वीज कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्राला वेठीस धरू नये, ऊर्जामंत्र्यांचे आवाहन

Update: 2022-03-28 11:10 GMT

राज्याती वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संप केला असल्याने राज्यात वीज संकट निर्माण होऊ शकते, त्यामुळे त्यांनी राज्याला वेठीस धरु नये असे आवाहन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले आहे. जवळपास 36 वीज कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले आहे. तसेच यामध्ये त्यांना संप मागे घेण्याची विनंती केली असून वीज कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्राला वेठीस धरू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

सध्या उष्णता वाढली आहे, विजेची मागणीही वाढलेली आहे, दहावी-बारावीची परीक्षासुद्धा सुरू आहे, शेतामध्ये पीक असल्याने सिंचनाची गरज आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत महावितरण आर्थिक संकटात असताना वीज कर्मचाऱ्यांनी राज्याला वेठीस धरू नये आणि संप मागे घ्यावा असे आवाहन नितीन राऊत यांनी केले आहे. त्याचबरोबर मंगळवारी समोरासमोर बसून मुंबईत चर्चा करू असेही आश्वासन त्यांनी दिले आहे. कोणत्याही कंपनीचे खाजगीकरण होणार नाही याची आपण खात्री देत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

या संपाचा परिणाम वीज निर्मितवर निश्‍चितपणे होणार आहे. एखादा प्लांट बंद झाल्यावर ग्रीडवरही परिणाम होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. एकलहरे विज प्रकल्पातील दोन प्लांट बंद झाल्यामुळे नाशिक परिसरात नुकताच वीजपुरवठा खंडित झाला होता. "कोळशाचे मोठे संकट आमच्यापुढे उभा ठाकलेले आहे, त्यामुळे कोणत्याही संघटनेने राज्य सरकारला वेठीस धरू नये आणि विरोधकांना संधी उपलब्ध करून देऊ नये, एक पाऊल मी पुढे येतो एक पाऊल तुम्ही समोर या" असे आवाहन नितीन राऊत यांनी केले आहे.

Tags:    

Similar News