QUAD Summit 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडन यांच्यामध्ये चर्चा, काय म्हणाले बायडन

'युक्रेन रशिया' युद्धानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच क्वाड देशाच्या परिषदेत सहभागी झाले आहेत. काय आहे "क्वाड"? भारतासाठी हा दौरा का महत्त्वाचा आहे. वाचा:

Update: 2022-05-24 07:05 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर आहे. जपान मधील टोकियो शहरात क्वाड देशांच्या परिषदेत ते सहभागी झाले आहेत. या परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज हे देखील सहभाग होत आहे.

युक्रेन रशिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या यु्द्धादरम्यान पहिल्यांदाच चारही देशांच्या राष्ट्राध्यक्षांची प्रत्यक्षात बैठक होत आहे. यामध्ये विविध आंतरराष्ट्रीय मुद्दयांवर चर्चा केली जाणार असून देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी, तसेच हवामान बदल, तंत्रज्ञान, सायबर स्पेस यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

क्वाड बद्दल मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वाडबद्दल बोलताना म्हणाले अल्प काळातच क्वाड ने जागतीक स्तरावर महत्त्वाचे स्थान प्राप्त केलं आहे. आज क्वाड चं स्वरूप व्यापक झालं आहे. क्वाड देशाचा परस्परांमध्ये असलेला विश्वास लोकशाही प्रक्रियेला नवीन उर्जा देईल. क्वाड मधील आपसातील सहयोगामुळे इंडो पॅसीफीक क्षेत्रात प्रोत्साहन मिळत आहे. यावेळी मोदी यांनी नवनिर्वाचित ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज यांचे अभिनंदन केलं.

क्वाड म्हणजे काय? what is quad group

क्वाड ला क्वाड्रिलेटेल सिक्मयोरिटी डायलॉग असे संबोधले जाते. हा भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानचा अनधिकृत सामरिक गट आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील लोकशाही देशांच्या हितांचे रक्षण करणे आणि जागतिक आव्हाने हाताळणे हे क्वाड चे उद्दिष्ट आहे. क्वाडची स्थापना २००७ मध्ये झाली होती.

मोदी आणि जो बाईडन यांची भेट...

जपानची राजधानी टोकियो येथे सुरू असलेल्या क्वाड संमेलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांच्यामध्ये चर्चा झाली. या द्विपक्षीय चर्चे संदर्भात अमेरिकेचे राष्ट्रपती जो बाईडन यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "रशियाने यूक्रेन वर क्रूर पद्धतीने अन्यायकारक हल्ले सुरू केले आहेत. याचा प्रभाव जागतिक व्यवस्थेवर झाला आहे. या संदर्भात दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली. युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धामुळे जगावर होत असलेला परिणाम कमी करण्यासंदर्भात भारत आणि अमेरिका प्रयत्न करत राहील." असं मत जो बायडन यांनी व्यक्त केलं आहे.

क्वाडमुळे चीनवर दबाव...

अलीकडच्या काळात हिंद प्रशांत क्षेत्रात चीनची आक्रमकता वाढली आहे. या आक्रमकतेला रोखण्यासाठी क्वाड देशातील सदस्य देशांसोबतच न्युझीलँड, सिंगापूर,थायलँड, ब्रूनेई, दक्षिण कोरिया, मलेशिया, इंडोनेशिया, वियतनाम हे सर्व देश चीनला शह देण्यासाठी एकत्र आले आहेत.

हे देश चीनची हिंद प्रशांत क्षेत्रात वाढलेली दादागिरी कमी करण्यासाठी एकत्र आले आहेत. या संघटनेत अमेरिकेसह भारत मुख्य भूमिकेत आहे. क्वाड देशांनी चीनची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी रणनीती आखल्याचं बोललं जात आहे. गेल्या काही वर्षांपासून भारत आणि चीनच्या सीमेवर वाद सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि जपान यांच्यामध्ये वाढत असलेली मैत्री चीनच्या विस्तारवादी धोरणाला खोडा ठरत आहे. त्यामुळे क्वाड संघटनेचे महत्त्व अलीकडच्या काळात वाढलं आहे. या अगोदरची क्वाड परिषद अमेरीकेत झाली होती. चीनला रोखण्यासाठी अमेरिका क्वाडला पाठबळ देत आहे. एकंदरीत चीनच्या विस्तारवादी क्वाड धोरणाला लगाम घालण्यासाठी क्वाड परिषद महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं तज्ज्ञ व्यक्त करत असले तरी चीनचं विस्तारवादी धोरण कायम आहे.

Tags:    

Similar News