टीपूच्या नावावरून वाद रंगला, काँग्रेसकडून भाजपवर हल्लाबोल

मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर आता नवीनच वाद सुरु झाला आहे. मालाडमध्ये मालवणी परिसरात मैदानाच्या नामकरणावरुन महाविकास आघाडी विरुध्द भाजप वाद चांगलाच रंगला आहे. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिंदूंवर अन्याय करणाऱ्या टीपू सुलतानच्या नावाला जोरदार विरोध केला होता. त्यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी टीपू सुलतानचा गौरव भाजप विसरले आहे का? असा सवाल करत भाजपावर घणाघात केला आहे.

Update: 2022-01-27 01:22 GMT

मालाडमध्ये मालवणी भागात मैदानाचे टीपू सुलतान असे नामकरण करण्याचा प्रस्ताव आहे. त्यावरून मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर नवा वाद निर्माण झाला आहे. तर उद्घाटनाआधीच भाजप, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून नामकरणाला विरोध केला जात आहे. तर उजव्या विचारसरणीच्या लोकांनी नामकरणाला तीव्र विरोध करत आंदोलन केले. तर त्याला प्रत्युत्तर देतांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टीपू सुलतानचा गौरवार्थी उल्लेख भाजप विसरले का? असा सवाल केला.

बुधवारी संकुलाच्या उद्घाटनाआधीच पोलिस आणि उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर मंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते मैदानाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सचिन सावंत यांनी टीपू सुलतानच्या नावाला भाजपकडून विरोध होत असल्याने भाजपला टोला लगावत म्हटले की, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टीपूचा गौरवार्थी उल्लेख केला होता ते भाजप विसरले का? असे म्हणत भाजप महापुरूषांची धर्माच्या आधारावर विभागणी करत असल्याचा आरोप केला.

सचिन सावंत म्हणाले की, टीपू सुलतानने मदत केलेल्या 156 मंदिरांची यादी भाजपने पहावी. त्याचबरोबर ऐतिहासिक व्यक्तीमत्वांची धर्माच्या आधारावर विभागणी करून द्वेष पसरवणे व ध्रुवीकरणाचे राजकारण करणे ही भाजपची विकृत मानसिकता आहे, अशी टीका सचिन सावंत यांनी केली.

पुढे सचिन सावंत म्हणाले, इतिहासाला काळा गोरा रंगवून टिपू सुलतानच्या नावाला भाजपा विरोध करत आहे. परंतु कोल्लूर येथील श्री मुकांबिका मंदिरातील पुजारी टिपूच्या सन्मानार्थ दररोज संध्याकाळी 7:30 वाजता "सलाम मंगलारती" करतात. नंजनगुड येथील श्रीकंठेश्वर मंदिरात, टिपूने सादर केलेल्या पन्नाच्या लिंगाची पूजा सुरू आहे. नेताजी बोस यांच्या होलोग्रामचे उद्घाटन मोदींनी केले त्याच नेताजींनी टिपू सुलतानाचा शहीद म्हणून उल्लेख करून टिपूच्या म्हैसूर टायगरचा समावेश आझाद हिंद सेनेच्या झेंडा तथा गणवेशावर केला होता. पेशव्यांच्या सेनेने इंग्रजांशी मिळून श्रींगेरी मठ उध्वस्त केला. तेव्हा देवस्थानाचे रक्षण व पुनर्स्थापना टिपू सुलतानने केली होती. म्हैसूर गॅझेटमध्ये टिपू सुलतानने मदत केलेल्या १५६ मंदिरांची यादी दिली आहे याची आठवण सावंत यांनी करून दिली."भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत" ही प्रतिज्ञा घेतलेल्या व विविधतेचे निदर्शक तिरंग्यातील तीन रंगांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने भाजपा व संघाच्या विकृत विचारधारेचा निकराने विरोध केला पाहिजे, असे आवाहन सचिन सावंत यांनी केले. त्यामुळे मैदानाच्या नामांतराचा वाद मुंबई महापालिकेत मतांच्या ध्रुवीकरणासाठी वापरला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Tags:    

Similar News