सुभाष देसाईंनी सांगितला, शरद पवार-बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीचा किस्सा

Update: 2023-08-06 06:52 GMT

मैत्री साजरी करण्यासाठी कुठल्याही विशेष दिनाची आवश्यकता काय, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. मात्र, तरीही ६ ऑगस्ट हा जागतिक मैत्री दिवस म्हणून साजरा केल जातो. आता याच दिवसाचं औचित्य साधून राजकारणातील मैत्रीचे काही किस्से नेत्यांनी सांगायले सुरू केले आहेत. त्यापैकीच मैत्रीचं एक उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री. शिवसेनेचे (उबाठा) आमदार सुभाष देसाई यांनी या दोघांच्या मैत्रीचा एक किस्साच मैत्री दिनानिमित्त शेअर केलाय.

सुभाष देसाई यांनी ट्विटर वर एक पोस्ट केलीय. या पोस्टची सुरूवातच ,” विश्व मैत्री दिन सुरु करण्याची प्रेरणा श्रीकृष्ण-सुदाम्यापासून मिळाली काय ? माहिती घेतली पाहिजे. दोस्तीचे गोडवे गाताना बॉलिवूड तर कधीच थकत नाही, अशा पद्धतीनं देसाई यांनी ट्विटची सुरूवात केलीय.

देसाई यांनी मैत्रीची व्याख्या अधिक स्पष्ट करतांना बॉलीवूडमधील गाजलेल्या चित्रपटांची उदाहरणं दिली आहेत. ते म्हणाले,“ शोलेतील जय-विरू काय किंवा मुन्नाभाई एमबीबीएस मधले मुन्ना-सर्किट काय, पडद्यावरचा दोस्ताना थांबला नाही आणि थांबणार नाही. राजकारणात मात्र बाळासाहेब ठाकरे-शरद पवार मैत्रीसारखे दुसरे उदाहरण शोधून सापडणार नाही. दोघांनी एकमेकांवर राजकीय मुद्द्यांवरून रक्तबंबाळ होईपर्यंत हल्ले केले. मात्र वैयक्तिक मैत्रीत कधीच विखार येऊ दिला नाही. सुप्रिया सुळेंनी राज्यसभेचा अर्ज भरला तेव्हा बाळासाहेबांनी पवारसाहेबांकडून विनंती येण्याची वाट न पाहता शिवसेनेचा पाठिंबा जाहीर केला. राजकारणात अशा निर्व्याज मैत्रीचे दर्शन आजच्या काळात दिसेनासे झाले आहे, असं ट्विट करत सुभाष देसाई यांनी सध्याच्या राजकारणावरही भाष्य केलंय.

Tags:    

Similar News