Top
Home > Top News > १ मंत्री २ खासदार.. २ गावांचा वनवास कधी संपणार?

१ मंत्री २ खासदार.. २ गावांचा 'वनवास' कधी संपणार?

आपल्या जिल्ह्याचा नेता मंत्री झाला किंवा खासदार झाला तर आता विकास होणार अशी भाबडी अपेक्षा नागरिकांना असते. पण सातारा जिल्ह्यात १ मंत्री आणि दोन खासदार असूनही २ गावांचा मुलभूत हक्कांसाठीचा संघर्ष थांबलेला नाही. पाहा मॅक्स महाराष्ट्रचा वस्ती रिपोर्ट....

१ मंत्री २ खासदार.. २ गावांचा वनवास कधी संपणार?
X

राज्याच्या राजकाऱणात कायम ज्या भागातल्या राजकारण्यांचा दबदबा राहिलाय आणि ज्या भागाने सर्वाधिक काळ राज्याला सत्ताधारी दिले त्या सातारा जिल्ह्यातील अशा २ गावांची कहाणी आम्ही तुम्हाला सांगतोय जिथे आजही जाण्यासाठी रस्ता नाहीये. संपूर्ण देश जिथे ५ जी नेटवर्कची वाट पाहतोय तिथे पाटण तालुक्यातील वनवासवाडी आणि कोळेकरवाडी या दोन गावांमधील लोक अजूनही रस्त्याच्या प्रतीक्षा करत आहेत. श्रीनिवास पाटील आणि उदयनराजे भोसले असे दोन खासदार तसंच शंभूराज देसाई यांच्या रुपाने एक मंत्री जिल्ह्याला लाभलाय. पण अजूनही या गावकऱ्यांच्या हालअपेष्टांची दखल घेतली गेलेली नाही.

"या गावात आमच्या चार पिढ्या संपल्या पाचवी सुरू आहे तरी अजुन रस्ता झाला नाही, पुढारी येतात रस्त्याचे आश्वासन देतात... मते नेतात... मात्र रस्ता कुणीही केला नाही" अशी खंत इथले गावकरी व्यक्त करतात.

जुळ्या भावंडाप्रमाणे वसलेली दोन गावे, पण यांच्या समस्या सारख्याच आहेत. तीन किमी डोंगरावर असलेल्या या गावांना जाणारा रस्ता म्हणजे उभ्या डोंगरावर खडी जाणारी दीड फुटाची पायवाटच.... खाच खळगे तुडवत वेडी वाकडी वाट शोधत गावात जावे लागते.

वनवासवाडी येथील विष्णु डीगे यांच्या मुलीला बाळंतपणासाठी डालीतून दवाखान्यात नेताना ती रस्त्यातच झाडाखाली बाळंत झाली. तिला पुन्हा उचलून घरी आणावे लागले होते.

या गावात फक्त रस्ता ही एकमेव समस्या नाही. गावात चौथीपर्यंत शाळा आहे. शाळेची इमारतही पत्र्याच्या झोपडीप्रमाणे आहे. एखादे तुरुंग वाटावी अशा शाळेत वाऱ्याने हलणाऱ्या तुटक्या पत्र्याच्या खाली मुले शिक्षण घेतात. रस्ता नसल्याने आठवड्यातून कधी तरी शिक्षक शाळेत येतात. चौथीनंतर शाळेसाठी बाहेर जावे लागत असल्याने अनेक मुलांनी शाळा सोडलेली आहे. गावात दहावीनंतर शिकलेली मुले क्वचितच आढळतात. उन्हाळ्यात पाण्याची गैरसोय असते. गावात पक्के घर नाही शौचालय नाही. अंगणवाडी इमारत नाही.

जिवंतपणी मरण यातना सोसणाऱ्या या गावातील लोकांचा मरणानंतरही संघर्ष थांबत नाही. स्मशानभूमी नसल्याने पावसात प्रेत दहन करताना अनेक अडचणी येत असतात. या सर्व अडचणीमुळे येथील मुलांची लग्ने जुळण्यामध्ये अडचणी येत आहेत.

राज्याचे गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई यांच्या मतदारसंघात ही गावं येतात. या परीसराला सध्या डॉ श्रीनिवास पाटील, उदयनराजे भोसले असे दोन खासदार आहेत. असे असतानाही इथल्या सामान्य नागरीकांना दररोज तीन किमीचा डोंगर पार करावा लागतो.

Updated : 2 Oct 2020 2:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top