अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्क्रीझॅाफ्रेनिया, कंपल्सिव डिस्आर्डर, भास, व्यसन यासह विविध सामान्य मानसिक आजाराची लक्षणे समजून घेणे गरजेचे आहे, असे मत मानसोपचार तज्ञ डॉ दुष्यंत भादलीकर यांनी व्यक्त केले आहे. समाजप्रबोधनाचे काम करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याने तर याची माहिती समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. 13 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे जिल्ह्याच्या वतीने डोंबिवली येथे आयोजित केलेल्या महिलांसाठीच्या चमत्कार प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.
मानसिक आजाराची लक्षणे व त्यामागची कारणे हे अनेकांना माहीत नसल्यामुळे अनेक जण योग्य वैद्यकीय उपचार करण्याऐवजी बूवा- बापू तांत्रिक-मांत्रिकाकडे आणि कर्मकांडाकडे वळतात.यातून त्यांचं शारीरिक, मानसिक आर्थिक शोषण होतं. अशा व्यक्तींना मार्गदर्शनाची आणि प्रबोधनाची गरज असते. लोक याला बळी पडू नये म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने या मानसिक आजारामागची कारणे त्यांना समजावून सांगणे व योग्य मार्गदर्शन करणे ही त्यांची जबाबदारी आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बुवा- बापू ,महाराज, तांत्रिक-मांत्रिक व पूजा-पाठ कर्मकांडाच्या माध्यमातून स्त्रियाच जास्त शोषणाला बळी पडतात. समाजातील स्त्रियांना प्रशिक्षित करून त्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोबत जोडून घेऊन, त्यांच्यामार्फत इतर महिलांना जागृत करण्याचे काम करावे, समाज प्रबोधन करावे हा या शिबिराचे आयोजन करण्यामागचा उद्देश असल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य प्रा प्रवीण देशमुख यांनी यावेळी सांगितले.
या शिबिरात डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, ठाणे शहर, मुरबाड, अशा विविध ठीकाणाहून जवळपास ३५ हून अधिक महिलांनी प्रशिक्षणार्थी म्हणुन सहभाग नोंदवला.
मुळात अशा सवयी या 'आजार' आहेत हेच समजून घ्यायला त्या व्यक्ती तयार नसतात किंवा कुटुंबातील इतरांनाही त्याची माहिती नसते. त्याचे भयंकर दुष्परिणाम त्या मानसिक आजारी व्यक्तीसह कुटुंबातील सर्वांनाच नंतर भोगावे लागतात.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य विभाग पदाधिकारी जगदिश संदानशिव यांनी फलज्योतिष हे कसे थोतांड आहे हे समजावून सांगितले. जन्मवेळ, कुंडली, वास्तुशास्त्र इ. गोष्टींचा डोलारा वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास सपशेल कोसळतो हे साध्या व सोप्या भाषेत उदाहरणांसह समजावून सांगितले.
या चमत्कारांमध्ये पाण्याचा दिवा पेटवणे, नारळातून करणी काढणे, जळता कापुर जिभेवर ठेवणे, नजरबंदी करणे, मंत्राने अग्निहोत्र पेटविणे, डोळ्यावर पट्टी बांधून वस्तू ओळखणे इ. जनसामान्यांना अचंबित करणारे व चमत्कार वाटणारे प्रयोग सादर करण्यात आले. त्याचबरोबर त्या पाठीमागील विज्ञान आणि हातचलाखी हे समजावून सांगितले. हे प्रयोग या प्रशिक्षणार्थी महिलांकडूनही करून घेण्यात आले. प्रसिद्ध जादूगार अभिजीत यांचीही विशेष उपस्थिती ह्या सत्रात होती. त्यांनी देखील 'रिकाम्या हातातून पैशांचा पाऊस पाडणे' हा सगळ्यांना थक्क करणारा प्रयोग करुन दाखवला. जादूगार चमत्कारामागे हातचलाखी आहे कींवा विज्ञान आहे हे मान्य करतो व समाजाचे प्रबोधन करतो तर दुसर्या बाजूला बुवा -बापू महाराज याच गोष्टींना आपण दैवी शक्तीने चमत्कार करित असल्याची थाप मारून जनतेची फसवणूक करतात हे त्यांनी स्पष्ट केले.
कोणताही चमत्कार हा चमत्कार नसून एकतर रासायनिक अभिक्रीया तरी असते किंवा हातचलाखी तरी असते. तसेच 'चमत्कार करणारे बाबा-बुवा बदमाश असतात, भोंदू असतात तर चमत्काराला फसणारे मुर्ख असतात' हे ठासून सांगण्यात आले.