ऊर्जामंत्री नितीन राऊतांविरुद्ध पोलिसांत FIR

Update: 2021-03-16 14:55 GMT

मंत्र्यांवरील आरोपांमुळे राज्य सरकारवर टीका होत असताना आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात मुंबईत FIR दाखल झाली आहे. भाजपचे माध्यम प्रमुख विश्वास पाठक यांनी नितीन राऊत यांच्याविरोधात ही तक्रार दाखल केली आहे. एकीकडे वीज कंपन्यांकडे पैसे नाही म्हणून गरीब शेतकऱ्यांची विज कापतात आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत हे स्वतः बेकायदेशीरपणे चार्टर्ड विमानाने विज कंपनीच्या पैशांवर प्रवास करतात असा आरोप करत पाठक यांनी ही तक्रार दाखल केली आहे. वांद्रे इथल्या निर्मल नगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी ही तक्रार केली आहे.

चार्टर्ड विमान वापरण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागते, पण अशी कोणतीही परवानगी न घेता नितीन राऊत यांनी नागपूर-मुंबई, नागपूर-दिल्ली आणि इतर ठिकाणी प्रवास केला. राऊत यांना या प्रवाससाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती अशी माहिती ऊर्जा विभागाने माहिती अधिकार कायद्यांतर्गत दिल्याची माहिती पाठक यांनी दिली आहे. त्यामुळे राऊत यांनी विविध वीज कंपन्यांमार्फत चार्टर्ड विमानांची कोट्यवधींची बिलं भरल्याचा आरोप पाठक यांनी केला आहे. प्रशासकीय कामासाठी प्रवास केल्याची माहिती राऊत यांनी दिली असली तरी हा प्रवास खासगी कामासाठी केल्याचा आरोप पाठक यांनी केला आहे. तसेच मंत्र्यांच्या दबावाखाली येऊन पैसे खर्च करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी पाठक यांनी केली आहे. ऊर्जामंत्र्यांनी मोठा गुन्हा केला असल्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याची मागणीही भाजपने केली आहे.

Tags:    

Similar News