समीर वानखेडेंसाठी भाजप नेत्यांचे दिल्लीत लॉबिंग, नवाब मलिकांचा आरोप

Update: 2022-01-02 08:32 GMT

Aryan Khan प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik ) आणि NCBचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांच्यात निर्माण झालेला संघर्ष आता पुन्हा एकदा गंभीर वळणावर आला आहे. आता तर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यासाठी भाजपचे नेते दिल्लीत लॉबिंग करत आहेत, असा आरोप केला आहे. नवाब मलिक यांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावरुन भाजपवरही आरोप केला. समीर वानखेडे यांची डेप्युटेशनवर NCBमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी संपला आहे, पण त्यांना एक्सटेन्शन देण्यात आले आहे की नाही याबद्दल काहीही सांगण्यात आले नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. आपल्याला एक्सटेन्शन नको आहे अशा बातम्या स्वत: वानखेडेच पेरत आहेत, पण आपल्या माहितीनुसार एक्सटेन्शन मिळवण्यासाठी वानखेडे यांचे दिल्लीत लॉबिंग सुरू आहे, असा दावा मलिक यांनी केला. तसेच वानखेडे यांच्या मदतीसाठी काही भाजप नेते प्रयत्न करत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे.

तर दुसरीकडे NCBचे अधिकारी मागील तारखांना केलेल्या कारवायांबाबतच्या पंचनाम्यांवर पंचांच्या सह्या घेत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला. आपल्या आऱोपांचा पुरावा म्हणून त्यांनी NCBचे एक अधिकारी आणि पंचांमधल्या मोबाईल संवादाची ऑडिओ क्लिप देखील पत्रकार परिषदेत ऐकवली. त्याचवेळी NCBने केवळ आपले जावई समीर खान याच्या जामिनाला विरोध करण्यासाठी अपील का केले, त्या प्रकरणातील मुख्य आरोपी करन सजनानीसह ६ आरोपी आहेत, त्यांच्याविरोधात अपील का केले गेले नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पण आपण NCBला घाबरणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags:    

Similar News