कोरोनानंतर मुलांमध्ये नवीन आजाराची लक्षण, काय मल्टी सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोम?
Courtesy -Social media
कोरोनानंतर होणाऱ्या म्यूकरमायकोसिसच्या नव्या आव्हानानंतर राज्यातील आरोग्य यंत्रणेसमोर आणखी एक मोठं आव्हान उभं ठाकलंय ते म्हणजे MIS - C. MIS-C म्हणजे मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन (Multi Inflammatory Syndrome in Kids). या आजारात लहान मुलांना कोविड होऊन गेल्यानंतर 2 ते 4 आठवड्यांनंतर या आजाराची लक्षणं आढळतात.
नेमकी काय आहे. मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोम? या सिंड्रोमची लक्षण काय आहे? यामध्ये पालकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे? याबाबत पालकांसमोर अनेक प्रश्न पडलेले आहेत.
खरं तर लहान मुलांना कोरोनाचा मोठा धोका नाही असं बालरोगतज्ज्ञांचं म्हणणं आहे. केवळ 3 ते 5 टक्के मुलांना कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येऊ शकते. मात्र, मुलांच्या शरीरात कोव्हिडसाठीच्या अँटीबॉडीज असतात आणि त्यांच्या शरीरातली रोग प्रतिकारक शक्ती जास्त कार्यरत असतात. असं तज्ज्ञ सांगतात. मात्र, आता मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोममुळे आरोग्य यंत्रणेसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे.
मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोम ही गोष्ट अतिशय दुर्मिळ आहे. त्यामुळे पालकांनी घाबरून न जाता या आजाराची लक्षणे आपल्या पाल्यांमध्ये दिसली तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपल्या पाल्यांना रुग्णालयात दाखल करणं गरजेचं आहे.
मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोमची लक्षणे...
मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोमच्या लक्षणांबाबत पालकांना माहिती असायला हवी.
मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोममध्ये मुलांच्या शरीरातल्या महत्त्वाच्या अवयवयांचा दाह होतो. मुलांचे पोट बिघडते, पोट दुखते, मुलांना उलट्या होणे, अंगावर पुरळ येणे, डोळे लाल होणे, ताप येणे, जीभ - घसा लाल होणे अशी लक्षणे आढळून येतात.
अशी लक्षण आढळून आल्यास पालकांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांमध्ये चिडचिड होणे आणि लहान मुलं सतत रडणे असे प्रकार होतात. जरी बालकांमध्ये कोरोनाचा धोका कमी असला तरी लहान मुलांना कोरोना होऊन गेल्यावर पालकांनी निर्धास्त न होता. कोरोनंतर 2 ते 4 आठवड्यात मुलांमध्ये अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोममध्ये हृदय, फुफ्फुसं, किडनी, मेंदू, डोळे, त्वचा, पोटातील आतडी या अवयवांवर परिणाम होऊ शकतो. असं तज्ज्ञ सांगतात. मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोमवर तातडीने उपचार होणं गरजेचं आहे.अशीच मिळती जुळती लक्षणे कावासाकी सिंड्रोममध्ये देखील पाहायला मिळतात. कावासाकी सिंड्रोम हा 5 वर्षांखालच्या मुलांमध्ये आढळतो.
घरातल्या एखाद्या व्यक्तीला कोरोना होऊन गेला असेल आणि घरातील लहान मुलांची कोरोना चाचणी केली गेली नसेल तर काही दिवसात मुलांमध्ये अशी लक्षणे आढळली तर मूलही एसिम्प्टमॅटिक असण्याची शक्यता असते आणि त्यांना मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोम होण्याची शक्यता असते. त्यामुळे याबाबत डॉक्टरांना कल्पना देणं गरजेचं आहे. बऱ्याचदा लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत नसल्याने अँटीबॉडी टेस्ट द्वारेच कळू शकते की, मुलांना कोरोना होऊन गेला अथवा नाही. या टेस्टनंतररच मुलांना मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोम झाला आहे की नाही हा निष्कर्ष डॉक्टर लाऊ शकतात. वेळेत उपचार केल्यास मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोमवर मात करता येऊ शकते असं तज्ज्ञांच मत आहे. त्यामुळे पालकांनी घाबरून न जाता लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.