"तुम्ही माझ्या विचारांना कैद करू शकत नाही." कालीचरण महाराजांच्या वक्तव्यावर राहुल गांधींची प्रतिक्रिया

Update: 2021-12-27 12:42 GMT

नवी दिल्ली : छत्तीसगडच्या रायपूरात कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींविरोधात केलेल्या अवमानजनक वक्तव्यवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक नेत्यांकडून कालीचरण महाराजांवर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी होत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधी यांनी एक वाक्य ट्विट करत  "तुम्ही मला बेड्या घालू शकता, माझा छळ करू शकता, या शरीराचा नाश करू शकता, परंतु तुम्ही माझ्या विचारांना कधीही कैद करू शकत नाही." अशा आशयाचे ट्विट करत प्रतिक्रिया दिली.


रायपूरमधील रावणभथ मैदानावर दोन दिवसीय 'धर्म संसद'च्या शेवटच्या दिवशी हिंदू धर्मगुरू कालीचरण महाराज यांनी आपल्या भाषणात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर अपमानास्पद विधान केले. यावेळी त्यांनी अपशब्दही वापरले. कालीचरण महाराज हे एवढ्यावरच थांबले नाहीत तर गांधीजींची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेचेही त्यांनी आभार मानलेत. तसेच, धर्माच्या रक्षणासाठी कट्टर हिंदू नेत्यालाच सरकारचा प्रमुख म्हणून निवडावे, असे ते म्हणाले. याआधी यती नरसिंहानंद गिरी यांनीही गोडसे हे सत्य आणि धर्माचे प्रतीक असल्याचे गौरवोद्गार काढले होते.

दरम्यान छत्तीसगड पोलिसांनी हिंदू धर्मगुरू कालीचरण महाराज आणि इतरांविरुद्ध महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल आणि नथुराम गोडसेची प्रशंसा केल्याबद्दल एफआयआर नोंदवला आहे. काँग्रेस नेते प्रमोद दुबे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी टिकरापारा पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 505(2), 294 अन्वये एफआयआर नोंदवला आहे.

Tags:    

Similar News