सरन्यायाधीशांचा ‘तो’ फोटो आणि वाद

Update: 2020-06-30 03:50 GMT

देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये सरन्यायाधीश हे हार्ले डेव्हिडसन या एका महागड्या टू व्हिलरवर बसलेले दिसत आहेत. कायदेविषयक बातम्या देणाऱ्या Bar & Bench या वेबसाईटने त्यांचा बाईकवर बसलेला फोटो प्रसिद्ध केल्यानंतर यावर नेटवकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.

पण यातील काही प्रतिक्रियांमध्ये सरन्यायाधीशांनी हेल्मेट आणि मास्क घातलेला नाही असा आक्षेप घेतला गेला होता. पण त्यानंतर सरन्यायाधीशांनी ही गाडी चालवली नाही ते फक्त त्यावर बसले होते, त्यामुळे काही माध्यमांनी सरन्यायाधीशांनी बाईक चालवल्याचे दिलेले वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण Bar & Benchने ट्विट करुन दिले आहे.

दरम्यान माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी सरन्यायाधीशांच्या फोटोवर ट्विट करत एक आक्षेप नोंदवला आहे. सरन्यायाधीश ज्या गाडीवर बसले होते ती महागडी गाडी नागपूरमधील एका भाजपचे नेत्याच्या मुलाच्या नावावर रजिस्टर असल्याचे गोखले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यात त्यांनी गाडीचा नंबर आणि रजिस्ट्रेशनची माहितीही दिली आहे.

दरम्यान सरन्यायाधीशांच्या या फोटोवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी सरन्यायाधीशांनी एखाद्या गाडीवर बसून पाहण्यात गैर काय असा सवाल विचारला आहे तर काहींना मास्क न घातल्याबद्दल आक्षेप नोंदवलाय.

 

Similar News