अदर पुनावाला यांनी मागणी केल्यास सुरक्षा देण्याची ठाकरे सरकारची तयारी

Update: 2021-06-11 13:10 GMT

सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी मागणी केल्यास त्यांना सुरक्षा पुरवली जाईल, अशी भूमिका राज्य सरकारने हायकोर्टात मांडली आहे. दत्ता माने यांनी जनहित याचिका दाखल करत पुनावाला यांना झेड सिक्युरिटी देण्याची मागणी केली होती. अदर पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी आपल्याला कोरोनावरील लसींच्या पुरवठ्यासाठी धमक्या येत असल्याची माहिती दिली होती. तसेच याच कारणामुळे आपण सध्या ब्रिटनमध्ये राहत असल्याची माहिती एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी दिली होती. त्यानंतर पुनावाला यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने त्यांना झेड सिक्युरिटी द्यावी अशी मागणी माने यांनी केली होती.

या जनहित याचिकेवरील सुनावणी शुक्रवारी झाली. यावेळी पुनावाला यांना यामध्ये पार्टी का करण्यात आले नाही असा सवाल कोर्टाने याचिकाकर्त्यांना विचारला. राज्य सरकारतर्फे वकिलांनी पुनावाला भारतात परतल्यावर त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला जाईल, तसेच त्यांनी मागणी केल्यास सुरक्षा पुरवली जाईल अशी भूमिका मांडली. त्यामुळे कोर्टाने ही याचिका निकाली काढली.

कोरोनावरील कोविशिल्ड लसीची निर्मीती सिरम इन्स्टिट्यूटने केली आहे. पण देशात लसींचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर काही बड्या लोकांनी आपल्याला लसीकरीता धमक्या दिल्याचा आरोप पुनावाला यांनी केला होता.

Tags:    

Similar News