पंजाब मध्ये ऊसावर रेड रॉट रोगाचा प्रादुर्भाव

Update: 2021-09-12 10:07 GMT

पंजाब राज्यात ऊस पिकावर रेड रॉट या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. हे ऊसाचे क्षेत्र नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे.

रेड रॉट हा रोग Co 0238 या ऊसाच्या प्रजातीवर गतीने वाढणारा रोग आहे. पंजाब मध्ये जवळपास 60 टक्के उसक्षेत्र Co 0238 या प्रजातीचे आहे. पंजाब, गुरुदासपूर, अमृतसर, होशिरपुर, जालंधर पठाणकोट आणि लुधियाना च्या काही भागात सुमारे 50 हजार एकर परिसरात हा रोग पसरला असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रोगाची लक्षणं कोणती?

या रोगाची लागण झाल्यानंतर प्रथम ऊसाचे वरून तिसरे चौथे पान पिवळे पडते. त्यानंतर ते वाळते. पान चिरल्यानंतर ते आतून लाल दिसते. पान चिरल्यानंतर त्याचा अल्कोहोल सारखा वास येतो. काही काळात पूर्ण ऊस जळून जातो. या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर हा रोग संपूर्ण ऊसाचे पीक नष्ट करतो.

खराब वातावरणात वाढतो प्रादुर्भाव..

गेल्या काही दिवसापासून पंजाब मध्ये पाऊस पडत आहे. पाऊस, ढगाळ वातावरण, हवेतील आद्रता हे वातावरण या रोगासाठी पोषक आहे.

तज्ज्ञांच्या मते रेड रॉट प्रादुर्भावामुळे २९ टक्के वजन तसेच ३१ टक्के साखरेचा उतारा घटण्याची शक्यता असते. पंजाब राज्याचे सहकारमंत्री सुखविंदर सिंग यांनी जिल्हा प्रशासनाना या भागांचा सर्वे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या रोगाच्या नियंत्रणासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्याने कृषी विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन पंजाब सरकारने केले आहे.

ऊस कारखान्यांना विक्री करण्याच्या अगोदर हे संकट शेतकऱ्यांवर आल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

Tags:    

Similar News