वाळू वाहतूकीविरोधात कारवाईसाठी जात असताना पथकातील गाडीचा अपघात...!

वााळू वाहतुकीविरोधात कारवाईसाठी जात असताना गाडीचा अपघात होऊन बीड जिल्ह्यातील गेवराई मंडळ अधिकारी जागीच ठार, तर तहसीलदार जखमी झाले आहेत.

Update: 2022-03-06 07:58 GMT

अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाईसाठी जात असताना पथकातील एका गाडीचा अपघात झाला. यामध्ये नायब तहसीलदार जागीच ठार झाले, तर तहसीलदार गंभीर जखमी झाले. हि घटना गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रोडवरील सावळेश्वर फाट्यावर आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. नितीन जाधव असे अपघातात मृत्यू झालेल्या मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे. तर बीडचे प्रभारी तहसीलदार डोके हे अपघातात जखमी झाले आहेत.




 


याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा व वाहतूक होत आहे. दरम्यान हा अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने पथक स्थापन केले आहेत. दरम्यान बीडचे प्रभारी तहसीलदार डोके व म्हाळसजवळा ता.जि.बीड येथील मंडळ अधिकारी नितीन जाधव यांचे पथक राक्षसभुवन, सावळेश्वर, म्हाळसपिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाईसाठी शनिवारी रात्री गस्त घालत होते.




 



दरम्यान आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तहसीलदार व मंडळ अधिकारी बसलेल्या गाडीचा सावळेश्वर फाटा या ठिकाणी अपघात झाला. गाडीवरील ताबा सुटल्याने भरधाव वेगात असलेली ब्रेझा गाडी रस्त्याची खाली जाऊन झाडाला धडकली. यामध्ये मंडळ अधिकारी नितीन जाधव जागीच ठार झाले. तर तहसीलदार डोके हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Tags:    

Similar News