अवकाळी पाऊस अन् गारठ्याने शेकडो जनावरे दगावली ; पशुपालकांचे लाखोंचे नुकसान

Update: 2021-12-03 07:54 GMT

अहमदनगर  :  राज्यात मागील दोन दिवसांपासून वातावरणात बदल तसेच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या मक्याचे पिक काढणी झाल्याने राज्यातील अनेक भागात मेंढपाळ वाघूर लावून बसले आहेत. मात्र रात्रभर सुरू असलेला अवकाळी पाऊस व हवेतील गारवा यामुळे पुणे, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातून मेंढ्या मृत झाल्याची घटना समोर आली आहे.




 


एकाच गावांतील सात मेंढपाळांच्या 80 मेंढ्या मरण पावल्या

जोरदार पडलेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव शिरूर खेड तालुक्यातील व अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पशुधन धोक्यात आले आहे. यात प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील मेंढ्या चारण्यासाठी आलेली मेंढपाळ कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. मांजरवाडी ता. जुन्नर येथील एकाच गावांतील सात मेंढपाळ कुटुंबातील 80 हुन अधिक मेंढ्या मरण पावल्यात. यामध्ये मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐरवी या काळात मेंढ्यांची लोकर कापण्यात येत असते,त्यानुसार मेंढपाळांनी मेंढ्यांची लोकर कापल्याने त्यांच्या अंगावर केस राहीलेले नाही. त्यातच अवकाळी पाऊस आणि गारवा यामुळे मेंढ्याना जास्त त्रास झाला आहे.

मेंढ्यांना गारठ्यापासून उब मिळावी शेकोटीचा आधार

दरम्यान मागील दोन दिवसापासून गारवा वाढला असल्याने मेंढ्यांना गारठ्यापासून उब मिळावी यासाठी काही तरूणांनी शेकोटी पेटवून मेंढ्या वाचविण्यासाठी धडपड केली होती. मात्र काहींचे प्रयत्न असफल राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले.

"रातच्यालाच मेंढरांच वाघूर घातलया...अन् होत्याच नव्हतं झालया"

वर्षोनुवर्षं मेंढपाळाचे काम करणारे अनेक कुटुंब आहेत, ऊन ,वारा, पाऊस याची तमा न बाळगता गावागावात जाऊन उघड्यावर आपला प्रपंच थाटून मेंढपाळाचा व्यवसाय करत अशी कुटुंब आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. शेकडो मेंढ्यांसह प्रवास करत असल्याने या मेंढ्यांसाठी निवारा उपलब्ध होत नाही अशातच नैसर्गिक संकट कोसळले तर मेंढपाळांचे लाखोंचे नुकसान होते. असाच पद्धतीने मांजरवाडीत वाघूर लावून बसलेल्या लक्ष्मण जिटे,संतोष चोरमले या मेंढपाळांच्या जवळपास 80 मेंढ्याचा मृत्यू झाला आहे.यात त्यांचे 7 ते 8 लाखांचे नुकसान झाले आहे.

"काय सांगावं दादा… रातच्यालाच शेतात मेंढरांच वाघूर घातलया... अन् होत्याच नव्हतं झालया.. अशी केविलवाणी प्रतिक्रिया मेंढपाळांनी दिली आहे, सोबतच शासनाने तातडीने पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.



 


तातडीने पंचनामे करून मेंढपालांना आर्थिक मदत द्यावी- गणेश आप्पा हाके

पारनेर तालुक्यात मेंढपाळ समाज मोठ्या संख्येने खेडोपाडी आणि डोंगर-दऱ्यात वास्तव्यास आहे. या भागातील अनेक गावांत अतिवृष्टीच्या माऱ्यामुळे पाचशेच्यावर मेंढ्या मृत्युमुखी पडल्या असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाकडून मात्र, अजून मृत पशुधनाची आकडेवारी मिळालेली नाही. याबाबत पारनेर येथील मेंढपाळ कल्याणकारी संघटनेचे गणेश आप्पा हाके यांनी सांगितले की, अनेक गावांत कुठे वीस, कुठे तीस तर कुठे पन्नासवर मेंढ्या अतिवृष्टीने मृत्युमुखी पडल्यात. तहसीलदार आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी ठिकठिकाणी जाऊन पाहणी करत आहेत. शासनाने तातडीने पंचनामे करून मेंढपालांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी संघटनेने केली आहे. तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून शासकीय मदतीची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्यात.

