विधानसभेत रेडकू आणि वासराची चर्चा

Update: 2023-02-28 14:36 GMT

 नेहमीच राजकीय आरोप आणि प्रत्यारोप होणाऱ्या विधानसभेत आज रेडकू आणि वासराची चर्चा झाली.गुरे ढोरे रस्त्यावर ने आण करण्यासंदर्भात आता कैदेऐवजी दंडाची तरतूद असणार सुधारणा विधेयक मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत मंजुरीसाठी मांडलं होतं. चर्चेत सहभागी होताना आमदार छगन भुजबळ यांनी भटक्या जनावरांच्या गंभीर प्रश्न कडे लक्ष वेधलं. गोहत्या बंदीच्या कायद्यामुळे ग्रामीण भागामध्ये बिकट समस्या उद्भवले असल्याचेही त्यांनी लक्षात आणून दिले.

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीही या विषयावर मत व्यक्त करताना कायद्यामध्ये स्पष्टता येऊन किती जनावरं पकडल्यानंतर किती दंड करणार याविषयी स्पष्टता मागितली. विजय वडेट्टीवार यांनीही ग्रामीण भागामध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर असून कायद्याने हा सुटणार नाही तर सरकारने यामध्ये ठोस उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.गावातील कोंडवांडे देखील शिल्लक नसल्याचे आमदारांनी यावेळी लक्षात आणून दिले.

मुंबई उपनगर मधील दहिसर भागातील आमदार मनीषा चौधरी यांनी या चर्चेत सहभागी होताना मशीनच्या वासरा बद्दल प्रश्न उपस्थित केले. त्यावर आमदार अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांनी म्हशीचं वासरू नसतं तर रेडकू असतं असं सांगितलं. त्यावर आमदार चौधरी यांनी आम्ही म्हशीच्या पिल्लाला वासरू असंच म्हणतो असं सांगितलं. त्यावर सभागृहात मोठा हास्यकल्लोळ झाला.

त्यावर दिलीप वळसे पाटील यांनी म्हणाले की गाईच्या पिल्लाला आपण वासरू म्हणतो आणि म्हशीच्या पिल्लाला रेडकू म्हणतो असं सर्वज्ञात आहे. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी केंद्राच्या अपेक्षेप्रमाणे कायद्यातील शिक्षेची तरतूद आर्थिक दंडात रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्या अंतर्गतच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1959 मधील कलम 163 (1) यातील गुरेढोरे रस्त्यावर नेणे-आणणे शिक्षेच्या तरतुदी कमीत कमी करण्यासंदर्भात दुरुस्ती करण्यात येणार आहे, असे सांगितले. गुरे ढोरे रस्त्यावर ने आण करण्यासंदर्भात आता कैदेऐवजी पाच हजार रुपये दंडाची तरतूद केली असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.

Tags:    

Similar News