Nagar panchayat Election : राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजप-काँग्रेस एकत्र?

नगरपंचायत निवडणूक आरोप प्रत्यारोपांनी चांगलीच गाजली. कोकणात महाविकास आघाडीतील पक्षच एकमेकांविरोधात उभे टाकल्याचे दिसून आले. मात्र कुडाळमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने काँग्रेसची भुमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे कुडाळमध्ये भाजप काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे.

Update: 2022-01-19 10:57 GMT

कुडाळ नगरपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडीत पक्षच एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. तर कुडाळमध्ये शिवसेना 7, भाजप 8 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्याने कुडाळ नगरपंचायतीमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभुमीवर सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस किंगमेकर ठरणार आहे.

नगरपंचायत निवडणूक काँग्रेसने स्वतंत्र लढवली. यावेळी महाविकास आघाडीच्या दोन्ही पक्षांनी काँग्रेसची गळचेपी केली. त्यामुळे यातून काँग्रेस बाहेर पडली. त्यामुळे त्यांना गरज असली तरच त्यांना महाविकास आघाडीसोबत जाणार. नाहीतर एक दिवस दोन्ही पक्षांची गळचेपी करणार असल्याचा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी शिवसेना आणि काँग्रेसला दिला. तर जो पक्ष काँग्रेसचा मान सन्मान ठेऊन एक नंबरचे पद जो पक्ष देईल त्याच्या सोबत युती करणार असल्याचे बाळा गावडे यांनी सांगितले. त्यामुळे काँग्रेस भाजप युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकमेकांविरोधात लढून सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात, तर स्थानिक पातळीवर काँग्रेसला सोबत घेऊन कुडाळ नगरपंचायतीत भाजप सत्ता स्थापन करू शकते, असा दावा केला आहे. मात्र या युतीसंदर्भात वरीष्ठ निर्णय घेतील, असेही रणजीत देसाई यांनी सांगितले आहे. मात्र रणजीत देसाई यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजप काँग्रेस युती होण्याची शक्यता वाढली आहे.

देवगड नगरपंचायत-

कोकणातील नारायण राणे यांच्या ताब्यात असलेली देवगड नगरपंचायत आताच्या निकालात त्रिशंकू अवस्थेत गेली आहे. तर यामध्ये शिवसेना आणि भाजपचे 8-8 नगरसेवक निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली आहे. याबरोबरच देवगड नगरपंचायतीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या उपस्थितीत देवगड शहरातून शिवसेनेच्या वतीने फटाक्यांच्या आतिषबाजीत घोषणा देण्यात आल्या. तर देवगडमध्ये त्रिशंकु परिस्थिती असली तरी राष्ट्रवादीचा उमेदवार शिवसेनेसोबत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेकडून जल्लोष केला जात आहे.

Tags:    

Similar News