काश्मीर सोडून पंडितांचे पलायन, परिस्थितीला जबाबदार कोण?

Update: 2022-06-03 15:04 GMT

गेल्या काही दिवसांत काश्मीरमधील पंडितांवर दहशतवाद्यांकडून सातत्याने हल्ले होत असल्याचा घटना समोर येत आहेत. त्यापार्श्वभुमीवर काश्मीरमधून पंडितांनी पुन्हा पलायन करण्यास सुरूवात केली असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे या परिस्थितीला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

काही दिवसांपुर्वीच बँकेच्या व्यवस्थापकाची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर मंगळवारी शिक्षिकेचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात काश्मीरी पंडितांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे काश्मीरी पंडितांनी सामूहिक पलायन करणार असल्याची घोषणा केली आहे.

काश्मीर खोऱ्यात पंडितांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात अनंतनागमध्ये आंदोलन करण्यात आले होते. तसेच आम्हाला काश्मीरमधून सुरक्षित बाहेर काढण्यात यावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे. त्यामुळे 90 च्या दशकात ज्याप्रमाणे काश्मीरी पंडितांच्या स्थलांतराचा मुद्दा समोर आला होता. त्याच प्रकारे पुन्हा एकदा आता काश्मीरी पंडितांच्य स्थलांतराचा मुद्दा समोर आला आहे. त्यावरून देशात राजकारण तापले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरी पंडितांच्या होणाऱ्या हत्यांच्या पार्श्वभुमीवर तातडीने बैठक घेतली होती. या बैठकीत काश्मीरमध्ये पंडितांच्या जीविताच्या रक्षणासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. मात्र काश्मीरी पंडितांनी सामुहिक पलायन घोषित केल्यानंतर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

काँग्रेसने काश्मीरी पंडितांच्या पलायनावरून केंद्र सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, काश्मीरमध्ये गेल्या 5 महिन्यात 15 सुरक्षा रक्षक शहीद झाले आहेत. तसेच 18 नागरिकांची हत्या करण्यात आली आहे. मंगळवारीही एका शिक्षिकेची हत्या करण्यात आली. 22 दिवसांपासून काश्मीरी पंडित धरणे आंदोलन करत आहेत. मात्र मोदी सरकार आपल्या 8 वर्षांच्या कार्यकाळाचा उत्सव साजरा करीत आहे. पंतप्रधान मोदी जी, हा काही चित्रपट नाही तर काश्मीरमधील सत्यता आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी बुधवारी केली होती.

संजय राऊत भडकले

संजय राऊत म्हणाले की, मंदिरांसाठी संघर्ष करण्यापेक्षा काश्मीरी पंडितांचे प्राण कसे वाचवता येतील? ते पाहणे गरजेचे आहे. त्याबरोबरच जम्मू काश्मीरमधील हिंदू असो की मुसलमान असो ते अत्यंत धोक्यात जीवन जगत आहेत. 370 कलम हटवल्यानंतरही काश्मीरमधील परिस्थितीत अजिबात बदल झाला नाही. मात्र काश्मीर फाईल्स चित्रपटाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी प्रमोशन करून त्यांच्या कृपेने निर्मात्याने 400-500 कोटी कमावले. परंतू त्यानंतरही काश्मीरी पंडितांच्या नशिबी केवळ पलायनच आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीवर काश्मीर फाईल्स 2 चित्रपट निर्माण करावा आणि त्यासाठी जबाबदार कोण आहे? ते लोकांसमोर यावे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

Tags:    

Similar News