समीर वानखेडे यांना पुन्हा धक्का, बारचा परवाना रद्द

Update: 2022-02-02 06:19 GMT

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आलेले आणि नंतर गंभीर आरोपांमुळे वादात अडकलेले NCBचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना आता राज्य सरकारने आणखी एक दणका दिला आहे. समीर वानखेडे यांच्या मालकीचा नवी मुंबईतील बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी या बारचा परवाना रद्द केला आहे. समीर वानखेडे यांच्या नावावर नवी मुंबईमध्ये सदगुरू हॉटेल आणि बारचा परवाना होता. पण समीर वानखेडे यांनी या बारचा परवाना मिळवताना कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी हा परवाना रद्द केला आहे.

समीर वानखेडे यांनी २७ ऑक्टोबर १९९७ रोजी या बारचा परवाना मिळवला होता. पण त्यावेळी त्यांचे वय १८ वर्षदेखील नव्हते. परवाना मिळवण्यासाठी किमान २१ वर्षे वयाची अट होती. पण या ठिकाणी ही अट पाळली गेली नसल्याचे सिद्ध झाल्याने ही कारवाई कऱण्यात आल्याचे वृत्त टाईम्ह ऑफ इंडियाने दिले आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याच्या निर्णयावर जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी सही केली आहे, असेही या वृत्तामध्ये सांगण्यात आले आहे.

समीर वानखेडे यांच्या या परवान्याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी संबंधित यंत्रणांकडे तक्रार केली होती. एखादा महसुली अधिकारी स्वताचा व्यवसाय करु शकतो का आणि अल्पवयीन समीर वानखेडे यांना परवाना कसा देण्यात आला, असे दोन मुद्दे मलिक यांनी मांडले होते. समीर वानखेडे यांनीही आपण सरकारी सेवेत दाखल होण्याआधी बारचा परवाना मिळवला होता याची कबुली आधाची दिली आहे. आता समीर वानखेडे यांच्यावर या प्रकरणात काही कारवाई होणार का, याची माहिती मात्र अद्याप मिळू शकलेली नाही.

Similar News