कोरोनाची लागण झाली. तसेच, त्याला H3N2 ची लागण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. दुसरी घटना नागपुरात घडली आहे. नागपुरात ७५ वर्षीय व्यक्तीचा H3N2 मुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यात H3N2 मुळे आतापर्यंत २ मृत्यू झाले असून संपूर्ण देशभरात या विषाणूमुळे चारजणांचा जीव गेला आहे.

सतत बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम लोकांवर होत आहे. तसेच हवेची गुणवत्ता ढासळल्याने प्रदूषणातही वाढ झाली आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला या आजारांमध्ये वाढ होत आहे. राज्यातील अनेक दवाखाने आणि रुग्णालये रुग्णांनी फुलून गेली आहेत. दरम्यान, H3N2 चा वाढता प्रसार चिंता वाढवत आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसंच, सोशल डिस्टन्सिंगसारख्या कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केल्यास H3N2 चा प्रसार रोखता येईल, असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News