Home > News Update > राज्यातील लॉकडाऊन कधीपर्यंत? मुख्यमंत्र्यांनी मांडली भूमिका

राज्यातील लॉकडाऊन कधीपर्यंत? मुख्यमंत्र्यांनी मांडली भूमिका

राज्यातील लॉकडाऊन कधीपर्यंत? मुख्यमंत्र्यांनी मांडली भूमिका
X

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरु करावे लागले आहे. पण मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. पण तरीही लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्याचा आता कोणताही विचार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीच्या पहिल्या भागात मुख्यमंत्र्यांनी राज्याचा कोरोनाशी लढा कसा सुरू आहे याबाबत सविस्तर माहिती दिलीये.

माणसांचे जीव वाचवायचे असतील तर लॉकडाऊन एकदम उठवता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे. मुंबईत सर्व सामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा विचार नसल्याचेही संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. लॉकडाऊन उठवल्यानंतर अनेक देशांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याची उदाहरणे असल्याने तसा निर्णय घेणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. जे लोक लॉकडाऊन उठवण्याची मागणी करत आहेत ते लोकांचे जीव गेल्यास त्याची जबाबदारी घेणार आहेत का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

“अंतिम वर्षाच्या परीक्षा नाहीच”

कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. युजीसीने जरी परीक्षा सक्तीच्या असल्याचे म्हटले असले तरी विद्यार्थ्यांच्या जीवाच्या दृष्टीने परीक्षा घेणे योग्य होणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील कामगिरीच्या मुल्यांकनानुसार मार्क द्यावे तसेच ज्या विद्यार्थ्यांना मार्क कमी वाटतील त्यांना परीक्षा देण्याची मुभा देता येऊ शकते या पर्यायांचा मुख्यमंत्र्यांनी पुन्हा उल्लेख केला आहे.

हे ही वाचा...

कोरोनावरील उपचारांसाठीच्या औषधांचा काळाबाजार, एक इंजेक्शन 60 हजारांना

शाळा कधी सुरू होणार?

दरम्यान राज्यातील शाळा सध्या सुरु करता येणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. शाळा सुरु करण्यापेक्षा शिक्षण सुरू करण्यावर भर असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी ई लर्निंगचा पर्याय असल्याचे सांगितले आहे. विद्यार्थ्यांना घरबसल्या कसे शिक्षण देता येईल याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेत्यांना पोटदुखी

याच मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही चिमटे काढले आहेत. मी घरात बसून काम करतो अशी टीका माझ्यावर होते. पण बाहेर नुसते फिरण्यापेक्षा घरी बसलो तर अभ्यास करता येतो, असा टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला आहे.

Updated : 25 July 2020 2:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top