वर्धा नदीच्या पात्रात नाव उलटून 11 जण बुडाले

Update: 2021-09-15 03:55 GMT

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथे वर्धा नदीच्या पात्रात बोट उलटून 11 जण बुडाल्याची दुर्दैवी घटना काल(दि.14) घडली आहे. दरम्यान नावाड्यासह तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. यात दोन वर्षीय बालिकेचा देखील समावेश आहे. दरम्यान इतरांचा शोध सुरु असल्याची माहिती मिळत आहे. मात्र , परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळा येत आहे. गाडेगाव येथील मटरे कुटुंबातील दशक्रिया विधीसाठी नातेवाईक आले होते.

विधी आटोपल्यानंतर हे सर्वजण श्री क्षेत्र झुंज येथे पोहोचले. या ठिकाणी नदीपात्रात मटरे कुटुंबातील १२ जणांना नौकानयनाचा मोह झाला. यावेळी मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास हे सर्वजण नावेनं महादेव मंदिराकडे जात असताना नाव उलटली. या घटनेत अतुल वाघमारे , वृषाली अतुल वाघमारे , अदिती खंडाते , मोना खंडाते , आशु खंडाते, निशा मटरे , पियुष मटरे , पुनम शिवणकर यांचा समावेश आहे. दरम्यान नाविक नारायण मटरे , किरण खंडारे , वंशिका शिवणकर यांचे मृतदेह सापडले असून इतरांचा शोध सुरू आहे.

नागपूर-अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील वर्धा नदीतील झुंज धबधब्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. या भागात मच्छीमारांच्या होड्यांमधून नदीत फेरफटका मारणे याचे पर्यटकांना आकर्षण असते. मात्र अनेकदा कोणत्याही प्रकारची खबरदारी न घेता येथे पर्यटक धोका पत्करतात. आणि अशा दुर्दैवी घटना घडतात. दरम्यान येथे सुरू असलेली जल सफारी पूर्णतः बेकायदेशीर आहे. त्यांना मच्छीमारी किंवा पर्यटन असा कोणताही परवाना नाही. त्यामुळे हे 11 जण याच बेकायदेशीर जलपर्यटनाला बळी पडले आहेत.

Tags:    

Similar News