मागील जन्मी तात्या टोपे, झाशीच्या राणीसोबत लढत असेन, देवेंद्र फडणवीस यांचा अजब दावा

Update: 2022-05-04 13:46 GMT

बाबरी मशीद पाडण्याच्या श्रेयवादावरून राज्यात शिवसेना विरुध्द भाजप संघर्ष रंगला आहे. त्यातच बाबरी मशीद पाडण्याच्या वेळी उपस्थितीचा दावा फडणवीस यांनी केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्याला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.

राज्यात भोंग्यावरून वाद पेटला आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी 1993 साली बाबरी मशीद पाडायला मी उपस्थित होतो, असा दावा केला होता. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी फडणवीस हे 1857 च्या उठावातही सहभागी होते, असा उल्लेख टोला लगावला होता. त्याला फडणवीस यांनी प्रत्युत्तर देतांना मी हिंदू असून माझा मागील जन्मावर विश्वास आहे. त्यामुळे मी मागील 1857 च्या उठावात तात्या टोपे आणि झाशीची राणीसोबत लढत असेन असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यावरून चर्चेला उधाण आले आहे.

1 मे रोजी भाजपच्या बुस्टर डोस सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवसेनेकडून बाबरी मशीद पाडण्याचे श्रेय घेतले जाते. मात्र ती मशीद नसून तो परकीय आक्रमणाचा ढाचा होता आणि तो ढाचा पाडण्यासाठी मी स्वतः आयोध्येला गेलो होतो. तर या प्रकरणात बदायूच्या सेंट्रल जेलमध्ये मी स्वतः तुरूंगात दिवस काढले आहेत, अशी कबुली फडणवीस यांनी दिली होती. तर त्यानंतर फडणवीस म्हणाले की, ज्यांना मशीदीवरील भोंगे काढता येत नाहीत ते बाबरी मशीद पाडण्याचे श्रेय घेत आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली होती.

तसेच बाबरी मशीद पाडण्यासाठी शिवसेनेचा एकही शिवसैनिक नव्हता, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले. याबरोबरच बाबरी मशीद पाडल्याच्या आरोपाखाली 32 जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. त्यामध्ये एकही शिवसैनिक नव्हता. उलट ज्यांनी राम मंदिराला विरोध केला. त्यांच्या मांडीला मांडी लावून शिवसेना बसली असल्याची टीका फडणवीस यंनी केली होती. त्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर देत फडणवीस हे 1857 च्या उठावातही असतील, असा खोचक टोला लगावला होता.

त्याला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, आदित्य ठाकरे हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले मर्सिडीज बेबी आहेत. त्यामुळे संघर्ष काय असतो ते त्यांना माहित नाही. त्यामुळेच आदित्य ठाकरे राम मंदिराच्या निर्माणासाठी झटलेल्या कार सेवकांची थट्टा करू शकतात, असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले.

Tags:    

Similar News