'IPL' बायोबबलचा फुगा फुटला का?

देशात रोज लाखो नागरिक कोरोनाबधीत होत असताना हजारो लोकांचा मृत्यू होत असताना आंतरराष्ट्रीय माध्यमातून खरपूस टीका होऊनही मनोरंजनासाठी ' बायोबबल' कोरोना सुरक्षाकवचात सुरू असलेल्या आयपीएल आयोजनाचा फुगा आता फुटला आहे.

Update: 2021-05-03 14:24 GMT

आयपीएलच्या 14 व्या हंगामातील कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील 30 वा सामना स्थगित करण्याची नामुष्की ओढावली आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती आणि जलदगती गोलंदाज संदीप वारियर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. हे दोन्ही खेळाडू कोलकाता संघाच्या इतर खेळाडूंच्या संपर्कात आल्यामुळे खबरदारी म्हणून सामना पुढे ढकलण्यात आलाय. नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाताचा संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली RCB विरुद्ध खेळणार होता. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातही कोरोनाच्या शिरकावाने खळबळ माजली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या संघातील कोरोनाच्या पॉझिटिव्ह रिपोर्टमुळे स्पर्धा संकटात सापडली आहे.




 


युएईत यशस्वीरित्या स्पर्धा पार पडल्यानंतर आता भारतात होणाऱ्या स्पर्धेदरम्यान बायोबबलवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे.प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, दिल्ली आणि अहमदाबादमधील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलमधील बायोबबलमध्ये धोक्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू वरुण चक्रवर्ती खांद्याच्या दुखापतीमुळे स्कॅनसाठी बायोबबलमधून बाहेर पडला होता. यावेळीच त्याला कोरोनाचा संसर्ग झाला असावा, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

बायोबबलमधून बाहेर पडल्यानंतर तो कोविड 19 पॉझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे बोलले जात आहे.

स्पर्धेत सहभागी असलेले खेळाडू कोरोना झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात येऊ नयेत, यासाठी जैव सुरक्षित वातावरण (बायोबबल) व्यवस्था तयार करण्यात आली आहे. यामध्ये खेळाडूंचा बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवण्यास निर्बंध येतात. बायोबबलमध्ये सामील होण्यापूर्वी सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात येते. स्टाफ मेंबर्स आणि खेळाडू एकत्रितपणे राहत असतात. वास्तव्यास असणारे हॉटेल, प्रॅक्टिस करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणारे मैदान आणि आयपीएलच्या लढती एवढ्यापूर्ती मर्यादित ठिकाणेच वावरण्याची खेळाडूंना मुभा आहे. बायोबबलमध्ये सामील होण्यापूर्वी प्रत्येकाच्या दोन कोरोना टेस्ट घेण्यात आल्या आहेत. बायोबबलचा नियम मोडल्यास खेळाडूला कारवाईला समोर जाण्याची तरतूद करण्यात आलीये. चहुबाजूंनी टीका होत असतानाही आयपीएल स्पर्धा सुरूच राहील असं आयोजकांनी मागील आठवड्यात स्पष्ट केलं होतं कारण यामागे चार हजार कोटींचा व्यवसाय असल्याचे सांगितले जात आहे. आता बायोबबलचा फुगा फुटल्यानंतर तरी स्पर्धा सुरूच राहणार का? असा प्रश्न उपस्थित राहिला आहे.

Tags:    

Similar News