या गावात पशुधनाचे नुकसान

१)रांधे २)पाडळी आळे ३)पळवे

४)पोखरी ५)वारणवाडी ६)पठारवाडी ७)कुरुंद ८)म्हसोबाझाप ९)खडकवाडी १०)वनकुटे ११)चोंभूत १२)शिरापूर १३)कातळवेढा १४)पारनेर (तिरकळ मळा) १५)पुणेवाडी १६)पारनेर (पुणेवाडी फाटा) १७)पारनेर (सोबलेवाडी) १८)किन्ही १९)कान्हूर पठार

२०) कळमकरवाडी(पाडळी रांजणगाव)

२१)निघोज २२) पिंपरी विळद (नगर) २३)मावळेवाडी

याठिकाणी पशुधनाचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील अंबासन येथे अवकाळी पाऊस अन् गारठ्याचा तडाखा; शेकडो जनावरे दगावली

अंबासन तालुक्यात रात्रभर अवकाळी पाऊस आणि वातावरणातील गारठा यामुळे शेकडो जनावरे दगावली असल्याची माहिती समोर येत आहेत. तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटिल यांनी तातडीने तालुक्यातील मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचे पंचनामे करण्याचे आदेश देताच घटनास्थळी धाव घेत मंडळ आधिकारी व तलाठी यांनी पंचनामे सुरु केलेत.

बागलाणचे तहसील जितेंद्र इंगळे - पाटिल यांना याबाबत माहिती देतात त्यांनी तातडीने कर्मचाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार सी. पी. आहिरे, तलाठी पिनू सोनवणे, कोतवाल देवा पवार यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामे केले. यात जायखेडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधीसह, उपनिरीक्षक तुषार भदाणे, निकेश कोळी, नाना पाटिल, हवालदार शिवाजी गुंजाळ, माऊली गायकवाड आदिंनी मेंढपाळांची भेट घेतली. पशुवैद्यकीय आधिकारी उज्वलसिंग पवार यांनी मृत जनावरांवर शवविच्छेदन केले. परिसरात शंभरहून अधिक जनावरे मृत झाल्याचा अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला.



 


नाशिक , अहमदनगर, पुणे जिल्ह्याचा विचार केला तर मृत पशुधनाचा आकडा हजारांच्या घरात जाण्याचा अंदाज प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. जेंव्हा अधिकारी पंचनामा करण्यासाठी जातात तेंव्हा जिवंत असणारं पशुधन नंतर देखील दगावते त्यामुळे निश्चित आकडेवारी मिळत नाही हे आकडे वाढत असतात अस अधिकारी सांगतात. त्यामुळे नुकसानाचा आकडा वाढतो.

'रात्रभर पाऊस अंगावर घेऊन बकरं वाचवली'



 


रात्रभर पाऊस अंगावर घेऊन मेंढ्या वाचवल्याचे मेंढपाळ महिलांनी बोलताना सांगितले. रात्री आठ वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत मेंढ्यांना वाचवत असल्याचे त्यांनी सांगितले. राहुरी तालुक्यातील चिखलठाण येथून मेंढपाळ म्हणून गावोगावी फिरून काम करत मेंढपाळ व्यवसाय करत असून जिथे जागा मिळेल तिथे वाघूर लावतो, जेंव्हा पाऊस सुरू झाला तेंव्हा आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने मेंढ्याना सुरक्षित ठिकाणी नेलं, पण 20 ते 25 मेंढ्या कुत्र्यांनी ओढून नेल्या. मागच्यावेळीही असंच झालं पंधरा हजारांनी बकरं खरेदी केली थंडीने ती मेली. आता आमदार, अधिकारी यांनी पाहिलं त्यांनीच आम्हाला काहीतरी मदत करावी असं आम्ही म्हटलं. त्यांनी पण मदत करू असं सांगितलं आहे. त्यांनी जर आर्थिक मदत केली तरच आमचं जगणं आहे नाहीतर काही खरं नाही असं मेंढपाळ महिलांनी बोलताना सांगितले.

Tags:    

Similar News