Fact Check | दिल्ली हिंसाचारात गोळीबार करणारा ‘तो’ अनुराग मिश्रा नाही!

Update: 2020-02-28 09:00 GMT

राजधानी दिल्लीत CAA विरोधातील आंदोलनाला २४ फेब्रुवारी रोजी हिंसक वळण लागले. या हिंसाचाराने उत्तर-पश्चिम दिल्लीतील अनेक भागांत दगडफेक आणि जाळपोळाच्या घटना घडल्या. काही ठिकाणी समाजकंटकांनी गोळीबारही केला. या हिंसाचारात आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काय आहे नेमकं प्रकरण आणि काय आहे या फोटोचं वास्तव, जाणून घेऊ.

 

दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर अनुराग मिश्रा या इसमाचा फोटो सोशल मीडियासाठी व्हायरल होत असून दिल्लीत झालेल्या गोळीबारासाठी अनुराग मिश्राला जबाबदार धरले जात आहे. अनुराग मिश्रानेच गोळीबार करून हिंसाचाराचा भडका उडवून दिला, असा दावा व्हाट्सअप आणि फेसबुकवर व्हायरल पोस्टमधून करण्यात येतोय.

व्हायरल पोस्ट्स –

Full View

Full View

तथ्य पडताळणी –

दिल्लीतील जाफराबाद इथं झालेल्या हिंसाचारादरम्यान गोळीबार करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचं नाव शाहरूख शेख आहे. दिल्ली पोलीसांनी त्याला हिंसाचाराच्या दुसऱ्या दिवशी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं दिली होती.

एएनआय ट्विट –

त्यानंतर शाहरूखला २५ फेब्रुवारी रोजी दिल्ली पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती एएनआयने दिली. मात्र, २७ फेब्रुवारी रोजी दिल्ली पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने पुन्हा स्पष्ट केलं की, शाहरुखला अटक करण्यात आलेली नाही आणि त्याचा शोध सुरू आहे.

ज्या अनुराग मिश्राचे फोटो व्हायरल होत आहेत, तो एक अभिनेता असून सध्या मुंबइत वास्तव्यास आहे.

फोटो व्हायरल झाल्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी आपण एका कार्यक्रमासाठी वाराणसी इथं होतो असं अनुरागने स्पष्ट केलंय. आपल्या फोटोंचा गैरवापर केल्याबद्दल त्याने वाराणसीच्या सिंगरा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. याची माहिती सायबर सेलकडेही देण्यात आली आहे.

स्पष्टीकरण देताना अनुरागने आपल्या फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Full View

निष्कर्ष –

दिल्ली हिंसाचारात गोळीबार करणारा व्यक्ती म्हणून अनुराग मिश्राचे व्हायरल होत असलेले फोटो आणि माहिती खोटी आणि तथ्यहीन आहे. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचं नाव शाहरूख असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Similar News