रुग्णानेच केला रुग्णाचा खून; सोलापुरमधील धक्कादायक प्रकार!

Update: 2021-09-15 06:37 GMT

सोलापूर :  सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात माथेफिरू रुग्णाने एका वृद्ध रुग्णाचा खून केल्याची घटना घडली आहे. यामुळे सोलापूर सिव्हील प्रशासनाच्या सुरक्षेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मृत वृद्ध रुग्ण हा बेघर असून गेल्या अनेक दिवसांपासून त्यावर सिव्हील हॉस्पिटलमधील बी ब्लॉक या इमारतीत उपचार सुरू होते.

ही घटना सोमवारी रात्री घडली असून याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच खून करणाऱ्या युसूफ पिरजादे या संशयीत आरोपी रुग्णास पोलिसांनी अटक केली आहे.

एका सामाजिक कार्यकर्त्याने बेघर असलेल्या एका वृद्धास उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. बी ब्लॉक या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर जनरल सर्जरी विभागात उपचार सुरू होते. त्याच ठिकाणी युसूफ पिरजादे हा छातीवर गाठ झाल्याप्रकरणी उपचारासाठी दाखल झाला होता. सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अचानक युसुफ पिरजादे हा रुग्ण बेघर वृद्ध रुग्णाला शिवीगाळ करू लागला आणि अंगावर धावून मारायला जाऊ लागला.

सलाईनच्या रॉडने मारहाण करून खून केला…

युसूफ पिरजादे या माथेफिरू रुग्णाने सलाईन लावण्याच्या स्टॅण्ड रॉडने मारहाण करू लागला. या मारहाणीत बेघर वृद्ध रुग्णास डोक्याला आणि मानेला जोरदार मार लागला आणि रक्तस्राव होऊ लागला. यामध्ये त्याला गंभीर जखमा झाल्या. उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी आणि परीचारकांनी माथेफिरू रुग्णांस बेडला बांधून ठेवले आणि जखमी रुग्णास उपचारासाठी अतिदक्षता विभागात हलविले. पण मंगळवारी दुपारी उपचार सुरू असताना जखमी बेघर वृद्ध रुग्णाचा मृत्यू झाला.

सिव्हील हॉस्पिटल मधील रुग्णांची सुरक्षा ऐरणीवर

सोलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात अशा माथेफिरू रूग्णांना ऍडमिट केल्याने इतर रुग्णांची सुरक्षा धोक्यात आली आहे. सिव्हील हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र सुरक्षा बल सदैव तैनात असते, हे बल फक्त रुग्णांच्या नातेवाईकांची अडवणूक करताना आढळतात. रुग्णांच्या सुरक्षितते विषयी यांना काहीही देणेघेणे नसते. असा आरोप आता नागरिक करत आहेत. नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी देखील सिव्हील हॉस्पिटलमधील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Tags:    

Similar News