पावसाची चाहूल सांगणारा 'बॅरोमीटर बुश'

Update: 2021-05-28 17:51 GMT

दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमा नजीक असणाऱ्या क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके चौकामधील वाहतूक बेटावर महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे 'ल्युकोफायलम' ही सुशोभीकरणासाठी उपयोगात येणा-या वनस्पतीची रोपे काही महिन्यांपूर्वी लावण्यात आली होती. या रोपांनी आता चांगलेच बाळसे धरले असून त्यांना आलेली आकर्षक फुले मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.

या फुलांचे वैशिष्ट्य म्हणजे या फुलांचा मुख्य बहार हा पावसाळा सुरू होण्यापूर्वी काही दिवस आधी येतो. या झाडांना बहार आल्यानंतर काही दिवसातच पावसाला सुरुवात होते असेही सांगितले जाते, ज्यामुळे या झाडांना 'बॅरोमीटर बुश' या टोपण नावाने जगभरात ओळखले जाते. ही वनस्पती मूलत: अमेरिकेतील टेक्सास राज्यातील असल्याची माहिती महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे देण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान खात्याद्वारे महानगरपालिका क्षेत्रातील विविध चौकांमध्ये आणि रस्त्याच्या दुभाजकांमध्ये पर्यावरणपूरक सुशोभीकरण केली जाते. या अंतर्गत सुशोभीकरणासाठी प्रामुख्याने आकर्षक फुले येणा-या वा आकर्षक पाने असणाऱ्या वनस्पती लावल्या जातात.

यानुसार 'ए' विभागांतर्गत असणाऱ्या क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके चौकातील वाहतूक बेटावर 'ल्यूकोफायलम'ची झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांना मार्च ते नोव्हेंबर या काळात फुले येत असली, तरी फुलांचा मोठा बहर हा पावसाळ्यापूर्वी येतो, अशीही माहिती महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे देण्यात आली आहे.

Tags:    

Similar News