Home > मॅक्स व्हिडीओ > कोरोनाने धारावीचा रोजगार बदलला...

कोरोनाने धारावीचा रोजगार बदलला...

कोरोनाने धारावीचा रोजगार बदलला...
X

जगात लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या शहरांमध्ये मुंबई चा समावेश होतो. त्यातच मुंबईतील धारावीची परिस्थिती अत्यंत दाटीवाटीची असते. धारावीत दहा बाय बारा फुटांच्या घरात आठ ते दहा जण राहतात. दुमजली-तीन मजली झालेल्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात लघुउद्योग आहेत.

अशा परिस्थितीत धारावीत कोरोनाला कसं रोखणार? असा सवाल वारंवार उपस्थित केला जात आहे. त्यामुळं धारावीतील रहिवासी धास्तावले आहेत. मजुरांच्या स्थलांतरामुळे उद्योग पुन्हा सुरू होतील की नाही? अशी शंका निर्माण झाली आहे.

लॉकडाऊनची पहिली घोषणा झाली, तेव्हा मजुरांनी वाट पाहणे पसंत केले. लॉकडाऊन तिसऱ्यांदा वाढल्यानंतर मजुरांच्या पायाखालची वाळू सरकली. काही कामगारांनी कोणत्याही यंत्रणेला न कळवता थेट गावाचा रस्ता धरला. त्यांची प्रशासनाकडे नोंद नाही. आतापर्यंत मुंबईतून आत्तापर्यंत सुमारे 2 लाख मजुरांनी स्थलांतर केल्याचे समजते. सध्या धारावीतील एक लाख 30 हजार मजुरांनी गावी जाण्यासाठी पोलिस ठाण्यात अर्ज दाखल केले आहेत.

लॉकडाऊनचा मोठा फटका धारावीतील सुमारे साडेपाच हजार लहान-मोठ्या उद्योगांना बसला आहे. घराघरातील लघुउद्योगांमध्ये हजारो मजूर काम करतात. धारावीत दररोज 200 ते 250 कोटी रुपयांची उलाढाल होत असते. उद्योग बंद असल्याने ही उलाढाल ठप्प झाली आहे. धारावीला आर्थिक केंद्र म्हणून पाहिले जात नाही, अशी खंत येथील उद्योजक व्यक्त करता.

धारावीतील 12 लाख लोकसंख्येपैकी 99 टक्के नागरिक लघुउद्योगांशी जोडले गेले आहेत. आता कोरोनाने त्यांच्या जगण्याचे हाल केले आहेत.

धारावीत राहणारे गृहस्थ शाहजाद पूर्वी चारचाकी गाडी चालवण्याचे काम करायचे. पण आत्ता ते दुसरंच काम करत आहे. त्यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितले की, मी गेली 5 वर्ष गाडीवर चालक म्हणून काम करत होतो. पण या कोरोनाच्या काळात गाडी चालवणे खूप कठीण झालं आहे. आणि त्यात कोरोनाची भीती पण आहे. त्यामुळे ते काम मी बंद केलं.

माझ्यासारखेच माझे 4 ते 5 मित्र घरी बसले होते. मग आम्ही सगळे मिळून एकत्र येत एक व्यवसाय करण्याचं ठरवलं. त्यानुसार आम्ही हा फळांचा व्यवसाय करतो. 20 ते 30 हजार रुपयांचा माल घेऊन येतो आणि धारावीमधील स्थानिक फळविक्रेत्यांना आम्ही 2 रुपये ठेऊन फळ विकतो.

हे ही वाचा

धारावी: अनलॉक केल्यानंतर परिस्थीती ठीक होण्यास काही वर्ष लागतील…

धारावी: तीन महिन्यांपासून गावाकडं रुपया पाठवला नाही, कसं जगत असतील…

त्यामुळे आम्हांला देखील चार जणांना काही पैसे सुटतात आणि आमचं घर चालत. माध्यमांनी धारावीच नाव खूपच खराब केलं पण तसं काही चित्र सध्या तरी धारावीमध्ये नव्हतं. आम्ही सुद्धा धारावीमध्ये राहतो. त्यामुळे आम्ही तर डोळ्याने पाहिलं आहे. पण आत्ता धारावीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.

मात्र, व्यवसाय सुरु झालेले नाहीत. त्यामुळं सध्या हा व्यवसाय आम्ही करत असल्याचं शाहजाद यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितलं.

Updated : 24 July 2020 8:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top