अमरावती ,यवतमाळमध्ये कोरोना विषाणूचा परदेशी स्ट्रेन नाही: आरोग्य विभाग

राज्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावानं डोकं वर काढलं असताना काही जिल्ह्यांमधे कोरोना विषाणुचा परदेशी स्ट्रेन आढल्याच्या अफवा उठल्यानं नागरीकांमधे घबराट निर्माण झाली होती. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने आता यावर पडदा टाकत परदेशी स्ट्रेन नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Update: 2021-02-19 10:36 GMT

अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे अशा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून कोविड रुग्णांच्या दैनंदिन संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. या वाढीची कारणे शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. या भागातील करोना विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये काही बदल झालेला आहे का, या संदर्भातही पाहणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे.

आतापर्यंत अमरावती,यवतमाळ, सातारा या भागातील प्रत्येकी चार नमुने पुणे येथील बी जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तपासण्यात आले असून या नमुन्यांच्या तपासणी अहवालानुसार या जिल्ह्यांमधील विषाणूमध्ये ब्रिटन,दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझील या देशांमध्ये आढळलेल्या नवीन विषाणू प्रकारासारखा कोणताही बदल दिसून आलेला नाही.

पुण्यातील १२ नमुने देखील या वैद्यकीय महाविद्यालयात तपासण्यात आले असून त्यामध्येही जनुकीय क्रमामध्ये कोणतेही बदल दिसून आलेले नाहीत.

अधिक तपासणी सुरू असून अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यातील आणखी काही नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था, पुणे या ठिकाणी जनुकीय तपासणी करता पाठवण्यात आले आहेत. या संदर्भातील सविस्तर अहवाल पुढील आठवड्यापर्यंत मिळण्याची शक्यता आहे असे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Tags:    

Similar News