गुलाब चक्रीवादळ: शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करा: अजित नवले

Update: 2021-09-30 10:14 GMT

गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्यातील पुणे, अहमदनगर, सांगली, बीड या जिल्ह्यासह अकोला जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. या संदर्भात आता किसान सभेने आता आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांना तात्काळ भरीव मदतीची मागणी केली आहे.

गुलाब चक्रीवादळामुळे राज्यातील 182 परिमंडळांमध्ये प्रचंड अतिवृष्टी झाल्याने राज्यातील 12 लाख हेक्‍टरवरील खरीप पिके नष्ट झाली आहेत. शेतजमीन वाहून गेली आहे. नाशिक मधील गंगापूर धरणातून 3426 क्यूसेक पाणी सोडावे लागल्याने, तसेच खडकपूर्णा धरणाचे 19 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करावा लागल्याने नदीकाठच्या शेत जमीन व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

मराठवाडा विदर्भात मोठं नुकसान...

मराठवाडा व विदर्भातील ओढे, नदी-नाल्यांना पूर आल्याने काठालगतची शेती संपूर्णपणे वाहून गेली आहे. खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेले सोयाबीन, कापूस व इतर पिके संपूर्णपणे नष्ट झाली आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेले गुलाब चक्रीवादळ महाराष्ट्रातून गुजरात राज्यात पोहोचले असले तरी अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती नव्याने होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.

अरबी समुद्रात जोरदार वाऱ्यासह उंच लाटा उठण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. झालेले नुकसान व हवामान खात्याने वर्तवलेले आगामी संकटाचे अंदाज पाहता राज्य व केंद्र सरकारने शेतकरी व आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता करण्याची व आगामी संकटापासून बचावासाठी सावध करण्याची नितांत आवश्यकता आहे.

आपत्तीच्या अशा भीषण कालावधीमध्ये राजकीय पाहणीचे दौरे व पंचनामे यांचा फार्स न करता राजकारण बाजूला ठेवत केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी किसान सभेने केली आहे.

तातडीची मदत म्हणून 50 हजार रुपये जाहीर करा...

केंद्र व राज्य सरकारने मिळून तातडीची प्राथमिक मदत म्हणून प्रति हेक्टर 50,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत व त्यानंतर पीक व शेतजमीन नुकसानीचा योग्य अंदाज घेत शेतकऱ्यांचे उर्वरित संपूर्ण नुकसान भरून निघेल अशी ठोस मदत करावी अशी मागणी किसान सभा करत आहे.

पंतप्रधान पीक योजनेच्या सूचना ऑनलाईन स्विकारण्याची व्यवस्था करा...

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत आपत्तीची सूचना देणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतावर व पिकांवर ओढवलेल्या आपत्तीची सूचना देता यावी यासाठी कृषी व महसूल विभागाने शेतकऱ्यांना सर्व ते सहकार्य करावे. पीक विमा कंपन्यांनी आपली कार्यालये व हेल्पलाइन 24 तास सुरू राहतील अशी व्यवस्था करावी. रेंज अभावी शेतकऱ्यांना आपत्तीची ऑनलाईन सूचना देण्यात अडथळे येत असल्याने ऑफलाईन सूचना स्वीकारण्याची सुद्धा संपूर्ण व्यवस्था महसूल विभाग, कृषी विभाग व पीक विमा कंपन्यांनी करावी अशी मागणी किसान सभेचे नेते अजित नवले यांनी केली आहे.

Tags:    

Similar News