Max Impact अधिकारी पोहोचले वनवासवाडीतील दीड फुटाच्या रस्त्यावर

Update: 2020-10-06 05:31 GMT

मॅक्समहाराष्ट्र ने विकासापासून वंचित असलेल्या सातारा जिल्ह्यातील वनवास वाडी व कोळेकरवाडी या दोन गावांची व्यथा ‘१ मंत्री २ खासदार.. २ गावांचा 'वनवास' कधी संपणार?’

https://www.maxmaharashtra.com/max-reports/no-roads-for-2-villages-in-satara-district/96999/

या ठळक मथळ्याखाली मांडली होती. २ ऑक्टोबरला मांडलेल्या व्यथेनंतर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी अधिकाऱ्यांना सदर रस्त्याची तात्काळ पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.

बांधकाम उपअभियंते यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी या गावाला जाणाऱ्या दीड फुटाच्या रस्त्यावर भेट दिली. त्यांनी गावकऱ्यांना रस्त्याचा प्रश्न लवकर मार्गी लावणार असल्याचे सांगितले आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांनी देखील सदर रस्त्याबाबत संबंधित विभागाला पत्र पाठवून या रस्त्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे मॅक्स महाराष्ट्र ला कळवले आहे.

राज्याच्या राजकाऱणात कायम ज्या भागातल्या राजकारण्यांचा दबदबा राहिलाय आणि ज्या भागाने सर्वाधिक काळ राज्याला सत्ताधारी दिले त्या सातारा जिल्ह्यातील तालुक्यातील वनवासवाडी आणि कोळेकरवाडी या दोन गावांमधील लोक अजूनही रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष बाब म्हणजे श्रीनिवास पाटील आणि उदयनराजे भोसले असे दोन खासदार तसंच शंभूराज देसाई यांच्या रुपाने एक मंत्री जिल्ह्याला लाभलाय. मात्र, अजुनही या गावांचा विकास झालेला. अशा आशयाचं वृत्त मॅक्समहाराष्ट्रने प्रसिद्ध केलं होतं.

काय आहे गावची व्यथा...

तीन किमी डोंगरावर असलेल्या या गावांना जाणारा रस्ता म्हणजे उभ्या डोंगरावर खडी जाणारी दीड फुटाची पायवाट आहे.... खाच खळगे तुडवत वेडी वाकडी वाट शोधत गावात जावं लागते.

मुलीला बाळंतपणासाठी डालीतून दवाखान्यात न्यावं लागतं. अशी परिस्थिती या गावातील आहे. या गावात फक्त रस्ता ही एकमेव समस्या नाही. गावात चौथीपर्यंत शाळा आहे. शाळेची इमारतही पत्र्याच्या झोपडीप्रमाणे आहे. एखादे तुरुंग वाटावी अशा शाळेत वाऱ्याने हलणाऱ्या तुटक्या पत्र्याच्या खाली मुले शिक्षण घेतात. रस्ता नसल्याने आठवड्यातून कधी तरी शिक्षक शाळेत येतात. चौथीनंतर शाळेसाठी बाहेर जावे लागत असल्याने अनेक मुलांनी शाळा सोडलेली आहे. गावात दहावीनंतर शिकलेली मुले क्वचितच आढळतात. उन्हाळ्यात पाण्याची गैरसोय असते. गावात शौचालय नाही. अंगणवाडी इमारत नाही.

जिवंतपणी मरण यातना सोसणाऱ्या या गावातील लोकांचा मरणानंतरही संघर्ष थांबत नाही. स्मशानभूमी नसल्याने पावसात प्रेत दहन करताना अनेक अडचणी येत असतात. या सर्व अडचणीमुळे येथील मुलांची लग्ने जुळण्यामध्ये अडचणी येत आहेत.

अशा अनेक समस्या असलेल्या गावांची व्यथा मॅक्समहाराष्ट्रने मांडली होती. यावर आता शंभुराजे देसाई यांनी गावातील रस्त्याची तात्काळ पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. यावर सरकार तात्काळ निर्णय घेईल काय़? हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.

Similar News